स्त्री एकटी राहू शकत नाही, तिला नेहमीच पुरुषाच्या आधाराची गरज असते.

“एकट्या स्त्रीने राहणं समाजाच्या पचनी पडत नाही म्हणून असं बोललं जात.”

चुकीचा समज आहे हा. आपल्या समाजात पुरुषांनी एकटं राहिलं तर चालतं. त्यांचं ब्रह्मचारी, संत, एकटा जीव सदाशिव वगेरे म्हणून कौतुक केलं जातं पण बाईने पुरुषाशिवाय रहायचा निर्णय घेतला तर इतर व्यक्तींनाच त्याचा जास्त त्रास होत असतो. कुठल्याही वयाच्या मुलीला/बाईला पुरुषाशिवाय पाहण्याची सवय आपल्या समजाला नाही. इतर वस्तू आणि मालमत्तेप्रमाणे बाईसुद्धा पुरुषाची संपत्ती समजली जाते. मालकाशिवाय बाई कशी असू शकेल? एकटी स्त्री जरी स्वतःच घर, मुलं सांभाळून आर्थिक जबाबदारी पार पाडत असेल तर तेही अनेकदा इतरांना रुचत नाही. हेही खरंच आहे की पुरुष जोडीदार नसलेल्या बाईकडे बहुतेक वेळेस समाज दयेने किंवा अनुकंपेने पाहतात तर अनेक पुरुष ‘अवेलेबल’ म्हणून पाहतात. मुद्दा आहे अशा पुरुषांचा बंदोबस्त करण्याचा आणि बायांसाठी एक सुरक्षित आणि मोकळा अवकाश तयार करण्याचा. त्यासाठी जोडीदार हवा की नको हे ठरवणं आणि जोडीदाराची निवड हे घटनादत्त अधिकार प्रत्यक्षात येणं गरजेचं आहे.