लैंगिक छळ – एक कायदेशीर आढावा

घर आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थ पणे पेलत असताना, आज स्त्री ही अष्टभुजा प्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये तिच्या कर्तृत्वाने मोलाचे योगदान देताना दिसते.

परंतु अनेक आघाड्यांवर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची धडपड करत असताना, तिला अनेक संकटांचा सामना ही करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे “लैंगिक छळ”.

शाळेत, कामाच्या ठिकाणी, अथवा प्रवासात स्त्रियांना, मग ती कोणत्याही वयाची असो, लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. आजच्या घडीला, घराबाहेर पाऊल ठेवणंही असुरक्षित झालं आहे. परिचित अथवा अपरिचित व्यक्तींकडून घरात अथवा घराबाहेर लैंगिक छळ झाल्याच्या बातम्या आपण दररोज वृत्तपत्रांमध्ये, टीव्ही वर पाहात असतो.
तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी अश्या प्रकारचा छळ अनुभवला ही असेल.

अश्या परिस्थितीला तोंड देत असताना, घाबरून न जाता, त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असणं जरुरी आहे. आणि या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे कायद्याची ओळख करून घेणे.

म्हणूनच, आपण या लेखातून, लैंगिक छळाची कायदेशीर परिभाषा, त्याचे प्रकार आणि त्यासाठी भारतीय दंड संहितेत असलेल्या तरतुदी, हे सर्व काही उदाहरणांचा माध्यमातून समजून घेणार आहोत.

उदाहरण १: कीर्ती एका सॉफ्टवेअर कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली एक तरुण आणि तडफदार मुलगी आहे. महत्वपूर्ण कामासाठी रात्री उशिरा पर्यंत ऑफिसात थांबलेली असताना, तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. स्पष्ट शब्दात नकार देऊनही तो बधला नाही. त्याची मागणी किर्तीने पूर्ण न केल्यास तिला नोकरीवरून काढून टाकण्याची आणि तिची बदनामी करण्याची धमकी दिली.

उदाहरण २: जयंती एका कापड कारखान्यात शिवणकाम करून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. काम करत असताना तिचा सहकारी महेश, तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा, अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न करतो तर कधी नकोसे स्पर्श करतो. जयंतीने विरोध करून सुद्धा त्याने त्याचे गैरवर्तन थांबवले नाही.

उदाहरण ३: नीतू पाचवीत शिकणारी एक खेळकर मुलगी आणि तिच्या काकांची लाडकी पुतणी आहे. परंतु घरात कोणी नसताना तिचे काका तिला एका अंधाऱ्या खोलीत घेऊन जातात. तिथं आपल्या शेजारी बसवून तिला तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील सिनेमे व व्हिडिओ पाहायला लावतात. नीतू ने हा प्रकार तिच्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला असता काका घरातले मोठे आणि कर्ते आहेत असे सांगून तिलाच गप्पं करण्यात आलं.

उदाहरण ४: रीमा १५ वर्षांची शाळकरी मुलगी आहे. शाळेत जाताना आणि तिथून परतताना, काही तरुण मुलं अश्लील गाणी म्हणून, शिट्ट्या मारून, तिला उद्देशून अश्लील शेरेबाजी करून तिला त्रास देतात. या त्रासामुळे रीमा शाळेत जायला टाळाटाळ करू लागली आहे.

वरील सर्व उदाहरणांमध्ये घडलेले प्रकार म्हणजेच नकोसे, अश्लील स्पर्श करणे, लगट करणे, शरीर सुखाची मागणी करणे, अश्लील साहित्य, फोटो, व्हिडिओ दाखवणे व अश्लील भाषा वापरणे, लैंगिक टिप्पणी करणे, भा. दं. सं. च्या कलम ३५४(अ) नुसार लैंगिक छळाच्या व्याख्येत मोडतात. पहिले तीन गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून त्यासाठी 3 वर्षांचा सश्रम कारावास व दंड अशी शिक्षा आहे तर शेवट नमूद केलेल्या प्रकारासाठी 1 वर्ष तुरुंगवास व दंडाची शिक्षा आहे.

