पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रियांवर येणारी नियंत्रणं

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत मूल्य व विचारसरणी ही पुरुषसत्ताक असते व स्त्रियांवर विविध प्रकारे बंधने व नियंत्रणे ठेवणारी आहे. ही नियंत्रणे विविध प्रकारची असतात.

श्रमांवर नियंत्रण

स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या श्रमांवर पुरुषांचे नियंत्रण असते. स्त्रियांच्या घरातील श्रमांवर नियंत्रण असते. घरकामात असंख्य कामे असतात ही मुख्यत: स्त्रीचीच जबाबदारी मानली जाते ही कामे अनेकदा ‘न दिसणारी’ असतात, त्यांचे स्वरूप गुंतागुंतीचे, किचकट, कंटाळवाणे असते. ती सुगरण आहे, हे सांगितल्या शिवाय तिच्या बाईपणाला जणू पूर्णत्वच येत नाही तशी तिची व इतरांचीही मानसिकता बनवली जाते व सतत काहिना काही रांधून घालण्यात ती धन्यता मानते पण यात तिच्या आवडीचे पदार्थ जवळपास नसतातच पण या आनंदात आपल्या क्षमता व शक्ती यांचा योग्य तो वापर करायला बाई विसरते. घराबाहेर स्त्रियांनी कितीही जबाबदाऱ्या पार पाडल्या तरी घराची जबाबदारी मुख्यत: तिचीच आहे, असे मानले जाते या श्रमांचा स्त्रियांना कोणताही मोबदला दिला जात नाही, हा thankless job आहे व त्याचा अंतिम फायदा पुरुषांना मिळतो.

स्त्रियांच्या घरातील श्रमबरोबरच घराबाहेरील श्रमांवर ही पुरुषांचे नियंत्रण असते तिने घराबाहेर जाऊन काम करावे किंवा नाही, कोणते करावे, कोणत्या वेळात, कोणत्या एरियात, इ. निर्णयांवरही नियंत्रण ठेवले जाते तिच्या उत्पन्नावर पुरुषाचे नियंत्रण असते. किती पैसे मिळवायचे, मिळालेले पैसे घरातील पुरुषांच्या अथवा मोठयांच्या हातात द्यायचे किंवा हे पैसे तिने कसे खर्च करायचे यावर वडील, नवरा, भाऊ यांचे नियंत्रण असते. तिचे पैसे घरातच खर्च होतील याची काळजी घेतली जाते जर तिने ते पैसे स्वतः:च्या मर्जीने खर्च केले तर त्याचा हिशोब मागितला जातो. अनेकदा नोकरी करणाऱ्या, उच्चं पदावरच्या महिलांचे डेबिट –क्रेडिटकार्ड नवऱ्याकडे असते. तोच सगळा तिचा आर्थिक व्यवहार बघत असतो. तिचे पैसे त्याने का? कशाला? कुठे खर्च केले असे प्रश्न विचारायची मुभा तिला नसते. तिचे घराबाहेर पडणे पुरुषसत्तेला सोयीचे असते तो पर्यंतच स्वीकारले जाते.

या सतत करत असलेल्या अविरत कामाचा व इतरांच्या अपेक्षांना पुरे पडण्याच्या धडपडीचा -ताणाचा परिणाम स्त्रियांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. घर, घरातील माणसं आधी व स्वतःचा विचार नंतर ही स्त्रीची मानसिकता असल्याने ती स्वत:ही व पर्यायाने कुटुंब ही तिच्या गरजांकडे फारसे गांभीर्याने बघताना दिसत नाही. विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक आजारांना स्त्रिया तोंड देत असतात, सतत कामाचा, स्वत:ला सिध्द करायचा ताण, मनात घर करून राहिलेली कमीपणाची भावना, घरातील व्यसनाधीनता, शारीरिक – मानसिक – आर्थिक हिंसा याचा खूप मोठा परिणाम बायांच्या आयुष्यावर होत असतो व जीवनाला नाकारणं, असहायतेची भावना निर्माण होणं त्यातूनच त्यांची पावलं आत्महत्येकडे वळतात.

