सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून सुरक्षा नियोजन

कौटुंबिक हिंसेव्यतिरिक्त समाजात सार्वजनिक ठिकाणी मुली व स्त्रियांच्या होणा-या लैंगिक छळाबाबत काही सूचना पुढील टप्प्यात दिल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी लैंगिक छळ किंवा धमक्या

शाळा, महाविद्यालये, नोकरीचे ठिकाण, शासकीय अथवा खासगी कार्यालये, दवाखाना, शेत, मजुरीला जाते ती जागा, नातेवाइकांच्या घरात, पाहुण्यांच्या गावात, स्वतःच्या गावात, रस्त्यावर, बसमध्ये किंवा बसस्टॅडवर, लग्नसमारंभात, अशा बहुसंख्य ठिकाणी आपण वावरत असतो. या वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांचा अपमान किंवा लैंगिक छळणूक होत असल्याचे आपण ऐकतो, पाहतो, अनेकदा स्वतः अनुभवतोही. समाजामध्ये बहुसंख्य मुली-स्त्रियांचा लैंगिक छळ होत असतो. बलात्कार, लैंगिक शोषण, लहान मुलींशी गैरवर्तन वगैरे गुन्हे ओळखीच्या आणि नेहमीच्या संपर्कातल्या व्यक्तींकडून जास्त प्रमाणात घडत असतात.

आपल्याला कोणी काही त्रास देत असेल, तर त्यामध्ये आपण मुळीच दोषी नसतो. निर्भीडपणे अशा प्रसंगांना सामोरे गेले पाहिजे, त्याबद्दल उघडपणे बोलायला शिकले पाहिजे व संरक्षणाच्या नावाखाली घरात बसून न राहाता शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या या छळाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे.

(खालील वाक्यांवर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या … )

लैंगिक छेडछाडीच्या वेळी लक्षात घेण्याचे मुद्दे.
  • तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती एक असो वा अनेक. त्यांची नावे, चेहरे हे बारकाईने लक्षात ठेवा.
  • ह्या त्रासावर कायदेशीर कारवाई करण्याचा तुमचा निर्णय झाला, तर जवळपासचे महिला मंडळ/पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवा.
  • कार्यालय, हॉस्पिटल / दवाखाना किंवा शाळा वगैरे संस्थांतील कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाले असल्यास संबंधित संस्थेच्या प्रमुखांकडे तक्रार नोंदवा. गुन्हा गंभीर नसला, तरी संस्थाप्रमुखांना घडलेल्या प्रसंगाची माहिती द्या. त्यांना संबंधित व्यक्तीच्या वर्तणुकीबद्दल कल्पना दिली असता त्या व्यक्तीने पुन्हा इतरांना त्रास देऊ नये याची काळजी घेणे तरी संस्थाप्रमुखांना शक्य होईल.
  • कुठेही अर्ज देता न आल्यास कमीत कमी स्वत:कडे या घटनेबद्दलचा सविस्तर तपशील लिहून ठेवा. त्यामध्ये त्रास दिला त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, कोणत्या प्रकारचा त्रास दिला, कुठे असताना, किती वाजता, किती वेळा त्रास दिला हे सर्व मुद्दे लिहून ठेवा.
  • त्या व्यक्तीने पुन्हा त्रास दिल्यास कोणाला कळवायचे याचे नियोजन करावे.
  • ती व्यक्ती गावातील रहिवासी आहे, कोणाची नातेवाईक आहे, की गावामध्ये काही कामासाठी आली होती, याची बारकाईने नोंद घ्यावी. म्हणजे त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करताना तिचा पत्ता सांगणे सोपे जाईल.
  • ती व्यक्ती दुसऱ्या गावातील असेल तर तेथील सरपंच, पोलीस पाटील, महिला मंडळाचे सदस्य इत्यादींची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक आपल्याकडे लिहून ठेवा.

आपला व त्रास देणाऱ्या व्यक्तीचा दररोज येण्याजाण्याचा रस्ता एकच असेल तर घ्यायची काळजी
  • त्या व्यक्तीसमोर खाली मान घालून, खांदे पाडून चालू नका. अपराध त्याने केलेला आहे. खाली मान त्याने घातली पाहिजे. आपण धिटाईने, ताठ मानेने चालले पाहिजे.
  • आपण त्रास देणाऱ्याची खूपच धास्ती घेतली असेल तर वयाने मोठी व अनुभवी व्यक्ती बरोबर असताना प्रवास करा. पण कालांतराने आपल्या मनातील भीती घालवण्याचा आटोकाट प्रयत्न आपण केलाच पाहिजे.
  • इतर व्यक्तींची सोबत मनातली भीती दूर होईपर्यंतच घ्यायची असते. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराबाहेर पडलो असता, त्रास देणाऱ्या व्यक्तींचा सामना करावा लागणारच. त्यांना घाबरल्याने आपल्याला स्वतःवर बंधने घालून घेऊन घरात बसावे लागेल आणि त्रास देणारी व्यक्ती मात्र नवीन सावज शोधेल, त्यामुळे मनाची तयारी करून त्रास देणाऱ्या व्यक्तींचा सामना केलाच पाहिजे.

