ज्येष्ठ व्यक्तींवर होणारी हिंसा

हिंसा हा शब्दच मुळी मनात एक प्रकारची दहशत निर्माण करतो. हिंसेचे अनेक प्रकार आहेत. हिंसा अनेक पातळ्यांवर अनेक ठिकाणी अनेक तऱ्हांनी होत असते. याचे आपण मुख्यत्वे दोन भाग करू शकतो. पहिला न्यायालयातही सिद्ध करता येतो त्याला गुन्हा असे म्हणता येईल. उदा. चोरी, मारहाण, खून, इ. दुसरा म्हणजे घरातल्या घरात घडत असतो. न्यायालयात सिद्ध करणे कठीण असते पण हा ही गुन्हाच असतो. वृध्दाला रोजच्या रोज त्याला तोंड द्यावे लागते. मुख्यत: हा छळ करणाऱ्या व्यक्ती घरातल्या किंवा वृध्दनिवासातल्या जबाबदार व्यक्ती असतात. त्यांची जबाबदारी आहे वृद्धांची काळजी घेणे. गुन्हे जे घडतात ते थांबवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने पोलीस, शासन व एकूणच समाजाची असते. पण वृद्धांचा छळ होतो तो मात्र होवू नये किंवा होत असेल तर थांबवणे हे व्यक्ती म्हणून आपली जबाबदारी आहे किंवा त्याची इतरांना जाणीव करून त्याविरोधात काहीतरी मदत करणे. हे नक्कीच वैयक्तिक पातळीवर शक्य असते.

वृद्धांचा छळ होण्याची कारणे

वृद्धांचा छळ होण्याची कारणे अनेक आहेत. एक म्हणजे या बदलत्या काळात विशेषत: शहरात बदलत्या जीवनशैलीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. शहरात वेळ व जागेची कमतरता हा एक मुख्य प्रश्न असतो. आता स्त्रियांही शिक्षण घेवून नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर व्यस्त असतात. पूर्वी घरातल्या वृद्धांची, लहान मुलांची जबाबदारी ही घरातल्या स्त्रियांवरच होती. पण त्यावेळी त्यांच अर्थाजन करत नव्हत्या त्यामुळे त्यांना ह्या व्यक्तींना पुरेसा वेळ देणे शक्य होत होते. आता मात्र स्त्रीवरच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे बाहेरच्या व्यक्तींची मदत घेणे किंवा वृद्ध व्यक्ती घरात एकटी राहणे अपरिहार्य झाले आहे. बाहेरील व्यक्ती तेवढ्या आत्मीयतेने काम करणाऱ्या असतीलच असे नाही. त्यामुळे वृद्धांचा छळ होऊ शकतो. कित्येकदा वृद्ध ही बदलत्या जीवन शैलीचे नियम मान्य करत नाहीत व जुळवून घेण्यास नकार देतात. समजून न घेता आडमुठेपणा करत राहिले की घरातल्यांची किंवा काळजी वाहकांची चिडचिड सुरु होते व ते ज्येष्ठ व्यक्तीकडेही दुर्लक्ष करायला सुरुवात करतात.

वृद्धाचा छळ कोठे होतो

वृध्दांचा हा छळ हा सर्वसामान्यत: दोन ठिकाणी होवू शकतो – १. घरात म्हणजे जिथे त्यांचे वास्तव्य आहे. ते घर त्यांचे स्वत:चे असेल किंवा मुलगा, मुलगी अथवा कोणी नातेवाईक यांचे असेल. २. संस्थेत … म्हणजे वृद्ध एखाद्या वृध्दनिवासात रहात असेल, दवाखान्यात रहात असेल तर त्या जागी.