संचार स्वातंत्र्यावर नियंत्रण 

स्त्रियांच्या संचार स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले जाते. यात आमच्या घरातील स्त्रिया फक्त देवाला जायला घराबाहेर पडतात, आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडत नाहीत. अंधार व्हायच्याआत घरी येतात, चांगल्या स्त्रिया रात्री घराबाहेर पडत नाहीत, खानदानी स्त्रिया डोक्यावरून पदर घेऊन आणि नजर जमिनीवर ठेवूनच चालतात. अशी भावनिक बंधने त्यांच्यावरघातली जातात यातून स्त्रियांचे पुरुषांवरचे अवलंबन वाढते. त्या पुरुषांच्या नजरेने जग बघायला शिकतात. पदर, घुंघट, बुरखा हे लैंगिकतेवरील नियंत्रणाची प्रतिके आहेत. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांवरील लैंगिकता व पुनरुत्पादना वरील नियंत्रणासाठी हे गरजेचे ठरते .

मुलीच्या – बाईच्या लैगिकतेवरील नियंत्रण

समाजात स्त्रीची लैंगिक ‘शुद्धता’ ही तिच्या जीवापेक्षाही अधिक मोलाची मानली जाते, लग्नाआधी कोणाही पुरुषाशी तिचे ‘संबंध’ येता कामा नयेत आणि लग्नांनंतर एकाच पुरुषाशी असले पाहिजेत असे बंधन असते. संशय घेणे’ हे देखील बाईच्या लैंगिकतेवरील नियंत्रणच आहे जेणेंकरुन घरात कितीही हिंसा होत असली तरी तिने नवऱ्याशी – कुटुंबाशी एकनिष्ठ रहावे यासाठी हे अस्त्र वापरले जाते. बाईचे ‘चारित्र्य – अब्रु ’ हे तिच्या विरोधकांच्या हातातील महत्त्वाचे शस्त्र असते ज्याला तिला लहानपणापासूनच जपायला व चारित्र्य हननाला घाबरायला शिकवलेले असते. विधवा, परित्यक्त्या स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य नाकारले जाते पण समाजातील पुरुष मात्र त्यांच्याकडे कधीही उपलब्ध असलेली बाई या दृष्टिकोनातूनपाहतात. बलात्कार झालेल्या बाईची बदनामी होते, त्यासाठी तिलाच जबाबदार धरतात पण हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या पुरुषांची – त्याच्या नावाची मात्र चर्चाही होत नाही. पुरुषांवर मात्र लैंगिकतेशी निगडित कुठलेच बंधन नसते उलटत्यांच्या स्वैराचारी वागण्याचे समर्थन केले जाते, `पुरुषाची जात’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते व या वागण्याला बाईलाच जबाबदार धरले जाते.

बाईच्या मूल जन्माला घालण्याच्या अधिकारावर नियंत्रण

लग्न हि औरस संतती जन्माला घालण्याची समाजमान्य व्यवस्था आहे व या व्यवस्थेत मुले जन्माला घालण्यासाठीच साधन म्हणून बाईकडे बघितले जाते असे म्हंटले तर काहीसे कठोर विधान ठरेल, पण मुल जन्माला घालणे, वंश वाढवणे हेच काही प्रत्येक लग्नाचे साध्य असू शकत नाही व प्रत्येक बाईची इच्छाही असू शकत नाही. बाईच जर मुलाला जन्म देणार असेल तर तिला मुलं हवं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार तिला पितृसत्ता व पुरुषप्रधान व्यवस्था देत नाही. मुले केव्हा, किती अंतराने व्हावीत, गर्भनिरोधक कोणते वापरावे ते कोणी वापरावे, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया व केव्हा – कोणी करावी याचे निर्णयही पुरुषांच्या हातात असतात. वाढते गर्भलिंग निदान व स्त्रीलिंगी गर्भपात हे देखील पुनरुत्पादनावरील नियंत्रण आहे.

