मृत्युपत्र /इच्छापत्र

आपल्या संपत्तीचे/इस्टेटीचे आपल्या मृत्युनंतर स्वतःच्या इच्छेनुसार वाटप व्हावे, यासाठी इच्छापत्र केले जाते यालाच मृत्युपत्र असेही म्हटले जाते.
मृत्युपत्र हे स्थावर (जमीन, घर ईत्यादी) आणि जंगम (दागिने, रोकड, वस्तू ईत्यादी) दोन्ही प्रकारच्या संपत्तीचे केले जाते.

हा कायदेशीर दस्तऐवज असतो.

कोणाही सज्ञान, म्हणजे १८ वर्षांवरील व्यक्तीने, समजून-उमजून, सदसद् विवेकबुध्दीने करायचे असते. मृत्युपत्र कोणाच्याही दबावाने, धाकाने किंवा जिवाच्या भीतीने केले जाऊ नये. असे मृत्युपत्र बेकायदेशीर मानले जाते.

मृत्युपत्र कोण करू शकते?

संपत्तीची मालक असलेली कोणीही सज्ञान व्यक्ती स्वतःच्या मालकीच्या संपत्तीचे इच्छापत्र बनवू शकते.

स्त्रीला वडिलोपार्जित संपत्तीची भावाच्या बरोबरीने मिळणारा हिस्सा, स्वतः कमावलेले पैसे किंवा स्वतः कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली दागिने, वस्तू, घर, जमीन यासारखी मालमत्ता, पतीने-मुलीमुलांनी, सासर-माहेरच्या नातेवाईकांनी किंवा मित्र-मैत्रिणींनी बक्षीस म्हणून दिलेल्या चीजवस्तू, वगैरे संपत्ती ही स्त्रीची स्वतःच्या मालकीची संपत्ती आहे सबब त्या संपत्तीचे स्त्री स्वतःच्या मर्जीने इच्छापत्र करू शकते.

स्वतः कमविलेल्या संपत्तीचे मृत्युपत्राद्वारे वाटप कोणालाही करता येऊ शकते. स्वतःची मुले-मुली, रक्ताचे नातेवाईक यांच्याव्यतिरीक्त इतर कोणालाही, धर्मादाय संस्थेला, सामाजिक कामासाठी सुद्धा याचे वाटप करता येऊ शकते.

इच्छापत्र किंवा मृत्युपत्र करण्यासाठी स्त्रीला तिचा पती, मुले-मुली, आई-वडील, वगैरेंच्या संमतीची आवश्यकता नाही.
  • एकदा केलेले इच्छापत्र पूर्णपणे किंवा अंशतः बदलता येते.
  • इच्छापत्र कितीही वेळा बदलता येते.
  • व्यक्ती हयात असताना संपत्तीची वाटणी होते, त्याला इच्छापत्र म्हणत नाहीत. इच्छापत्र हे व्यक्तीच्या मृत्युनंतर प्रत्यक्षात कृतीत किंवा अमलात येऊ शकते.
  • इच्छापत्र करण्यासाठी कुठल्याही ठराविक एका अर्जाची किंवा पध्दतीची गरज नसते.इच्छापत्र करणा-या व्यक्तीने ते तिला समजत असलेल्या कोणत्याही भाषेत करावे..
  • इच्छापत्र करणा-या व्यक्तीने स्वतःच्या अक्षरात लिहिले असेल पण त्यावर त्याने सही केलेली नसली, तरी ग्राह्य धरले जाते किंवा कायदेशीर मानले जाते.
  • इच्छापत्रातील काही भाग इतर व्यक्तीने लिहिला असेल व त्यावर इच्छापत्र करणा-याचीसही असेल, तरी ते ग्राहय धरले जाते किंवा कायदेशीर मानले जाते..
  • मात्र इच्छापत्रामध्ये मृत्युनंतर वाटप करण्याच्या संपत्तीचे अचूक वर्णन केले जाणे आवश्यक आहे. म्हणजेच जमीन असल्यास त्या जमिनीचा गट नंबर किती, चतुःसीमा कोणत्या, क्षेत्र किती, घर असल्यास ती कच्चे-पक्के किंवा कसे आहे, किती क्षेत्रफळ आहे, दागिने असल्यास सोन्या-चांदीचे-हि-याचे किंवा कसे आहेत, किती वजनाचे आहेत, काय दागिने आहेत. इच्छापत्र करतेवेळी संपत्ती कोणाच्या ताब्यात आहे, वगैरे तपशील अचूक लिहिणे आवश्यक आहे.
  • इच्छापत्रावर दोन साक्षीदारांची सही असणे गरजेचे आहे. हे साक्षीदार नातेवाईकच असावेत असा नियम नाही.
  • इच्छापत्र करण्यासाठी कुठलीही स्टॅम्प ड्यूटी किंवा फी भरावी लागत नाही.
  • जर एखादया सैनिकाने आपले इच्छापत्र करण्यासंबंधी लेखी सूचना दिल्या असतील व इच्छापत्र पूर्ण होण्याआधीच जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याने दिलेल्या लेखी सूचना याचकायदेशीर इच्छापत्र म्हणून मानण्यात येतात.
  • जर आधीचे इच्छापत्र फाडले, जाळले किंवा ते बदलले असण्यासंबंधी लेखी सूचना किंवा पत्र असल्यास ते इच्छापत्र कायदेशीररीत्या रद्द झाले असा अर्थ होतो.
  • विशेष व्यक्ती, म्हणजे मूक-बधीर, दृष्टिहीन व्यक्तीदेखील इच्छापत्र करू शकतात. जर वृद्ध, आजारी किंवा मनोरूग्ण व्यक्ति इच्छापत्र करणार असेल, तर ते करतेवेळी ती शुद्धीवर आहे, ती करत असलेल्या इच्छापत्राचा अर्थ समजण्याची क्षमता तिच्याकडे होती, म्हणजेच इच्छापत्र करतेवेळी मानसिक-शारीरिक दृष्ट्या ती सक्षम आहे असा तज्ज्ञ डॉक्टरांनी दाखला द्यावा लागतो.