एन आर आय लग्नातील हिंसा आणि स्त्रियांनी काय काळजी घ्यावी

परदेशात जायला मिळणे ह्याची क्रेझ खूप असते. मग फिरण्याच्या निमित्ताने असो व कामासाठी. नोकरी तिथे मिळाली वा लग्न करून परदेशस्थ नवरा मिळाला तर अजून छान. आता परदेशात जाणे सर्रास असले तरी त्याचे आकर्षण आजही आहेच, त्या सर्व नादात कित्येकवेळा सावधगिरीच्या सूचनांकडे आपण दुर्लक्ष करतो. जसे जसे लग्न करून परदेशात जायचे प्रमाण वाढत आहे तसे तसे त्या लग्नात समस्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात पती परदेशस्थ असल्यामुळे ह्या समस्या गुंतागुंतीच्या होतात. पतीने त्याग करणे. घटस्फोटाची केस टाकणे, छळ करणे, अश्या समस्या निर्माण होतात. त्यावेळी पोटगी, मुलांचा ताबा ह्या गोष्टी खूप कठीण होतात. म्हणूनच अश्या विवाहात काय खबरदारी घ्यावी, समस्या आल्यास काय करावे, हे समजून घेणे महत्वाचे ठरते.

परदेशस्थ भारतीयाशी विवाह करताना कोणती काळजी घ्यावी ? (Do’s)

1. नियोजित वरच्या वैवाहिक स्थितीची शहानिशा करावी. तो अविवाहित, घटस्फोटीत
आहे का? कि नुसता विभक्त राहत आहे.
२. नोकरी कश्या प्रकारची आहे, प्राप्ती किती आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, कुठे
नोकरी करतो आस्थापनेचे नाव, पत्ता, त्या नोकरी ची विश्वासार्हता याची नीट घ्यावी.
३. वराकडे कोणता विसा आहे, तो पत्नीला आपल्यासोबत नेऊ शकतो का हे पाहायला
हवे.
४. वराची आर्थिक स्थिती काय आहे ह्याची तो जेथे कामावर आहे तेथे चौकशी करावी.
५. त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे पाहणे.
६. कुटुंबाची पार्श्वभूमी पाहणे.

नियोजित वराची खालील कागदपत्रे पाहून एक प्रत वधूने आपल्याजवळ व एक आपल्या पालकांजवळ ठेवावी

1. विसा. पासपोर्ट
2. सोशल सेक्युरीटी क्रमांक
3. पासपोर्ट क्रमांक
4. मागील ३ वर्षातील प्राप्तीकर विवरण पत्र
5. परदेशातील निवासाचा पुरावा

 खालील गोष्टीची काळजी घ्यावी..(Dont’s)

1. वधूवर सूचक मंडळ, agent, मध्यस्त यांच्यावर आंधळा विश्वास ठेऊ नये.
2. कोणत्याही कारणासाठी बनावट कागदपत्रे बनवू नका. किंवा खोट्या व्यवहारात सामील होवू नका.
3. निव्वळ दुसर्या देशात स्थलांतर वा नागरिकत्व मिळवण्यासाठीची योजना म्हणून लग्न करू नका.
4. गुपचूप लग्न करू नका.आपल्या आप्तांना , मित्र मैत्रीणीना माहिती द्या. त्यांना सामील करून घ्या. साक्षी करून घ्या.
5. खूप लांब जाऊन लग्न करणे व फक्त नोंदणी विवाह यासाठी राजी होऊ नका. लग्न सर्वांच्या साक्षिने करा व त्याची नोंदणी सुद्धा करा.
6. परदेशात लग्न करायला राजी होऊ नका. कारण मग भारतीय विवाह कायदे वापरता येत नाहीत.

कागद पत्राविषयी खालील बाबी लक्षात ठेवाव्या.

1. लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्र नेहमी जवळ असावे.
2. विसा वगेरे सर्व करताना मूळ कागदपत्रे स्वतःजवळ ठेवावी.
3. पतीचे वैवाहिक स्थिती संबंधीचे प्रतिज्ञापत्र जवळ असावे.
4. आरोग्य तसेच इतर विमा policy काढून त्याचे कागदपत्र स्वतः जवळ असावे.