बाईच्या मातृत्वाचे गोडवे गायले जातात व आई झाल्याशिवाय बाईच्या आयुष्याचे सार्थक नाही असे मानले जाते व तिलाही तसेच वाटते. मात्र, हे मातृत्व विवाहाअंतर्गतचेच असणे अपेक्षित असते. लग्नाअंतर्गत जन्माला येणाऱ्या मुलासाठी व त्याच्या आईसाठी सोहाळे असतात. लाडाने डोहाळे पुरवले जातात पण हेच मुल जर लग्न बंधनातले नसेल, कुमारी मातेचे असेल तर त्याच्यासाठी मात्र समाजाचे वेगळे नियम असतात. ते मुल – त्याची आई यांना समाजात स्थान नसते, कौतुक – डोहाळे काहीच नसतं मिळते फक्त बदनामी व नाकारलेपण कारण या बाळामुळे कोणाचाही औरस वंश वाढणार नसतो. समाजाच्या दुटप्पीपणात मुली व बालकं होरपळून निघतात. विधवा – परित्यक्त्या यांना मुल जन्माला घालण्याचा अधिकार समाज देत नाही, ज्या बाईला मुल होत नाही तिला समाजात दुय्य्म स्थान दिलं जातं.

आपण मूल का जन्माला घालतो? असा प्रश्न बायकांना विचारला तर ‘वैयक्तिक’ नक्की कारण सांगता येत नाही. मुलं काय होतातच असं उत्तर दिलं जातं. शारीरिक – मानसिक पातळीवर गर्भारपणं पेलणं शक्य नसलं तरी तीला दिली जातात, घरातल्या कामांच्या – कमावण्याच्या – मुलांच्या व वारंवार होणाऱ्या गर्भधारणा – गर्भपाताच्या चक्रात बाई अगदी पिचून जाते. तिने मुल नको म्हंटले की तिच्या बाईपणाला व चारित्र्याला आव्हान दिले जाते.

मूलबाळ सांभाळण्याची मुख्य जबाबदारी बाईचीच आहे असे मानले जाते. त्यामुळे अनेकदा तिच्या करिअर वर परिणाम होतो. उच्चंशिक्षित मुली दिवस गेल्यानंतर – बाळांतपणानंतर नोकरीसोडून बाळाचा सांभाळ करण्यासाठी घरी राहातात. बाळाला आईचीच गरज असते असे ही व्यवस्था तिच्यावर सतत बिंबवत असते व आपण यात काहीच करू शकत नाही – जबाबदारी घेऊ शकत नाही असा सोयीचा मार्ग ‘बाबा ‘ पुरुष घेताना दिसतात.

एकूणच बाईच्या जन्माला येण्यागोदर पासूनच ते मरेपर्यंत पुरुषप्रधान व्यवस्थेत ती तिच्या मनाप्रमाणे आयुष्य जगत नाही, तिच्या आयुष्याचे निर्णय इतर लोकचं घेत असतात. तिला प्रत्येक गोष्टीसाठी जाणूनबुजून दुसऱ्यावर अवलंबून ठेवलं जात. त्यातूनच तिला अनेक प्रकारच्या नियंत्रणानां आणि त्यातून होणाऱ्या हिंसेला समोर जावं लागतं.
एकंदरच पुरुषप्रधानता बाईकडे एकसाधन म्हणून बघते व तिचे माणूसपण नाकारते. बाईने मात्र लक्षात घेतले पाहिजे. घटनेने तिला आचार – विचार स्वातंत्र्य दिले आहे व जर पितृसत्ता व पुरुषप्रधान समाज तिच्याकडे साधन – वस्तू या दृष्टिकोनातून बघत असेल तर ते नाकारले पाहिजे व स्वतःकडे माणूस म्हणून बघितले पाहिजे.

लेखन – क्रांती अग्नीहोत्री – डबीर