अनैतिक मानवी व्यापार, वेश्याव्यवसाय संबंधी

प्रत्येक व्यक्तीचा जगणे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत अधिकार आहेत. याबरोबरच मुख्य गरज असते प्रेमाची. पण आजही शेकडो लोक काही मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. विशेषतः लहान मुलं व स्त्रिया शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचाराला बळी पडत आहेत.

अनैतिक देहव्यापार

जबरदस्तीने, बळजबरी करण्याची धमकी देऊन, पळवून नेऊन, फसवून, खोटे बोलून जर एखाद्या व्यक्तीला वेश्याव्यवसायासाठी ताब्यात घेणे, तिची वाहतूक करणे, वेश्याव्यवसायास लावणे, त्या व्यक्तीला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्यास मदत करणे, यासाठी त्या व्यक्तीच्या दुर्बलतेचा, असहायतेचा गैरफायदा घेणे, स्वतःच्या सत्तेचा, ताकदीचा गैरवापर करणे या कृत्यांचा समावेश अनैतिक देहव्यापारामध्ये होतो. एखादी व्यक्ती ज्यांच्या ताब्यात आहे त्यांची त्या व्यक्तीला वेश्याव्यवसायास लावण्यासाठी परवानगी घेताना पैशांची देवाण-घेवाण करणे, एखाद्या व्यक्तिला वेश्याव्यवसायास लावण्यासाठी परवानगी देताना त्यापासून काहीतरी लाभ मिळवणे, आर्थिक फायदा करून घेणे यालाही अनैतिक देहव्यापारच म्हणतात.

अपहरण, जबरदस्ती, दहशत, भीती, लबाडी, मारहाण, कट-कारस्थान अशा कोणत्याही मार्गाने वेश्याव्यवसायास खतपाणी घालणे हा गुन्हाच आहे.

मानवी देहव्यापाराच्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या व्यक्तीस कमीत कमी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होते. या गुन्ह्यासाठी दुस-यांदा दोषी आढळल्यास आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

अनैतिक मानवी व्यापारात खरेदी-विक्री करून आणलेल्या स्त्रीचे लैंगिक शोषण करण्याच्या हेतूने कुंटणखान्यात जाणारी व्यक्ती किंवा कुंटणखाण्यात आढळणारी व्यक्ती सुद्धा गुन्हेगार आहे.

कुंटणखान्यात आल्याबद्दल पहिल्यांदा दोषी आढळलेल्या व्यक्तीस तीन महिन्यांपर्यंत कैद किंवा रू. २०,००० पर्यंत दंड किंवा दंड व कैद अशा दोन्ही प्रकारे शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्यामध्ये दुस-यांदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा दोषी आढळलेल्या व्यक्तीस सहा महिन्यांपर्यंत कैद आणि रू. ५०,००० पर्यंत दंड अशा दोन्ही प्रकारे शिक्षा होऊ शकते.

वेश्याव्यवसाय करून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कुंटणखान्यात किंवा अन्यत्र डांबून ठेवणे हाही गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी कमीतकमी सात वर्षे ते आजीवन कारावासाची शिक्षा तसेच एक लाख रूपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते.

एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवून तिने स्वतःची सुटका करून घेऊ नये म्हणून तिचे दागिने, कपडे वगैरे वस्तू स्वतःच्या ताब्यात ठेवणे, तिने स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्यास तिच्यावर कारवाई केली जाईल अशी तिला धमकी देणे असे घडत असेल तर त्या व्यक्तीला तिचे लैंगिक शोषण करण्याच्या हेतूने डांबून ठेवले आहे असे गृहित धरले जाईल.

धार्मिक स्थळे, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था वगैरे सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करणे, गि-हाईकांना आकर्षून घेण्यासाठी प्रयत्न करणे हा गुन्हा आहे.

सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायास परवानगी देणे किंवा वेश्याव्यवसाय केला जातो याची माहिती असूनही त्याला विरोध न करणे हा गुन्हा आहे. संबंधित सार्वजनिक ठिकाणाच्या व्यवस्थापकांना त्याबद्दल दोषी मानले जाईल.

आपल्या ताब्यात, नियंत्रणाखाली असलेल्या व्यक्तींना जसे की, आश्रमशाळांतील मुलींना त्या शाळेच्या व्यवस्थापक किंवा अन्य अधिका-यांनी वेश्याव्यवसायास लावणे किंवा देहविक्रय करण्यास व भाग पाडणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.

अल्पवयीनांसंदर्भातील पुढील कृत्ये फक्त बेकायदेशीरच नाही तर गुन्हेगारी स्वरूपाची आहेत –
  • वेठबिगारीस ठेवणे,
  • घरगुती कामाकरिता राबविणे, शेतीकरिता, बांधकाम, हॉटेल्स वगैरे ठिकाणी राबविणे,
  • अंमली पदार्थाची ने-आण करणे वगैरेसारख्या बेकायदेशीर-गुन्हेगारी स्वरूपाच्या कामांसाठी त्यांचा वापर करून घेणे,
  • भीक मागण्यास भाग पाडणे,
  • त्यांच्या अवयवांचा व्यापार करणे,
  • जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करायला लावणे,
  • सामाजिक व धार्मिकरित्या पवित्र मानल्या गेलेल्या पध्दतीत वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे. उदा. मुरळी, देवदासी इ.
  • उत्तेजक साहित्य, पोर्नोग्राफी – चित्रे, व्हिडीओ तयार करण्यासाठी वापर करणे. उदा. नग्न फोटो काढणे, फिल्म तयार करणे, विकृत लैंगिक संबंधांचे चित्रण करणे इ.
  • मनोरंजनासाठी नाचकाम, उंटांची शर्यत वगैरे कामांमध्ये त्यांचा वापर करणे, वगैरे

अशा कृत्यांसाठी कायद्यांमध्ये गंभीर शिक्षेची तरतूद आहे.

वेश्याव्यवसायाला व्यवसाय म्हणून मान्यता मिळावी असे वेश्यासंघटनांचे म्हणणे आहे.

वेश्या होणे हा व्यवसाय असल्याने वेश्येवर तिच्या मनाविरूद्ध अत्याचार करणे हाही गुन्हा मानला गेला पाहीजे.