रागावणे, अधिकार गाजवणे, प्रसंगी मारणे हे प्रेमाचे प्रतीक आहे.

“हे प्रेमाचे नसून नियंत्रणाचे आणि सत्तेचे प्रतिक आहे.”

हे तर अजिबात खरे नाही. राग हे अनेक भावनांचे संमिश्र मिश्रण आहे. काही पुर्वानुभव तसेच परिस्तिथीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवता न येणे यामुळे व्यक्तीला राग येतो. तो राग व्यक्त करताना व्यक्तीचा स्वत:च्या वर्तनातील समतोलही बिघडतो. प्रसंगी मानसिक व शारीरिक हिंसा घडू शकते. रागावणारी व्यक्ती राग शांत झाल्या नंतर नाते पुनःप्रस्थापित करण्याकरिता प्रेमाची अभिव्यक्ती करते, किंबहुना प्रेम आहे असे दर्शविते. येथे हिंसा सहन करणाऱ्या व्यक्तीचा गैरसमज होतो व रागावणे, मारणे, अधिकार गाजवणे या कृतीस देखील प्रेम समजले जाऊ शकते. त्या व्यक्तीकडून परत परत हिंसक वर्तन घडत रहाते. तणाव, हिंसा, पुन्हा प्रेम अशा चक्रात हिंसा करणारी व हिंसा सहन करणारी अशा दोन्ही व्यक्ती अडकतात.

परंतु लक्षात ठेवण्याची एक महत्वाची गोष्ट म्हणजे हिंसा केवळ भावनेच्या आवेगातून होत नाही. हिंसेची अभिव्यक्ती आणि सत्ता संबंधांचे जवळचे नाते आहे. नवरा बायकोला मारतो तर पालक आपल्या मुलांना मारतात, तर सासू सुनेचा जाच करते. इथे कोणाकडे सत्ता असते हे उघड आहे. पत्नी किंवा मुलं किंवा सून उलटून विरोध करू शकत नाहीत किंवा हिंसा करणाऱ्याला उलटून क्वचितच मारतील. कौटुंबिक किंवा नाते संबंधातील हिंसेसारख्या मुद्द्यावर काम करणाऱ्या व्यक्तींनी हे सत्ता संबंध म्हणूनच समजून घ्यायला हवेत.