नियोजित वर ज्या देशात आहे त्या देशाशी आपल्या देशाचा मनुष्यबळ संबंधी करार झाला आहे का व extradition संबंधी कारर झालास आहे का ते पाहून घ्यावे.

 परदेशगमन करताना

1. आपले शेजारी. मित्र नातेवाईक पतीचे कामाचे ठिकाण, पोलीस, रुग्णवाहिका, जेथे जाणार असाल तेथील भारतीय वकीलात यांचे संपर्क व पत्ते याची यादी जवळ ठेवावी.
2. विसा, पासपोर्ट, बँक व मालमत्तेचे कागद, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र अश्या महत्वाच्या कागद पात्रांच्या प्रती, लग्नाचे फोटो, व संपर्क क्रमांक आपले पालक तसेच भारतातील व परदेशातील विश्वासू व्यक्तीकडे द्याव्यात.
3. वरील कागदपत्रे कोणी गहाळ केल्यास व ताब्यात घेतल्यास ह्या प्रती उपयोगी पडतात. आपले इ मेल acoount काढून त्यावर या कागदपत्रांच्या scanned प्रती ठेवाव्यात. व soft प्रती ठेवाव्या. तश्याच त्या आपले पालक व इतर विश्वासू लोकांकडे ठेवाव्या.

परदेशात गेल्यावर काय कराल

1. आपले बँक अकाऊंट लवकरात लवकर उघडा. जेणेकरून गरज पडल्यास आर्थिक व्यवहार करणे सोयीचे पडेल.
2. परदेशातील हिंसा, निष्काळजीपणा व विसा यासंबंधीच्या कायद्याची माहिती घ्या. तेथील भाषा शिकून घ्या.
3. आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांच्याशी नियमित संपर्क ठेवा.

आपल्याला विवाह विषयक समस्या निर्माण झाल्यास हे लक्षात ठेवा.

1. महिलेला कोणत्याही कौटुंबिक हिंसेला परदेशात सामोरी जावे लागले तर ती नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करून त्यांची मदत घेऊ शकते.
2. भारतात सुधा ती परदेशस्थ पती व सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. सी.आर.पी.सी. कलम १८८, मध्ये तशी तरतूद आहे.
3. अश्या केसला आरोपी हजर राहिले नाहीत तर पासपोर्ट कायद्याच्या कलम १० खाली पासपोर्ट revoke करता येतो.
4. शिवाय महिला पोटगी, मुलाचा ताबा इत्यादीसाठी न्यायालयात दाद मागू शकते. त्यासाठी विविध प्रकारच्या नोटीस कोर्ट काढू शकते, परराष्ट्र खात्यामार्फत त्या बजावता येतात.

पतीने परदेशात घटस्फोटाचा दावा दाखल केल्यास

1. भारतात लग्न झाले तर असा दावा परदेशात दाखल करता येत नाही.
2. पतीच्या भारतातील मालमत्तेतून व परदेशातील मालमत्तेतून पत्नी च्या पोटगीची निट तरतूद व्हायला हवी.
3. अश्या प्रकारचे भारतीय कोर्टाचे आदेशाची परदेशात अंमलबजावणी करता येते.
4. वरील निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एका केस मध्ये दिले आहेत. (नीरजा सराफ वि.जयंत सराफ १९९४)
5. मुल जर परदेशात जन्मले असेल व आईकडे भारतात असेल तर पती मुल पळवल्याचा चा दावा परदेशातील कोर्टात करू शकतो.
6. अश्या वेळी केस चालवण्यासाठी भारतीय वकिलातीची मदत घ्यावी लागते.
7. एकूणच ह्या सर्व समस्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची मदत घ्यावी.
8. निवारा, समुपदेशन , कायदेशीर मदत यासाठी विविध संस्था व त्यासाठी अल्प का होईना पण आर्थिक मदत तेथे मिळू शकते.

खालील वेब लिंक पहा.

http;//mea.gov.in/legal-and-financial –assistance.htm

कोर्टाचे आदेश अंमलबजावणीसाठी
http://cbi.nic.in/interpol/mha_circ_service_process.pdf

परदेशस्थ लग्नात समस्या निर्माण झाल्यास कायदेशीर गुंतागुंत खूप आहे त्यामानाने मदत अल्प आहे. अश्या महिलांना मोठा आधार मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

(लेखन :- अॅड. मनीषा तुळपुळे)