छळाचे प्रकार

  1. शारीरिक छळ : यात मुख्यत्वे वृद्धावर केलेल्या शारीरिक बळाचा विचार होतो. एखाद्या वृद्ध व्यक्तीला जर मारणे, चटके देणे, ओचकारणे, बोचकारणे, ढकलून देणे यांसारख्या वागणुकीचे अनुभव येत असतील तर त्याचा शारीरिक छळ होतो आहे असे आपण म्हणू शकतो. तसेच वृध्दाला कुठे जाण्यास-येण्यास प्रतिबंध करणे असेही असू शकते. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ येत होता त्यात एक व्यक्ती एका म्हाताऱ्या बाईला खाटेवरून खाली ढकलून पायाने लाथाडते आहे असे दिसत होते. हा शारीरिक छळच आहे. अंगावर थुंकणे, गळा दाबणे, केस ओढणे, अंगावर धावून जाणे, जबरदस्तीने खायला लावणे हे ही शारीरिक छळाचेच प्रकार आहेत. अर्थात प्रेमाने केलेली किंवा ज्येष्ठ व्यक्तीच्या भल्यासाठी केलेली अन्नाची किंवा औषधाची जबरदस्ती हा शारीरिक छळ नसतो. जर एखाद्या वृध्द व्यक्तीच्या अंगावर जखमा दिसत असतील, ज्याच कांहीही तार्तिक कारण देता येणार नाही अशा प्रकारे फ्रॅक्चर दिसत असेल, त्यांचा चष्मा, काठी मोडली असेल तर त्यांचा शारीरिक छळ होत असण्याची शक्यता असते किंवा आपण असे म्हणू शकतो की सारी लक्षणे ही शारीरिक छळाची आहेत.
  2. मानसिक छळ : यालाच भावनिक हिंसा असे पण म्हणता येईल. भावनिक हिंसा म्हणजे शब्दाने किंवा नि:शब्दपणेसुद्धा पण ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करणे. ज्यामुळे त्या व्यक्तीला दु:ख होईल असे वर्तन करणे. यामध्ये साध्या शब्दांपासून ते थेट जहाल अपमान करण्यापर्यंत सगळ्याचा समावेश होतो.
    एखाया ज्येष्ठ व्यक्तीशी बरोबर सतत हेटाळणीपूर्वक बोलणे, तिला अक्कल नाही, मेली तर बरं, अशाप्रकारे शिव्याशाप देणे, बळीचा बकरा बनवणे, अंगावर ओरडणे किंवा त्याच्याशी बोलायचंच नाही. वयानुरूप मान न देता अगदी लहान मुलासारखे वागवणे. हे सारे भावनिक छळाचेच प्रकार आहेत. जर त्या वृध्द व्यक्तीचे वागणे बदललेले दिसत असले म्हणजे तिचे नजरेला नजर मिळवणे होत नाहीये, ती व्यक्ती अतिशय नैराश्यात बुडालेली वाटते आहे, सतत मृत्यूच्या गोष्टी करते आहे, असहाय्य दिसते आहे तर ती व्यक्ती मनातून अतिशय दु:खी आहे. कदाचित् तिच्या बाबत भावनिक हिंसेचा अनुभव येत असावा असा आपण निष्कर्ष काढू शकतो.
  3. दुर्लक्ष (neglect) : दुर्लक्ष म्हणजे वृध्द व्यक्तीच्या अगदी आवश्यक अशा गरजाही पूर्ण न करणे. जसं की कपडे, अन्न, निवारा, औषधे, कसल्याही प्रकारची मदत किंवा त्यांना इतर लोकांना अथवा त्यांच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांना भेटण्यास मनाई करणे. असे वृद्ध हे अनेकदा अतिशय अस्वच्छ अवस्थेत दिसून येतात. त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ झालेली त्यांच्याकडे पाहिले तरी लक्षात येते.
  4. आर्थिक छळ: वृध्दाचा आर्थिक छळ म्हणजे चक्क त्यांची पैशाच्या बाबतीत फसवणूक करणे. चेकवर खोट्या सह्या करणे, जबरदस्तीने सह्या घेणे किंवा एखाद्या योजनेची चुकीची माहिती देऊन त्यांचे आर्थिक नुकसान करणे. त्यांचेच पैसे किंवा मालमत्ता पण त्याचा त्यांनाच निर्वेध उपभोग घेऊ  न देणे. त्यांना धमकावून त्यांचे मृत्यूपत्र आपल्या मर्जीप्रमाणे करायला लावणे.
  5. आरोग्यविषयक छळ: यात मुखत्वे त्यांना योग्य ती आरोग्य किंवा वैद्यकीय सेवा न पुरवणे. कमी किंवा अति औषध देणे. अस्वच्छ अवस्थेत ठेवणे असे वागणे.
  6. लैंगिक छळ: हो वृद्धांचा सुध्दा लैगिक छळ होवू शकतो. त्यांना त्यांच्या मर्जी विरुध्द लैंगिक चित्र, सिनेमे दाखवणे, त्यांच्या शरीर स्वच्छतेच्या निमित्ताने त्यांच्या लैंगिक अवयवांची अयोग्य रीतीने हाताळणी करणे. अशा अवयवांवर जखमा दिसत असतील, त्यांना शौच मार्गातून रक्त पडत असेल तर यापध्दतीचा छळ होतो आहे का असा विचार मनात यायला हवा व त्याचे परीक्षण केले गेले पाहिजे.
  7. स्व-दुर्लक्ष (Self Neglect) : म्हणजे वृद्ध व्यक्ती मुद्दामहून स्वत:कडेच दुर्लक्ष करते. वेळेवर औषध न घेणे, अस्वच्छ रहाणे, चुकीची औषधे घेणे जाणीवपूर्वक धोक्याच्या ठिकाणी जाणे.

जर एखाद्या वृद्धाच्या वागण्यात खूप फरक पडला असेल, त्याचे त्याच्या काळजी वाहकाबरोबर सतत वादविवाद होत असतील तर ओळखावे तिथे त्या वृद्धाला कांही प्रश्न आहेत. तिथे कदाचित त्यावृद्धाला त्रास होतो आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्याबाबत होणारे हे हिंसक किंवा छळात्मक प्रकार हे विविध ठिकाणी दिसून येतात. एकदा हे प्रकार आणि लक्षणे समजली की आपण जागरूकतेने आपल्या अवतीभवतीच्या वृद्धांचे निरीक्षण करू लागतो. व त्यांना कांही त्रास होत असेल तर त्याविषयी पावले उचलू शकतो.

लेखन – आरती पेंडसे – मानसतज्ज्ञ व समुपदेशक