पुरुष उत्तेजित झाल्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. म्हणून बलात्कार होतात.

“साफ खोटं. पुरुषांचा असा समज आपला पुरुषप्रधान समाजच करून देत असतो.”

लैंगिक भावना पुरुष, स्त्री अथवा इतर, बहुतेकांना असतात. ज्या प्रमाणे आपण आपल्या इतर भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो त्याच पद्धतीने लैंगिक भावनांवरही नियंत्रण ठेवू शकतो. परंतु स्वतःला ‘सांभाळणं’, स्वतःच्या लैंगिकच काय इतरही सर्व इच्छा, वासना दाबून ठेवणं, मारणं हे सर्व स्त्रियांसाठीच आहे. पुरुष मात्र मोकाट असतो जसा गावाला सोडलेला वळू. त्याला अधिकार आहे काहीही करण्याचा, आपली मर्दानगी गाजवण्याचा. ‘माझे स्वतःवर नियंत्रणच राहिले नाही, मी वाहवत गेलो’ इ. अशी कारणं पुरुष देताना दिसतात. दारू किंवा अशा व्यसनांबद्दलही पुरुष अशीच कारणं देताना आढळतील. पुरुष आपल्या भावनांवर नक्कीच नियंत्रण ठेवू शकतात आणि ही जबाबदारी पूर्णपणे त्यांचीच आहे. बाईला त्याबद्दल दोषी ठरवणं दुटप्पी आणि अन्यायकारक आहे.

बलात्कार का होतात किंवा पुरुष बलात्कार का करतात हे ही समजून घेणे गरजेचे आहे. बहुतेक वेळेस पुरुषांचा स्त्रीकडे, तिच्या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक, एक ‘उपभोगाची वस्तू’ म्हणून पाहण्याचा असतो. चांगली बाई म्हणजे तिच्याकडून अपेक्षित वर्तन करणारी. जी तसं वागत नाही तिला शिक्षा मिळते. बलात्कार ही त्यातीलच एक गंभीर शिक्षा. शिवाय इतर पुरुषांना आव्हान देण्यासाठी, त्यांचा अपमान करण्यासाठी देखील बलात्कार होतो.