त्रास किंवा धमकीनंतर काय करावे याबाबत
  • आपल्याला धमकी मिळाली असेल, तर त्या धमकीला आपण घाबरलेलो नाही असाच आपला वावर असावा.
  • आपण त्रास देणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करूनही त्रास देणे वाढत असेल किंवा आपण केलेले दुर्लक्ष म्हणजे आपला दुबळेपणा आहे असे त्या व्यक्तीला वाटत असेल तर गावकरी, महिला मंडळ, पोलीस स्टेशन यांच्यासमोर तुमची समस्या धीटपणाने मांडा.
  • न लाजता, न घाबरता आपल्याबाबत घडलेला प्रसंग सांगा.
  • घटनेबद्दल निवाडा होईपर्यंत व तुमच्या मनातून या विषयाबद्दलची भीती जाईपर्यंत थोडे दिवस शक्यतो एकटे राहाणे टाळा. अशा बाबतीत भित्रेपणाने वागणे जसे उपयोगाचे नाही तसेच अति धिटाईचे वागणे हेही आपल्याच अंगाशी येऊ शकते त्यामुळे सावधगिरी बाळगणे हा योग्य उपाय असतो.
  • आपल्याला होणाऱ्या लैंगिक छळाबद्दल कोणाला सांगितल्यास त्रास वाढेल असे मुलींना वाटू शकेल. तशा प्रकारच्या धमक्याही त्यांना दिल्या जातात. जीवे मारण्याचीही धमकी दिली जाते. अशा धमक्यांना न घाबरता घडलेल्या प्रसंगाबद्दल विश्वासातल्या व्यक्तींना जरूर सांगा.
  • आई-वडिलांना सांगितल्यावर ते आपले शिक्षण, नोकरी बंद करतील अशी भीती वाटत असली तरीही अशा गोष्टी पालकांना सांगाव्यात. त्यांनी आपले शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतल्यास विश्वासातील शिक्षिकेला, जवळच्या महिला मंडळ कार्यकर्तीला कळवा. आई-वडिलांची समजूत काढण्यासाठी त्यांची मदत घ्या.
  • कार्यालय, हॉस्पिटल, दवाखाना, स्वयंसेवी संस्था वगैरे ठिकाणी तुम्हाला विपरीत अनुभव आल्यास ही बाब त्या ठिकाणच्या प्रमुखाच्या लक्षात आणून द्या.
  • ऐनवेळी कठीण प्रसंगात स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागते. यासाठी स्वसंरक्षणाच्या काही सोप्या पद्धती प्रत्येक मुलीने शिकून घेतल्या पाहिजेत.

प्रवास करताना त्रास होत असल्यास घ्यायची काळजी
  • सहप्रवासी आपल्या अंगचटीला येत असेल, मुद्दाम धक्का देत असेल तेव्हा त्याला आपण विरोध केला नाही तर त्रास देण्याची त्याची हिंमत वाढत जाते हे लक्षात ठेवा.
  • प्रवास करताना सहप्रवाशाने अश्लील हावभाव करून, तुमच्या शरीराला स्पर्श करून किंवा अन्य पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर प्रथम त्रास देणाऱ्या व्यक्तीला ठाम शब्दांत तुम्हाला त्रास होत असल्याबद्दल सांगा.
  • एकदा सांगूनही तो परत परत त्रास देत असेल किंवा अरेरावीची भाषा करत असेल तर ही बाब इतर प्रवाशांच्या लक्षात आणून द्या.
  • त्रास देणाऱ्याविरुद्ध तुम्हाला पोलिसात तक्रार करायची असेल तर तुमच्या विनंतीवरून ड्रायव्हर थेट पोलीस स्टेशनमध्ये बस नेऊ शकतो.
  • एखाद्या सहप्रवाशाकडून त्रास होत असेल तेव्हा स्वतःची जागा बदलून दुसरीकडे बसण्यामुळे त्रास संपणार नाही. उलट जागा बदलल्यावर आपण भित्रेपणाने वागतो आहोत हे लक्षात आल्यास दुसरा एखादा प्रवासी आपला गैरफायदा घेऊ शकेल. अशा प्रसंगी आपलाही धीर खचू शकेल. त्यामुळे त्रास देणाऱ्या व्यक्तीला धिटाईन उत्तर देणे हाच एकमेव मार्ग असू शकतो.
  • कंडक्टरने त्रास देणाऱ्या माणसाला जागा बदलून दुसरीकडे बसण्यास सांगितले पाहिजे, असा तुम्ही आग्रह धरू शकता.
  • बसच्या प्रवासामध्ये बसचा कंडक्टर तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्याविरुद्ध बस डेपोमध्ये आपण तक्रार करू शकतो. तक्रार अर्जामध्ये कंडक्टरचे नाव, बिल्ला नंबर, बसचा मार्ग, बसची वेळ, बसच्या ड्रायव्हरचे नाव व बस क्रमांक, काय त्रास दिला, कोणत्या स्टॉपवर किंवा कोणत्या स्टॉप नंतर दिला व साक्षीदार कोण होते अशा सर्व मुद्द्यांची माहिती असावी.
  • शक्य असल्यास गाडीतील इतर महिलांना आपला त्रास सांगावा. कदाचित अशा प्रकारचा त्रास झालेल्या इतरही मुली प्रवासात असतील. सर्वांनी मिळून डेपोमध्ये अर्ज दिल्यास डेपो मॅनेजरला जास्त गांभीर्याने तुमच्या तक्रारीची दखल घ्यावी.

