आत्महत्येच्या विचारापासून स्त्रीची घ्यायची काळजी

आपल्या नात्यातील, परिचयातील किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या मुलीने, नवविवाहितेने किंवा बाईने आत्महत्या केल्याचे आपण कधी कधी ऐकतो. एक व्यक्ती म्हणून किंवा कार्यकर्ती म्हणून अशा घटना आपल्याला खूप अस्वस्थ करतात. कधी कधी एका अर्थाने निराशही करतात. आपण इतक्या जवळ असून काही करू शकलो नाही म्हणून हतबलही होतो. खाली काही मुद्दे अशाच कार्यकर्त्यांसाठी आणि एकूणच सर्व व्यक्तींसाठी देत आहोत ज्यांना अशा स्थितील स्त्रियांना काही मदत करण्याची इच्छा असते. हतबल न होता आपण अशा प्रकारच्या स्थितीत नक्कीच चांगल्या प्रकारे हस्तक्षेप करू शकतो जेणेकरून एखाद्या महिलेला जीव गमावण्यापासून आपण परावृत्त करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो.

(खालील वाक्यांवर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या … )

आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती कशी ओळखावी? धोका कसा ओळखावा?
  • मृत्यू किंवा आत्महत्येचा विचार, बोलणं किंवा लिहिणे.
  • निराशा, हतबलता, किंमत नसल्याची भावनाचिंता, राग, मूडमध्ये बदल, निष्काळजीपणा दिसणे.
  • कोषात जाणे, अंग काढून घेणे.
  • निरोपाची भाषा वापरणे किंवा मौल्यवान वस्तूंचे इतरांना वाटप करणे.
  • नेहमीच्या वागण्यात अचानक बदल घडून येणे.
  • अंमली पदार्थाचे सेवन (दारू, ड्रग्ज इ.)
  • यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो.
  • गरज नसताना धोके पत्करते.
  • नजीकच्या काळात गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक नुकसान झालेले असते.
  • मनात सतत मरण्याचे, मृत्यूचे विचार चालतात.
  • स्वतःच्या दिसण्याकडे, राहण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होते.
  • भूक व झोप याबाबत तक्रारी असतात.
  • वर्तणुकीत आमूलाग्र बदल जाणवतो.
  • मित्रमंडळी आणि सामाजिक सहभाग टाळतात.
  • काम, शाळा छंद यांमधला रस संपतो.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी ८० टक्के व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे वरीलपैकी काही लक्षणे दाखवितात. अशी व्यक्ती जर कौटुंबिक किंवा इतर हिंसाचाराची बळी असेल, तर ही लक्षणे जाणवतात. त्यांची दखल घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नांना आळा घालता येतो.

(संदर्भ – पुस्तक – मला जगायचंय् लेखक – अरुणा बुरटे, संगीता रेगे, पद्म देवस्थळी सेहत संस्था, मुंबई आणि कनेक्टिंग एनजीओ)

कार्यकर्त्यासाठी / समुपदेशकांसाठी / आत्महत्येचा विचार करणा-या स्त्रीला मदत करू इच्छिणाऱ्यासाठी सूचना
जिच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ शकतो अशी, किंवा आत्महत्येचा विचार करणारी किंवा आत्महत्येचा प्रयत्न केलेली अशी स्त्री ओळखण्यासाठी पुढील मुद्यांची नोंद घ्यावी. यातील काही लक्षणे ही आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या, धोक्याच्या रेषेजवळ असलेल्या स्त्रियांमध्ये दिसतात, तर काही लक्षणे आत्महत्येचा विचार करण्याचा संभव असलेल्या स्त्रियांमध्ये दिसतात.

