जो बाईचं ऐकतो तो खरा पुरुष नसतो

खरा पुरुष तोच जो बाईकडे माणूस म्हणून बघतो, तिचा आदर करतो.

आपली पुरुषप्रधान व्यवस्था बाईला दुय्यम समजते, तिला कमी दर्जा देते. त्यातूनच बाईची कामं ठरलेली आहेत आणि तिच्या विचारांचा परीघही. इतरांच्या समोर बाईने यायचं नाही, बोलायचं नाही, आपलं मत मांडायचं नाही हे अपेक्षित आहे. आपल्या दिलेल्या ‘मर्यादा’ पाळणं हे तिचं कर्तव्य आहे. अशाच काही मर्यादा पुरुषांनाही असतात परंतु त्या इतर पुरुषांच्या प्रती. उदा. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या पुरुषांना वरच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या पुरुषांसमोर आपलं मत मांडण्याचा अधिकार सहसा नसतो. वरच्या जातीच्या पुरुषाचं ऐकणाऱ्या पुरुषाच्या मार्दानगीला काही धोका नसतो परंतु आपल्याच बायकोची एखादी गोष्ट ऐकणाऱ्याची मर्दानगी कमी होते. आणि ऐकणं म्हणजे तरी काय याचाही विचार व्हायला हवा. मुख्यतः आपल्या ‘मालकीच्या’ बाईला नियंत्रणात ठेवण्याशी याचा संबंध आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे बाईला कुणाच्याच समोर मत मांडण्याचा अधिकार नाही. या उतरंडीत बाई सगळ्यात खाली. मुळात बाईला ‘व्यवहाराच्या’ गोष्टीच समजू शकत नाहीत हा पुरुषांचा मोठा गंड आहे. संधी मिळाल्यामुले आज कितीतरी स्त्रियांनी पुरुषांचा हा समज आपल्या कार्तुत्वातून खोटा सिद्ध केला आहे. पण इथेही जे स्वाभाविक आहे ते त्यांना सिद्ध करावं लागतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

लक्षात ठेवा स्त्री पुरुष भेदभाव हा सामाजिक आहे, पुरुषांनी त्यांच्या फायद्यासाठी तो तयार केला आहे.