शाळेमध्ये शिक्षक अथवा इतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना होणाऱ्या लैंगिक त्रासाबद्दल सुरक्षा नियोजन

आक्षेपार्ह अंगविक्षेप करणे, गलिच्छ शब्द कानाशी कुजबुजणे, शीळ घालणे, धक्का मारणे, लैंगिक अर्थ असलेली गाणी तुमच्याकडे बघून गुणगुणणे, तुम्हाला दिसेल अशा तऱ्हेने तुमच्यासमोर लैंगिक चित्र धरणे, डोळा मारणे, रस्ता अडवणे, तुमच्यासमोर मुद्दाम उघडे राहाणे किंवा शरीराचे लैंगिक अवयव उघडे ठेवणे, तुमच्या शरीराला स्पर्श करणे, तुम्हाला त्यांच्या शरीराला स्पर्श करण्यास भाग पाडणे, तुम्हाला दिसेल अशा तऱ्हेने स्वतःच्या लैंगिक अवयवांशी चाळे करणे, या व अशा असंख्य मार्गानी मुलींची लैंगिक छेड काढली जाते. या कृतीला कायद्याच्या भाषेत विनयभंग असेही म्हणतात.

  1. अशा प्रकारचा त्रास देणारी व्यक्ती तुमच्या अवतीभोवती असेल तर लगेच तुमच्या वर्गशिक्षकांना कळवा.
  2. तुमच्या मैत्रिणीला कोणी शाळेत किंवा शाळेबाहेर काही लैंगिक त्रास देत असेल तर तिची टिंगल, थट्टा, कधीही मस्करी करू नका.
  3. रिक्षावाले काका, प्रवासात भेटणारे लोक, शिक्षक, शिपाई कारकून, इतर कर्मचारी, इतर मुलींचे पालक, शाळेत तुमच्याबरोबर शिकणारे विद्यार्थी, क्लासला जात असाल तर तिथले शिक्षक यांपैकी कोणाकडूनही तुम्हाला अथवा तुमच्या मैत्रिणीला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून आपली छेडछाड होते आहे असे सांगणाऱ्या मैत्रिणीवर अविश्वास दाखवू नका तुम्हाला स्वतःला लैंगिक त्रासाचा अनुभव आल्यास तुमच्या मैत्रिणींना त्या व्यक्तीबाबत सावध करा.
  4. तुमच्या इतर मैत्रिणींशी संवाद साधा. कदाचित इतर मुलींनाही तुमच्यासारखाच अनुभव आलेला असेल. एकत्रितरीत्या प्रश्न कसा सोडवता येईल यावर विचार करा.
  5. मुलगी आपल्या एखाद्या मित्राकडे अशा व्यक्तीबद्दल तक्रार करते. तो मित्र तिला त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून संरक्षण देतो, पण त्यानंतर केलेल्या मदतीचा तो गैरफायदाही घेऊ शकतो. त्यामुळे मित्र-मैत्रिणींशी या विषयावर जपून संवाद साधा.
  6. त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही घाबरला आहात याची जाणीव होऊ द्यायची नाही. परिस्थिती निभावून नेण्यासाठी स्वतःची भीती लपवणे खूप आवश्यक आहे.
  7. आपले रक्षण आपण करू शकतो असा आत्मविश्वास बाळगा. असा आत्मविश्वास मनात असेल तर तो चेहऱ्यावरही प्रकट होतो. निम्मा त्रास तिथेच संपतो.
  8. आपल्या वयोगटातील मुलींशी चांगला संवाद साधू शकेल अशा मोठ्या व्यक्तींशी बोला. त्यांचे मार्गदर्शन व मदत घेऊन अशा अन्यायाला तोंड देण्यासाठी धीट व्हा.