खालील परिस्थितीत असलेल्या स्त्रिया धोक्याच्या रेषेजवळ असतात.
  • यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असेल, पण तो अयशस्वी ठरला असेल.
  • सहज गप्पांमधून आत्महत्येचे विचार बोलून दाखवले असतील.
  • जवळच्या नातेवाइकांमध्ये अथवा मैत्रिणींमध्ये कोणीतरी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असेल.
  • खूप दिवसांपासून/वर्षापासून एखाद्या आजाराने पछाडलेली असेल.
  • एखादा आजार परत परत होत असेल.
  • अनेक दिवस / वर्ष मानसिक ताणतणावात असेल.
  • आजार बरेच दिवस बरा होत नसेल किंवा औषधोपचार केलेला नसेल.
  • खूप तापट स्वभाव असेल. मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना सहन करता येत नसतील. झालेला अपमान विसरता येत नसेल, अवहेलना सहन होत नसेल.
  • घरामध्ये सतत, खूप किंवा अधूनमधून पण असह्य छळ होत असेल.
  • घराबाहेर/कामाच्या ठिकाणी असह्य छळ होत असेल.
  • जवळचे कोणी माणूस गमावल्यामुळे खूप दुःखी असेल.
  • अपयशामुळे निराश, खचलेली असेल.
  • प्रचंड गरिबी, दारिद्रय व कर्जबाजारीपणामुळे स्वप्नांबाबत घोर निराशा झालेली असेल.
  • एकटी राहात असेल, सतत गप्प गप्प राहात असेल.
  • नेहमी शांत स्वभाव असलेली स्त्री अचानक बोलू लागली असेल, हसून खेळून राहू लागली असेल.
  • शेजारी, मैत्रिणी यांच्याकडे निरवा-निरवीची भाषा बोलत असेल.
  • ‘माझ्यानंतर नीट राहा, मी नसले तर तुमचे काय होईल?” अशा प्रकारची वाक्ये मुलांसमोर बोलत असेल.
  • दुसऱ्या बाळंतपणासाठी दवाखान्यात किंवा माहेरी जाताना ज्याप्रमाणे एखादी स्त्री अत्यंत बारकाईने विचार करून पहिल्या मुलाची, नव-याची सोय लावत असताना दिसते; त्याचप्रमाणे सतत जाच सहन करणारी एखादी स्त्री घरामध्ये भांडण झाल्यावर, अचानक आवराआवर करत असेल.
  • छळ सहन करणाऱ्या एखाद्याकडून स्त्रीकडून ’माणसांचं काय, आज आहे. उद्या नाही.’ ‘आज सगळं जग दिसतंय. उद्या बघता, येईल का कुणी सांगावं?’, अशा अर्थाचे निराशावादी बोलणे परत परत ऐकायला मिळत असेल.

