स्त्री – पुरुष असमानताचे बाळकडू

सहजच जाता जाता लहान मुलांकडे लक्ष गेलं. मुलांची आजी त्यांना खेळ शिकवत होती. कुतूहल निर्माण झाले आणि तिथेच थोडा वेळ थांबलो आणि पाहू लागलो.

“हे बघा लेकरांनो माझ्या बी आजीनं ह्यो खेळ सांगितला हाय मला, ध्यान द्या, ३ दगड घ्या बरं.” आजी मुलीला उद्देशून म्हणाली; पण दगड आणले मुलाने आणि म्हणाला “मला माहीत आहे, ह्याची चूल करायची ना, माझी माय करते तशी.” आजी जरा तिरस्कारानेच म्हणाली “अरे, हा भातुकली चा खेळ. मुलींनी खेळावा, चूल मांडावी, स्वयंपाक करावा.”

ही घटना तशी नवी नाही पण रोज पाहत होतो तेव्हा मुलगा खेळत नसे हा खेळ. आज मुलगा खेळायची इच्छा दाखवत होता तर त्याला त्याच्या आजीने थांबवलं. लहानपणीच त्याच्या वर बिंबवलं जात होतं की भातुकली चा खेळ, घर सांभाळणं, स्वयंपाक करणे ही मुलींची कामं. या आणि अश्या अनके रोजच्या प्रसंगातून आपण स्त्री पुरुष असमानतेचे बीज पेरत असतो. आजुबाजुच्या वातावरणात जसे निरनिराळे वायू आहेत तसंच स्त्री पुरुषांमधील भेदभाव निरनिरळ्या विचारधारणेत आहे. याची जाणीव मात्र आपल्याला होत नसते कारण ती होऊ दिली जात नाही.

स्त्री पुरुष असमानतेचा प्रभाव बाल मनावर पडत असतो. त्याचं स्वरुप वाढत्या वयानुसार व्यापक होत जातं. या भेदभावाची सुरुवात आपल्याच आजूबाजूला, काही रूढीं, परंपरा, विचार व अचारात भिनली आहे. स्त्री अत्याचार आजही थांबला नाहीये. हुंडा घेणे, घरातील स्त्रियांचा अपमान करणे, त्यांना मारहाण करणे, मानसिक त्रास देणे या गोष्टी आजही आपल्या आजूबाजूला सर्रास घडताना दिसतात. या गोष्टी आपल्या घरात घडताना मुळे बघतात आणि पुढे त्याचेच अनुकरण करतात.

‘कधी शारदा तु कधी लक्ष्मीकधी भाविनी वा कधी रागिणी’

या ओळी स्त्रियांना समर्पित आहेत. पण याच स्त्रियांना जेव्हा शोषिकतेचे धडे शिकवले जातात तेव्हा ही वाक्य फक्त दाखवण्यासाठीच आहेत असं वाटतं. वडीलधाऱ्या मंडळींनी, पालकांनी जर समानतेचे धडे शिकवले तर स्त्री – पुरुषांमधील भेदभाव कमी होऊन एक समान समाज निर्माण करणे शक्य होईल.

मुलींनाही पाठवा कि शाळेत

शिकवा कि त्यांना पण स्व संरक्षण करायला

खेळू द्या त्यांना पण क्रिकेट

करु द्या की मुलींना पण नोकरी,

राहूद्या कि त्यांना पण आपल्या पायावर ऊभं

द्या की महिलांना आदर घरोघरी.

 

खेळू द्या कि मुलांना पण भातुकली,

शिकवा की स्वयंपाक मुलांना,

स्त्री घर सांभाळते म्हणून तर घराची सर्व घडी व्यवस्थीत असते ना?

कधी मुलांना ही घालू द्या की कपड्यांच्या घड्या,

मुलांना ही शिकवा झाडुन काढायला,

कळू द्या त्यांना पण रडणे हे बायकीपणाचे नाही तर माणूस असण्याचे लक्षण आहे

सांगा त्यांना ‘न रडण्यात’ खरा पुरुषार्थ नसून ‘न रडवण्यात’ आहे.

शेवटी काय सुरुवात तर मोठ्यांनीच केली पाहिजे ना.? मग अनुकरण करतील की मुलं जसं च्या तसं. समानतेच्या विचारांचं बाळ कडू लहानपणीच मुलांना द्या. मग बघू का कमी होत नाही भेदभाव, असमानता आणि स्त्री अत्याचार. आणि तरी ही काही प्रमाणात राहिलाच हा असमानतेचा रावण तर प्रशासन, तुम्ही, आम्ही सर्वजण मिळुन करु की त्याचं दहन.

पालक म्हणून आपण असमानता मिटवण्यासाठी काय करू शकतो

लहानपणीच जर असमानता मुलांमध्ये रुजू द्यायची नसेल तर –

) मुलांना समानतेचे महत्व सांगा. 

मुलांना घरातून समानतेचे धडे मिळाले तर ते जास्त परिणाम कारक ठरेल.

) स्वतः समानतेचे पालन करा.

लहान मुलं ही अनुकरण करत असतात. पालकांनी जर समानतेचे अनुकरण केले तर त्याचे पालन मुले देखील करतील.

) दैनंदिन कामात मुलांना सहभागी करा. 

आपण कुठलेही काम सांगताना ते काम मुलीला सांगायचे आहे कि मुलाला हे विचारात ठेवून काम सांगत असतो. असे न करता सर्व कामात मुलगा अथवा मुलगी दोघांना समान सहभागी करा.

) मुलांना बोलतं करा. 

पुष्कळवेळा मुलं समानते विषयी प्रश्न विचारतात. त्यांना रागाने बोलून गप्प न करता संयमाने बोलून त्यांचे समाधान करा.

मुलगा मुलगी एक समान, मनात ठेवा याचे कायम ध्यान

जग आता समानतेचे महत्व पटवून देत आहे. आपण ही जगा सोबत जाऊयात असमानता नष्ट करूयात.

लहानपणी समानतेचे देऊ बाळ कडू, चला सगळे मिळून असमानते विरुद्ध लढू

– तेजस तेली

आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे

(बी.ए.एलएल.बी – तृतीय वर्ष)