शिक्षकांसाठी सूचना (किंवा मुलीच्या जवळची/विश्वासातील व्यक्तीसाठी) सूचना
  1. अनेकदा शाळेमध्ये किंवा शाळेत येण्याजाण्याच्या रस्त्यावर मुलींची छेडछाड होत असते, कोणीतरी त्यांच्याशी लैंगिक वर्तन करण्याचा प्रयत्न करीत असतो. बरेचदा असे प्रकार मुली पालकांना सांगू शकत नाहीत. होणाऱ्या छेडछाडीबद्दल अनेकदा मुलींनाच जबाबदार धरण्याची पालकांची व समाजाची भूमिका असते. त्यामुळे मुलींना मैत्रिणी किंवा वर्गशिक्षक एवढेच पर्याय उपलब्ध असतात. यादृष्टीने शिक्षकांची यासंदर्भातील भूमिका महत्वाची आहे.
  2. कोणतीही विद्यार्थिनी तुमच्याकडे एखादया शिक्षकाविरुद्ध तक्रार घेऊन आली तर तिचे संपूर्ण म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.
  3. तिच्यावर अविश्वास दाखवू नका. तुमच्याशी बोलण्यासाठी कदाचित तिने स्वतःच्या मनाची खूप तयारी केली असेल. तुम्ही तिच्यावर अविश्वास दाखविलात तर तिचे अवसान गळून जाईल आणि इतक्या नाजूक विषयावर पुन्हा कोणाशीच ती बोलू शकणार नाही.
  4. तुम्ही नक्की काहीतरी मदत करू शकता याची खात्री त्या विद्यार्थिनीला आहे म्हणूनच ती तुमच्याशी मोकळेपणाने बोलते आहे हे ध्यानात घ्या.
  5. लैंगिक छळवणूक हा मुळातच नाजूक विषय आहे. त्यातून एखादया शिक्षकाकडून होणारा त्रास म्हणजे गंभीर बाब आहे. तुमच्यापाशी कोणी विद्यार्थिनी तिला होणारा त्रास उघडपणे बोलून दाखवत असेल तर तिला मानसिक आधार देणे आवश्यक आहे.
  6. तिच्या बोलण्यावर तुमचा पूर्ण विश्वास असल्याची खात्री पटेल असे तिच्याशी वागा, बोला.
  7. विश्वासातल्या माणसांकडून होणाऱ्या लैंगिक छळाचा लहान वयात मुलींवर खूप खोलवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यातून सावरण्यासाठी तिला हरप्रकारे मदत केली पाहिजे.
  8. तिला हळूवारपणे नेमके प्रश्न विचारून यासंबंधी सविस्तर माहिती घ्या.
  9. भीती अथवा संकोचाने ती जर बोलणे टाळत असेल तर तिला धीर देऊन बोलते करा.
  10. तिने दिलेली माहिती तिच्या परवानगीशिवाय तुम्ही कोणालाही सांगणार नाही याची तिला खात्री द्या.
  11. त्याच वेळी तिने याबद्दल मुख्याध्यापकांकडे किंवा इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे आवश्यक असल्याचेही तिला समजावून सांगा.
  12. अशा तक्रारीमध्ये मुलीचे नाव गुप्त ठेवले जाईल याची हमी दया.
  13. तिच्या वतीने मुख्याध्यापकांशी या प्रश्नाबद्दल बोलण्यासाठी तिची परवानगी मागा.
  14. घरच्यांकडून तिचे शिक्षण बंद पाडले जाणार नाही याची खबरदारी घ्या.
  15. तिच्या पालकांशी याबाबत संवाद साधून तिचे शिक्षण थांबणार नाही व पालकांकडूनही तिला पाठिंबा मिळेल यासाठी प्रयत्न करा.
  16. एखादा शिक्षक विद्यार्थिनींशी लैंगिक गैरवर्तन करू शकतो हे ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. पण त्यातून स्वतःला सावरायचा प्रयत्न करून तुम्ही तिच्याशी अत्यंत संयमाने व समंजसपणे संवाद साधला पाहिजे.
  17. त्या शिक्षकाकडून जर एखादया विद्यार्थिनीला, शिक्षिकेला किंवा अगदी तुम्हाला स्वतःलाही यापूर्वी काही त्रास झालेला असू शकतो. आजपर्यंत इतरजणी गप्प बसल्यामुळे सुद्धा त्रास देणाऱ्या पुरुषांची हिम्मत वाढली असेल.
  18. लैंगिक छळ झालेल्या विद्यार्थिनीला योग्य न्याय मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.

(संदर्भ – ‘चक्रभेद’ – लेखन मनीषा गुप्ते, अर्चना मोरे मासूम प्रकाशन वर्ष १० डिसेंबर २०१०)