हुंडा – हुंड्यासाठी छळ, विविध स्वीरूपातली हुंड्याची मागणी, हुंडाबळी

आपल्या समाजात जात, धर्म यांनुसार खूप वेगवेगळ्या रूढी-परंपरा आहेत. त्यानुसार हुंडा घेण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा जरी औद्यौगीकीकरणामध्ये आणि शिक्षण क्षेत्रात विकास झाला किंवा होत असला असं म्हटलं जरी जात असलं तरी समाज अजूनही बुरसटलेल्या रूढी-परंपरा मध्ये अडकलेला आहे. अजूनही हुंड्यामुळे अनेक मुली/स्त्रिया याचे बळी जात आहेत. आपल्या समाजात पूर्वीपासूनच मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून मुलीच्या आई-वडिलांना मुलाला व त्याच्या घरातील व्यक्तींना हुंडा देण्याची परंपरा आहे.

त्यात आता तर हुंडा घेण्याचीही वेगवेगळी कारणं दिली जातात. मुलगा खूप शिकलेला असेल, चांगली नोकरी करत असेल आणि त्यातल्या त्यात सरकारी नोकरी करत असेल तर आणखी मोठ्या रकमेचे हुंडे घेतले जातात, मुलींचं लग्नासाठीचं वय तीसच्या पुढे गेल असेल तर जास्त हुंडा द्यायचं, मुलींच्या दिसण्यावरून, मुलींना काही अपंगत्व असेल त्यानुसार हुंड्याची मागणी केली जाते. तसेच मुलगा एन आर. आय असेल तर खूप मोठ्या प्रमाणात हुंडा मागितला जातो. आता हुंडा फक्त पैशाच्या स्वरूपात राहिला नाही तर त्याच्या बदल्यात सोनं, फ्लॅट, गाडी, लग्न करण्याच्या पद्धती म्हणजे चांगले हॉल, खान-पान, सजावटी, कपडालत्ता यावर खर्च जास्त होतो या सगळ्या सोयी-सुविधा पुरविण्याची मागणी मुलींच्या घरातल्याकडून केली जाते. यासाठी बऱ्याच मुलींचे आई-वडील मुलीच चागलं होतंय म्हणून कर्ज काढून लग्न करतात.

तसेच हल्ली मुलगी शिकलेली, नोकरी करणारी असावी अशी अपेक्षा असते. कारण घरात आर्थिक हातभार लागेल. पण त्या मुलीला नोकरी, घर, मुल असं सगळंच सांभाळण्याची जबाबदारी मात्र तिच्यावरच दिली जाते म्हणजे आर्थिक हातभारही तिने लावायचा आणि घरातील कामाची, माणसांची, मुलं सांभाळायची जबाबदारीही तिचीच असते. त्यामध्ये घरातील पुरुष हातभार नाही लावत आणि तिने कमविलेले सगळेच पैसे घरात वापरले जातात, त्यावरही तिचा अधिकार नाही अशा पद्धतीने मुलीच्या शिक्षण आणि नोकरी करण्याचा गैरफायदा घेतला जातो. आणि समाजातील बऱ्याच लोकांना असं वाटतं, ‘शिकलेली, नोकरी करणारी मुलगी म्हणजे कायम मिळत राहणारा हुंडाच.’

पण आपल्या समाजातील पालक हा विचार करत नाही की आपल्या मुलगीला नक्की काय हवं आहे, ज्यामुळे ती पुढील आयुष्य आनंदाने जगू शकेल, तिच्या मतांचा विचारच बऱ्याच वेळा केला जात नाही. हुंडा मागण्याची प्रक्रिया ही लग्न होईपर्यंतच नसते तर तर झाल्यावरही चालूच राहते.

म्हणूनच अशा चुकीच्या रूढी-परंपरा आपण मोडीत काढल्या पाहिजेत, त्यासाठी ठामपणे विरोध केला पाहिजे. हुंडा घेणं आणि देणं दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे आणि असं करणाऱ्याला कायद्याच्या चौकटीत शिक्षाही होतेच.

