विवाहासंदर्भातील गुन्हे

1. दुसरा विवाह

पती किंवा पत्नी हयात असताना, किंवा पहिल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतलेला नसताना दुसरा विवाह करणे हा गुन्हा आहे.
पहिल्या पत्नीने पतीस दुस-या विवाहास तोंडी अथवा लेखी संमती दिली, तरीही दुसरा विवाह हा गुन्हाच आहे.

शिक्षा

भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९४ अनुसार असा विवाह करणा-या व्यक्तीस सात वर्षांपर्यंत तुरूंगवास, तसेच दंड अशी शिक्षा होऊ शकते.
या प्रकारचे गुन्हे असतात व ते न्यायालयाबाहेर तडजोडीने मिटविता येऊ शकत नाहीत.

2. फसवून दुसरा विवाह

पहिला विवाह झालेला असल्याची माहिती दुस-या जोडीदारापासून लपवून ठेवून त्याच्याशी/तिच्याशी दुसरा विवाह लावणे हा ही गुन्हा आहे.

शिक्षा

भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९५ अनुसार असा गुन्हा करणा-या व्यक्तीस दहा वर्षांपर्यंत तुरूंगवास, तसेच दंड अशी शिक्षा होऊ शकते.
या प्रकारचे गुन्हे अदखलपात्र, जामिनपात्र असतात व ते न्यायालयाबाहेर तडजोडीने मिटविता येऊ शकत नाहीत.

3. फसवे विवाह विधी करून घेणे

फसवणुकीच्या उद्देशाने, अप्रामाणिकपणे विवाहाचे खोटेच विधी लावून घेणे हा गुन्हा आहे.

शिक्षा

भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९६ अनुसार असा गुन्हा करणा-या व्यक्तीस सात वर्षांपर्यंत तुरूंगवास, तसेच दंड अशी शिक्षा होऊ शकते.
या प्रकारचे गुन्हे अदखलपात्र, जामिनपात्र असतात व ते न्यायालयाबाहेर तडजोडीने मिटविता येऊ शकत नाहीत.

4. बालविवाह

विवाहासाठी वराचे वय कमीत कमी २१ वर्षे पूर्ण व वधूचे वय कमीत कमी १८ वर्षे असावे लागते. वर किंवा वधू यांपैकी कोणीही २१ किंवा १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्यास तो विवाह म्हणजे बालविवाह हा गुन्हा आहे.

  • बालविवाहातून जन्मास आलेली संतती ही कायदेशीरच मानली जाते.
  • बालविवाह बेकायदेशीर ठरविता येतो.
  • बालविवाहाचे नियोजन होते आहे, हे समजताच न्यायालयास योग्य ती माहिती देऊन न्यायालयाकडून अशा बालविवाहास मनाई हुकूम घेता येतो.
  • मनाई हुकूम मिळाल्यानंतरही लावण्यात आलेला विवाह हा बेकायदेशीरच असतो.
शिक्षा
  • बालविवाह केल्याबद्दल १८ वर्षे पेक्षा जास्त आणि २१ वर्षांच्या आतील पुरूषास दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास, किंवा एक लाख रूपयांपर्यंत दंड, किंवा तुरूंगवास आणि दंड अशा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते.
  • बालविवाह लावणारे पुरोहित, अशा विवाहास प्रोत्साहन देणारे नातेवाईक, बालविवाह ठरविणारे मध्यस्थ यांनाही दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास आणि एक लाख रूपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते.
  • बालविवाहामधील अज्ञान वर अथवा अज्ञान वधू यांच्या पालकांनी बालविवाह लावणे, बालविवाहास प्रोत्साहन देणे, तसेच तो थांबविण्याचा प्रयत्न न करणे हा ही गुन्हा आहे. अशा गुन्ह्याबद्दल त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास आणि एक लाख रूपयांपर्यंत दंड अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते.
5. विवाहितेचा छळ

पती किंवा पतीच्या नातेवाईकांनी विवाहीत स्त्री चा छळ करणे हा गुन्हा आहे.

शिक्षा

भारतीय दंडविधान संहिता कलम ४९८ अ अंतर्गत विवाहितेचा छळ करणा-या पती किंवा पतीच्या नातेवाईकांना या गुन्ह्याबद्दल तीन वर्षांपर्यंत तुरूंगवास व दंड अशी शिक्षा होऊ शकते.

6. हुंडाबळी

विवाहित स्त्रीचा तिच्या विवाहानंतर सात वर्षांच्या आत संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला व तिच्या मृत्यूपूर्वी तिला हुंड्यासाठी छळले जात होते असे निष्पन्न झाले तर तिचा पती व सासरचे नातेवाईक तिच्या मृत्यूस जबाबदार आहेत असे गृहीत धरण्यात येते.

शिक्षा

भारतीय दंडविधान संहिता कलम ३०४ ब अंतर्गत वरील गुन्ह्याबद्दल पती व संबंधितांना कमीत कमी सात वर्षे व जास्तीत जास्त आजीवन कारावास अशी शिक्षा होऊ शकते.
या कलमाअंतर्गत गुन्हे दखलपात्र, अजामिनपात्र असतात व न्यायालयाबाहेर परस्पर तडजोडीने मिटवता येत नाहीत.

7. आत्महत्येस प्रवृत्त करणे

एखाद्या व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे हा गंभीर गुन्हा आहे. विशेषतः बायको मनासारखी नाही व कुटुंबाच्या दबावामुळे तिच्यापासून घटस्फोटही घेता येत नाही, म्हणून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे, बायकोच्या चारित्र्यावर संशय आहे म्हणून मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गंभीर गुन्हा आहे.

शिक्षा

भारतीय दंडविधान संहिता कलम ३०६ अंतर्गत वरील गुन्ह्याबद्दल पती व संबंधितांना दहा वर्षांपर्येंत तुरूंगवास व दंड अशी शिक्षा होऊ शकते.
या कलमाअंतर्गत गुन्हे दखलपात्र, अजामिनपात्र असतात व न्यायालयाबाहेर परस्पर तडजोडीने मिटवता येत नाहीत.