कागदपत्रांची जुळवणी

महत्त्वाची कागदपत्रे
हिंसाचार होण्याची चाहूल लागताच पुढील सर्व कागदपत्रे अथवा त्याच्या अधिकृत प्रती तुमच्याकडे आहेत, याची खात्री करून घ्या.
  1. लग्नपत्रिका
  2. लग्नातील महत्त्वाच्या विधींचे फोटो (लाजाहोम, सप्तपदी निकाह, परिणय इत्यादी)
  3. लग्नाची नोंद ग्रामपंचायत अथवा संबंधित कार्यालयामध्ये झाली असल्याचा पुरावा.
  4. लग्नामध्ये, लग्नापूर्वी अथवा लग्नानंतर पण लग्नासंदर्भात मिळालेल्या भेटवस्तू, आहेर, रुखवत इत्यादींची यादी.
  5. लग्नाच्या निमित्ताने किंवा लग्नापूर्वी घेतलेल्या आणि तुमच्या अंगावर असलेल्या दागिन्यांची यादी, दागिनेखरेदी पावत्या.
  6. सासरच्या घराचे कागदपत्र, शेतजमिनीचे उत्तारे, इतर काही स्थावर व जंगम मालमत्ता असेल त्याची कागदपत्रे.
  7. घरातील भांडणामध्ये तुमच्याकडे पैशाची मागणी केली असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारे धमकी दिली असेल किंवा या संदर्भात एखादे पत्र, चिठ्ठी लिहिली असेल किंवा तुम्ही त्याबद्दल कोणाला लिहून कळवले असेल तर तो लेखी पुरावा.
  8. घरातील माणसांबद्दल, भांडणाबद्दल, तुम्ही कोणाला पत्राने, चिठ्ठीतून लिहून कळवले असल्यास ते पत्र किंवा चिठ्ठी.
  9. तुमच्या जन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा पुरावा.
  10. मुलांचा जन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा दुसरा कोणताही पुरावा.
  11. सासरचे रेशनकार्ड, मतदारयादी अशा कोणत्याही ठिकाणी तुमचे नवऱ्याबरोबर नाव नोंदवले गेले असल्यास ते कार्ड
  12. घरातील कोणाच्या लग्नपत्रिकेमध्ये तुमचे नवऱ्याबरोबर नाव असेल अशी लग्नपत्रिका,
  13. शिक्षण अथवा नोकरी असेल तर शिक्षणाची प्रमाणपत्रे, नोकरीचा पुरावा, पगाराची पावती वगैरे.
  14. बँक, पतसंस्था, फंड, बचतगट अशा ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे, पासबुक.
या कागदपत्रांचे करायचे काय?
  1. वरीलपैकी जी कागपत्रे तुम्हाला मिळू शकणार नाहीत त्या कागदपत्रांबद्दलचा तपशील तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा.
    उदा. ७/१२ चा उतारा. तो न मिळाल्यास, जमिनीचा गट क्रमांक, जमीन बागायत आहे की जिरायत, किती आहे, किती लांबीचे तुकडे आहेत, पाण्याचा हिस्सा कोणाला, किती आहे, वाटेकरी किती आहेत, जमिनीच्या चतु:सीमा कोणत्या वगैरे माहिती बारकाईने लिहून ठेवा,
  2. नवऱ्याच्या नोकरीतून पगारपत्रक मिळत असेल तर जपून ठेवावे, पण ते मिळत नसेल तरी नवरा कुठे काम करतो तेथील मालकाचे नाव, पत्ता, फोन नंबर, पगाराची रकमेचा, पगारातून कापल्या जाणाऱ्या रक्कमेचा तपशील, पगारातून परस्पर केलेली गुंतवणूक हेही तपशील समजून घ्या. इतर वेळी महत्त्वाचे न वाटणारे हे तपशील ऐनवेळी आठवत नाहीत म्हणून लिहून ठेवावे.
  3. मिळालेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढाव्यात, नोटरी किंवा विशेष दंडाधिकाऱ्यांची सही व शिक्का झेरॉक्स प्रतीवर असावा.
  4. प्रत्येक कागदपत्राची एक प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.
  5. मूळ कागदपत्रे माहेरी, संस्थेत, मैत्रिणीकडे किंवा तुम्हाला सुरक्षित वाटेल अशा कोणत्याही व्यक्तीकडे ठेवावीत.
  6. कागदपत्रे सांभाळण्यासाठी देतानाच संबंधित व्यक्तीला समजावून सांगा की त्यातील प्रत्येक कागद अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी ही कागदपत्रे तुमच्याशिवाय कोणालाही द्यायची नाहीत, तसेच त्यांच्याकडे अशी काही कागदपत्रे आहेत हे त्यांनी इतर कोणाला सांगायचेही नाही.
  7. तुम्ही ज्या व्यक्तीकडे कागदपत्रे दिली आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला कालांतराने काही शंका/संशय आल्यास त्यांच्याकडून कागदपत्रे परत कशी घेणार आणि नंतर कोणाकडे कागदपत्रे देणार याचा विचार त्या व्यक्तीच्या हातात कागदपत्रे प्रत्यक्ष देण्यापूर्वीच करायला हवा.
  8. ज्या व्यक्तीकडे कागदपत्रे आहेत तिने चुकून दुसऱ्या कोणाला तरी सांगितले तर कागदपत्रांची जागा बदलण्याचे नियोजन ताबडतोब करा.

संदर्भ – ‘चक्रभेद’ – लेखन मनीषा गुप्ते, अर्चना मोरे मासूम प्रकाशन वर्ष १० डिसेंबर २०१०