उदाहरण ५: पल्लवी एक राज्यस्तरीय कबडी पटू आहे. काही दिवसांपूर्वी ग्राउंड वरून घरी येताना तिचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर अनोळखी नंबर वरून तिचा घरचा पत्ता विचारणारे, तिची खासगी माहिती मागणारे निनावी फोन कॉल तिला सतत येऊ लागले. वेळोवेळी तंबी देऊनही कॉल थांबले नाहीत.

या उदाहरणात घडणाऱ्या प्रकाराला ‘Stalking’ असे म्हंटले जाते. कलम ३५४(ड) नुसार, पाळत ठेवणे, पाठलाग करणे, इच्छे विरुद्ध संपर्क करण्याचा, ओळख वाढवण्याचा प्रयत्न करणे, स्पष्ट नकार देऊनही वैयक्तीक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे अथवा, कुठलीही स्त्री इंटरनेट किंवा इंटरनेट वरील इतर माध्यमांचा जसं की ई-मेल व इतर इलेक्ट्रॉनिक संपर्क माध्यमांचा करत असलेल्या वापरावर लक्ष ठेवणे गुन्हा आहे. यासाठी 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे.

उदाहरण ६: अनिसा एक महत्वकांक्षी, एमबीबीएस ची विद्यार्थिनी आहे. ती घरापासून दूर महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. अनिसाच्या वर्ग मित्राने तिच्या हॉस्टेल रूम मध्ये छुपा कॅमेरा लावून तिचे खासगी फोटो काढले. त्याच्याशी संबंध ठेवण्यास अनिसा ने नकार दिल्यास तिचे हे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली.

अश्या प्रकारे खासगी कृत्ये करताना बघणे, निरीक्षण करणे, त्याची छबी टिपणे किंवा अशी छबी त्या स्त्रीच्या परवानगी शिवाय प्रसारित करणे याला कलम ३५४(क) मध्ये ‘voyeurism’ (वोयूरिस्म) असे संबोधण्यात आले आहे. “खासगी कृती” या व्याख्येत अश्या कृत्यांचा समावेश होतो जी करत असताना सामान्यतः गुप्तता किंवा खासगी पणा राखला जातो किंवा तसे करणे अपेक्षित असते, जसं की प्रसाधनगृहाचा वापर करताना किंवा शारीरिक संबंध करताना – जी सामान्यतः सर्वांसमोर केली जात नाहीत . यासाठी 3 ते 7 वर्षांचा कारावास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

याशिवाय, कलम ३५४(ब) नुसार स्त्रीला विवस्त्र करण्याच्या हेतूने हल्ला करणे, किंवा शारीरिक बळाचा वापर करणे, अश्या कृत्यांमध्ये सहाय्य करणे अथवा तिला विवस्त्र होण्यास भाग पाडणे या प्रकारच्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा सांगण्यात आली आहे. हा गुन्हा अजामिनपात्र आहे.

स्त्रीचा विनयभंग करण्याच्या हेतूने केलेला हल्ला किंवा बलप्रयोग यासाठी कलम ३५४ अन्वये 2 वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.

कायद्याची माहिती असणे हे अत्याचाराविरुद्धच्या लढाईतले आपले पहिले शस्त्र असते. आशा आहे की हा लेख वाचून आपण ते आपल्या भात्यात समाविष्ट केले असेल !

लेखक – ईशा तोडकर
तृतीय वर्ष, बी.ए.एलएल.बी,
आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे


[1] “Handbook on sexual harassment of women at workplace”, महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार.

[2] “भारतीय दंड संहिता, १८६०”, ॲड. प. या. चांदे, प्रा. रा. शा. गोऱ्हे