हुंड्यासाठी छळाविरोधात तक्रार करण्याबाबत

जर कोणी पोलीस अधिकारी आपली तक्रार नोंदवून घेण्यास नकार देणे म्हणजे एफ. आय. आर करून घेत नसतील तर. तुम्ही तुमची तक्रार सविस्तर लिहू शकता (तक्रारीचे स्वरूप, तारीख, वेळ आणि हुंड्याची केलेली मागणी आणि त्यासाठी केलेली हिंसा विस्तृत लिहिणे.) आणि याला आपल्या जिल्ह्याच्या उपआयुक्त अधिकारी (डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस) यांना रजिस्टर्ड पोस्टाने पाठवू शकतो. त्यांची माहिती नाव, पत्ता, फोन्र नंबर इंटरनेटवर दिले आहे. हे क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १५४ (३) अंतर्गत दिले आहे. जिल्ह्याचे उपआयुक्त अधिकारी (डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस) यांना तुमची तक्रार एफ.आय.आर. अंतर्गत दाखल करून घ्यावीच लागेल. कदाचित ते तुमची तक्रार करण्यात यशस्वी झाले नाहीत तर तुम्ही महानगर दंडाधिकारी (मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट) समोर क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन कलम १५६ (३) सोबत कलम १९० अंतर्गत तुमची तक्रार नोंदवू शकता.

तुम्ही हे लक्षात ठेवा हुंड्याची मागणी आणि हुंड्यावरून होणाऱ्या हिंसेच्या अनेक केसेसमध्ये गुन्हेगार पुरावा नसल्यास सुटू शकतात. याचा अर्थ असा होत नाही की हुंड्याची मागणी केली नाही किंवा हिंसा झाली नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो की तक्रारकर्त्याकडून योग्य पद्धतीने केस आणि पुरावे सादर केले नाहीत किंवा पोलिसांमार्फत योग्य पद्धतीने पुरावे जमा केले नाहीत किंवा हे पण असू शकते की न्यायालयाची पक्षपाती वृत्ती.

अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून एकत्र केलेले सुरुवातीचे पुरावे मजबूत असले पाहिजेत. कारण वकील आणि कोर्ट आरोपीला शिक्षा देऊ शकेल. हे आपल्या बाजूने होईल जर पोलीस अधिकारी हे समजतील की तुमच्यावर नवऱ्याने आणि सासरच्यांनी हुंड्यासाठी गंभीर हिंसा केली आणि त्रास दिला आहे. अशी केसमध्ये कोणत्याही तोडग्याशिवाय तक्रार दाखल करा. सावध रहा की अधिकारी बेजवाबदार असल्यास केस लवकर रफादफा करण्याचा प्रयत्न करत असेल तर केस कमकुवत होऊ शकते.

(संदर्भ : – वेबसाईट standupagainstviolence.org)

४९८ अ – भारतीय दंड संहितेमधील कलम

498 अ हे केवळ हुंडा प्रतिबंधक कलम आहे असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. मात्र हे कलम केवळ हुंडाबळीच्या केसेस पुरते मर्यादित नसून ‘पती किंवा त्याचे आई वडील किंवा इतर नातेवाईक यांच्याकडून कोणत्याही कारणास्तव स्त्रियांना मिळणारी क्रुरतेची वागणूक’ (यात शारीरिक आणि मानसिक छळ यांचा अतर्भाव होतो) यापासून स्त्रियांचे संरक्षण करणारे ते कलम आहे. या कलमाच्या उद्देशात स्पष्टपणे म्हटलेले आहे की हुंडाबळीसोबतच इतर कोणत्याही कारणाने नवरा किंवा त्याच्या नातेवाइकांकडून केल्या जाणाऱ्या कृर हिंसेपासून (छळापासून) विवाहित महिलांचे संरक्षण करणे हा या कलमाचा उद्देश आहे. आणि त्याची फौजदारी तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करता येते.

तक्रार कशी दाखल करायची

तुमच्या भागातील पोलीस स्टेशनचे नाव, तेथील अधिकाऱ्याचे नाव आणि पद आणि तुमचे स्वतःचे नाव, कायम राहण्याच्या ठिकाणाचा पत्ता, फोन नंबर, तक्रारीचे स्वरूप, तारीख, वेळ आणि हुंड्याची केलेली मागणी आणि त्यासाठी केलेली हिंसा विस्तृत लिहिणे.