अशी लक्षणे ज्या स्त्रीमध्ये दिसतील त्या प्रत्येक स्त्रीची पुढीलप्रमाणे काळजी घेतली पाहिजे
  • तिला तिच्या आयुष्याबद्दल सखोल माहिती विचारा.
  • तिच्याबरोबर खूप वेळ बोला.
  • थोडेसे विषयांतर करून, थोडेसे आडून आडून, तर कधी थेटपणाने प्रश्न विचारून तिच्या मनात सुरू असलेली घालमेल समजून घ्यायचा प्रयत्न करा.
  • आपण प्रश्न विचारल्यानंतर, तिच्याशी चर्चा केल्यानंतर ती अस्वस्थ दिसली, तर तिच्या मनाची घालमेल, ताण कमी होईपर्यंत तिला शक्यतोवर एकटे सोडू नका. तिच्या सोबत राहा.
  • आपण तिच्या मदतीसाठी व सहकार्यासाठी आहोत याची तिला ग्वाही द्या.
  • तिच्या मनात आत्महत्येसंदर्भात काहीतरी विचार सुरू आहेत असे जाणवल्यास तिच्या संपर्कातल्या, तिची काळजी घेणाऱ्या कोणातरी समंजस व्यक्तीकडे तुमचे निरीक्षण बोलून दाखवा.
  • कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तिच्या संपर्कात राहा
  • अडचणीवर तिला स्वतःला मत करता येऊ शकते, प्रश्नावर उशिरा का होईना, पण चांगली उत्तरे सापडू शकतात, असा तिच्या मनात विश्वास निर्माण करा. तिला धीर द्या.
  • मनाममध्ये जिवाचे बरे-वाईट करण्याचा विचार आल्यास ताबडतोब तिने कोणाशी तरी बोलले पाहिजे, हे तिच्या मनावर ठसवा. त्या व्यक्ती कोण असतील ते तिला आठवायला सांगा.
  • ती ज्यांच्याशी आत्महत्येचे विचार बोलून दाखवू शकते त्यांच्याशी संवाद साधा. त्यांनी तिच्या मनातील विचारांबाबत सारखे न बोलता तिला काही मनातले सांगायचे असल्यास भरपूर वेळ द्यावा व बारकाईने तिचे म्हणणे समजून घ्यावे, असे त्या व्यक्तींना सांगा. तातडीने करण्याच्या हस्तक्षेपाचे नियोजन त्यांच्याबरोबर करा.
  • ज्या व्यक्ती स्त्रीच्या आत्महत्येच्या विचारास कारणीभूत असतील, त्या व्यक्तीना चुकूनही तिच्या आत्महत्येच्या विचारांबद्दल बोलू नका. उदाहरणार्थ, सासरी मुलीचा छळ होत असल्यामुळे ती आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते. जर तिच्या सासरी तिच्या मनातील विचारांबद्दल सांगितले, तर कळत नकळत किंवा मुद्दाम तिला आत्महत्येस प्रोत्साहन दिले जाण्याची शक्यता वाढते. तिचा खून करून तिनेच आत्महत्या केली, असेही नंतर ते भासवू शकतात.
  • आत्महत्येचे प्रयत्न करणारी व्यक्ती समाजाला किंवा कुटुंबाला काहीतरी सांगू इच्छित असते. ते समजून घेणे आवश्यक आहे.
  • ज्या परिस्थितीमुळे हे प्रयत्न होत आहेत ती परिस्थिती बदलणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
  • केंद्रामध्ये तिच्याचसारख्या आत्म्हत्येचा विचार करत असलेल्या स्त्रियांचा स्वयंसाहाय्य गट (सेल्फ हेल्फ ग्रुप ) करावा व एकमेकांच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीची संधी उपलब्ध करून द्यावी.
  • मानसोपचारतज्ज्ञ तसेच ‘प्ले थेरपी’ सारख्या ‘थेरपी’ देणाऱ्या तज्ञांशी संपर्क ठेवून चर्चा करावी.

आत्महत्येचे विचार करणा-या स्त्रीला मदत करणा-या जवळच्या व्यक्तींसाठी सूचना

आत्महत्येचे विचार करणाच्या स्त्रीच्या नातेवाईक-मैत्रिणींनी तिला मदत करत असताना तिच्या सुरक्षा नियोजनासंदर्भात पुढील मुद्द्यांचा आधीच विचार करून ठेवणे गरजेचे आहे.

  • तिचे आत्महत्येचे मार्ग कोणकोणते असू शकतात, हे जाणून घेणे.
  • त्यातून जीव वाचवण्याचे उपाय काय असू शकतात, हे आधीच समजून घेणे. (उदा. भाजल्यानंतर अथवा विषबाधा झाल्यावर नेमके काय करायचे असते, इत्यादी)
  • संपर्कासाठी सरकारी दवाखाना, पोलीस स्टेशन, पोलीस पाटील यांचे दूरध्वनी क्रमांक/मोबाईल क्रमांक व पत्ते लिहून ठेवणे.
  • अडचणीच्या वेळी मदतीला उपलब्ध होऊ शकतील अशा व्यक्तींची नावे, पत्ते व दूरध्वनी क्रमांक/मोबाईल क्रमांक लिहून ठेवणे.
  • आत्मघाताचा प्रयत्न झाल्यास स्त्रीला दवाखान्यात नेण्यासाठी गाडी कोणती, ती गाडी उपलब्ध नसेल तेव्हा पर्यायी वाहन व्यवस्था काय असेल, याची जुळवणी करून ठेवणे.
  • संपर्कातील ज्या महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर आपण हे नियोजन करणार आहोत, उदारणार्थ डॉक्टर, गाडी उपलब्ध करून देणारी व्यक्ती इत्यादी. त्या सर्व व्यक्तींची नावे,
  • दूरध्वनी क्रमांक / मोबाईल क्रमांक इत्यादी. मदत देणाऱ्या व्यक्तींकडे असणे आवश्यक आहे.

(संदर्भ – ‘चक्रभेद’ – लेखक – मनीषा गुप्ते, अर्चना मोरे – मासूम प्रकाशन – वर्ष १० डिसेंबर २०१०)