लिव्ह इन नात्याबद्दल आणि त्यातून होणारी हिंसा

भारतात लग्नव्यवस्था आज ही भक्कमपणे पाय रोवून आहे. मुलगी-मुलगा वयात आले की त्यांच्या लग्नाबद्दल प्रत्यक्ष –अप्रत्यक्ष चर्चा सुरु होते. मुलीला तर लग्नव्यवस्थेत तिने कसे तगून रहायचे याचे मानसिक व सामाजिक शिक्षण खूपच लहानपणापासून दिले जाते व त्याप्रमाणे तिला वाढवलेही जाते. तरीही लग्नव्यवस्था धोक्यात आली आहे, घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे अशी ओरड होते आहे. तसे असेल तर आजच्या युवकांना लग्नामधले सहजीवन नको आहे का?

शहरी भागात मुलांचं आणि मुलींचं ही शिक्षणाचं प्रमाण काही प्रमाणात वाढलं आहे. मुली स्वतः:च्या पायावर उभ्या राहिल्यानंतर, करियरमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर, मनासारखा त्यांच्या अपेक्षांमध्ये बसणारा जोडीदार शोधायला प्राधान्य देतात. घरच्यांच्या सुनेबद्दलच्या पारंपारिक अपेक्षा व मुलाच्या स्वतःच्या अपेक्षा यात गोंधळ असतो त्यामुळे नक्की काय हवंय हेच समजत नाही.

शिक्षण – नोकरी यामुळे घरापासून लांब राहायचे प्रमाण वाढले आहे, पालकांवरचे अवलंबन ही कमी झाले आहे.स्वतःचे निर्णय व त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी – अनुभव यातूनच प्रत्यक्ष लग्नाच्या नात्यात पडायच्या आधी स्वत:ला या नात्यातून, जोडीदाराकडून काय हवे आहे?, हे नाते, त्याच्या जबाबदाऱ्या निभावणे जमते की नाही? हे आजमावण्यासाठी विवाहाविना सहजीवनाचा पर्याय निवडला जातो.

विवाह सदृश्य सहजीवन – लिव्ह इन रिलेशनशिप

एक व्यवस्था ज्यामध्ये अविवाहित जोडपे विवाहासारखे दीर्घकालीन नातेसंबंधात एका छता खाली एकत्र रहातात. याना त्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हे महत्वाचे मानले आहे. सामंजस्य हा जरी या नात्याचा कणा असला तरी परस्पर अवलंबन, नात्याच्या व पर्यायाने व्यवस्थेच्या जबाबदाऱ्या यात नसतात. अनेकदा सोय म्हणून सुध्दा एकत्र राहायची सुरुवात होते जसे, की रहायची जागा, ऑफिसपासूनचे अंतर, खर्च, इ …….

२०व्या शतकात विवाहाविना सहजीवनाची संकल्पना समाजात तरुण पिढीसाठी अजिबातच मान्य नव्हती. मध्यमवयीन अविवाहित, विधुरपुरुष-अविवाहित, विधवा-परित्यक्ता स्त्रिया एकत्र राहिले तर त्याबाबत चर्चा होत असे, अनेकदा घर मिळताना देखील त्यांना त्रास होत असे. नैतिकतेचा मुद्दा करून प्रश्न विचारून, टोमणे मारून हैराण केले जात असे; पण काही काळाने त्यांच्या अडचणी, मुद्दे लक्षात घेऊन सहजीवन स्वीकारले जाऊ लागले.

लिव्ह इन रिलेशशिपमध्ये राहण्याबाबतची कायदेशीर स्थिती

विवाहसदृश संबंधांमध्ये राहण्यासाठीची कोणतीच स्पष्ट व्याख्या नाही आणि भारतात या नात्याबद्दल कोणताही विशिष्ट कायदा नाही. ज्यात नात्यातील हक्क व जबाबदाऱ्या याबद्दल मार्गदर्शन केले असेल. नातेसंबंधांच्या राहण्याच्या परिस्थितीची व्याख्या करण्यासाठी कोणत्या ही कायद्याच्या अनुपस्थितीत लिव्ह इन रिलेशनशिप नात्याच्या संकल्पनेची स्पष्टता देण्यासाठी कोर्ट पुढे आले आहेत. कोर्टाने असे मत मांडले आहे की लग्न न करताही पुरुष व स्त्री एकत्रितपणे राहू शकतात. हे समाजासाठी अनैतिक असू शकते; परंतु ते अवैध – बेकायदेशीर नाहीये. पुरुष आणि स्त्री दीर्घकाळापर्यंत पती-पत्नी म्हणून एकत्र राहत असतील तेव्हा ते नाते कायद्याने विवाहसदृश असेल. कौटुंबिक हिंसेपासून महिलांचे संरक्षण कायदा. २००५ मध्ये पहिल्यांदाच एका छताखालीं राहणाऱ्या विवाहसदृश नात्यातील महिलांना संरक्षण देण्यात आले आहे, ज्या स्त्रियां औपचारिक रित्या विवाहित नाहीत परंतु त्यां पुरुषाबरोबर विवाह–पत्नीसारख्या नात्यात राहतात. कलम 2 (एफ) नुसार, जेव्हा ते सहानुभूती, विवाह किंवा नातेसंबंधांद्वारे जोडलेले असतात. विवाह, दत्तक किंवा कौटुंबिक सदस्य संयुक्त कुटुंब म्हणून एकत्र राहतात तेव्हा कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे विवाहाचे नातेच नाही तर लग्नाच्या स्वरूपातील नातेसंबंध ही आहे.

