मुलींच्या नकारत होकारच असतो.

नाही. तो नकारच असतो फक्त तो पुरुषांना समजत नाही.

कारण मुलांचे, पुरुषांचे शिक्षण तसे झाले नाही. ‘नाही’ चा अर्थ त्यांना कळत नाही. ते बिचारे असतात किंवा त्यांची समज कमी असते म्हणून नाही तर त्यात त्यांचा स्वार्थ असतो म्हणून. मुली नकार द्यायला लागल्या तर पुरुषांचे हीत, त्यांची सत्ता धोक्यात येणार असते. बाई स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागली तर कुटुंब, नाते संबंध आणि समाज म्हणून असलेली वीण जी मुख्यतः नाना विषमतांवर आधारलेली आहे तीच धोक्यात येईल. आणि हे काही स्त्री-पुरुष यांच्या बाबतंच खरं नाही. जात, धर्म, वर्ग, वंश अशा सगळ्याच विषमतांचा फटका ज्यांना बसतो, काच ज्यांना सहन करावे लागतात अशांनी आपले निर्णय आपण घ्यायचे ठरवले तर वरच्या जागी असणाऱ्या सर्वांचेच सिंहासन आणि त्यातून मिळणारे फायदे डळमळीत होतात. म्हणूनच ‘नकारातच होकार’ सारख्या ढोंगी गोष्टी रचल्या जातात. अनेक मुली आणि स्त्रिया आता अशा फसव्या गोष्टींना चोख उत्तर देत आहेत. माझ्या नाहीचा अर्थ नाहीच आहे हे ठामपणे आणि स्पष्ट शब्दात सांगत आहेत. आणि तरीही ते समोरच्याला सोयीने नाही समजले तर कायद्याचा वापर करून ते ध्यानात आणून देण्यासाठी ठोस पावलंही उचलत आहेत.

नाही म्हणजे नाही.