सुप्रीम कोर्टाने सांगिंतले आहे कौटुंबिक हिंसेपासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ नुसार ‘लग्नाच्या स्वरूपातील नातेसंबंधात’ काही मूलभूत निकर्षदेखील पूर्ण केले पाहिजेत. केवळ आठवड्याचे शेवटचे दिवस एकत्र व्यतीत करणे किंवा एक रात्र सोबत राहिल्याने ते ‘कौटूंबिक नातेसंबंध’ मानले जाणार नाहीत. यात विवाहबाह्य संबंधांमध्ये राहाणाऱ्या महिलेला मदत मिळू शकत नाही.

 लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या जोडप्यांच्या मुलांची स्थिती

अशा प्रकारच्या नात्यात राहणाऱ्या जोडप्यांसाठी कोणताही विशिष्ट कायदा नसल्यामुळे, जोडप्यांच्या जन्मलेल्या मुलांच्या स्थितीबद्दलदेखील स्पष्ट कायदा नाही. हिंदू विवाह कायदा, १९५५ नुसार कुठल्याही परिस्थितीत (विवादास्पद किंवा कायदेशीर विवाह हे विचारात न घेता) जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला वैधतेची – कायदेशीर मान्यता देतो परंतु विवाहसदृश नात्यात जन्माला आलेल्या बालकांना कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी कोणताही विशिष्ट कायदा अस्तित्वात नाही. जर व्यक्ती त्यांच्या नातेसंबंधातून बाहेर पडायचे ठरवतात. तर त्यांच्या मुलांचे भविष्य खूप असुरक्षित बनते. अशा मुलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी मजबूत तरतुदीची आवश्यकता आहे. बालकांची भविष्यातील सुरक्षितता आणि पालकांनी बालकांची जबाबदारी घेण्यासाठीही तरतूद करणे आवश्यक आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप

  • एक अविवाहित जोडपे विवाहाच्या नात्याने एकाच छताखाली एकत्र राहतात, अशा दीर्घकालीन नातेसंबंधाना लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून ओळखले जाते. यात पुरुष व स्त्री विवाह न करता एकत्र राहतात.
  • भारतात लिव्ह इन रिलेशनशिपला लोकांची फारशी संमती नाहीये. समाजात हे निषिद्ध मानले जाते. बहुतेक लोक असे नातेसंबंध अनैतिक आणि अयोग्य मानतात.
  • लिव्ह इन नाते हे समाजाने अनैतिक मानले असले तरी ते नातेसंबंध राहतात. यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला व असे राहणे कायदेशीर आहे असे घोषित केले.
  • भारतात लिव्ह इन रिलेशनशिपबाबत कोणताही विशिष्ट कायदा नाही.
  • लिव्ह इन नात्यामध्ये असणारे जोडीदार हे त्याच्यामधील अविश्वासा बद्दल किंवा त्याच्या जोडीदाराच्या अनैतिक नात्या बद्दल तक्रार करू शकत नाहीत.
  • जर स्त्री दीर्घकाळापर्यंत लिव्ह इन रिलेशनशिप नात्याने राहिली तरीही ती सी आर पीसी च्या कलम 125 अन्वये पोटगीचा दावा करू शकत नाही.
  • कौटुंबिक हिंसेपासून महिलांचे संरक्षण कायदा,२००५ मध्ये लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहणाऱ्या महिलांना संरक्षण देण्यात आले आहे.
  • लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहणाऱ्या महिलेला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता तिची तक्रार न्यायालयाने सेक्शन ४९८ (अ) अंतर्गत दाखल करून घेतली अशाप्रकारे, सर्वाच्च न्यायालयाने एक पाऊल उचलले आणि हुंड्यासाठी छळयासाठी या नात्यातील स्त्रीला थेट संरक्षण दिले.
  • लिव्ह इन रिलेशनशिप नात्यामध्ये जन्माला आलेल्या बालकांचे भविष्य सुरक्षित करणे ही काळाची अत्यंत गरज आहे.

लेखन – क्रांती अग्नीहोत्री-डबीर – संदर्भ: सती ते सरोगसी भारतातील महिला कायद्याची वाटचाल, लेखक – मंगला गोडबोले प्रकाशक दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन जुलै २०१८