स्त्री-पुरूषांनी स्विकारावयाच्या महत्वाच्या गोष्टी

स्त्रियांवरील अन्यायांच्या मुळाशी,  समाजात असलेली पुरूषप्रधानता स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान आहे. पुरूषांनी समंजसपणे ही लटकी प्रधानता व स्त्रियांनी दुय्यमता मनातून काढून खालील सत्य समजून घेऊन आचरणात आणली तर स्त्रीपुरूष समतेवर आधारित समाजनिर्मिती होऊ शकेल.

सत्य :-

  • स्त्री ही केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या क्षमता कमी नसतात. विकासाच्या संधी मिळाल्यास तीही सर्व क्षेत्रात चमकू शकते. अशा संधी मिळणे हा तिचा हक्क आहे.
  • स्त्रीलाही बुद्धी, भावभावना असतात म्हणून तिला स्वतंत्र विचार करण्याची कुवत व आत्मसन्मान असतो.
  • स्त्रिया या पुरूषांच्या सेवेकरता निर्माण केलेल्या त्यांच्या गुलाम वा त्यांच्या मालकीच्या भोग वस्तू नव्हेत.
  • स्त्रीचा स्वत:च्या शरीरावर हक्क हवा. शरीरसंबंध, गर्भपात,  मुले केव्हा किती हवीत,  कुटुंबनियोजनाच्या साधनांचा वापर इत्यादीबाबत तिला निर्णयस्वातंत्र्याचा हक्क असायला हवा.
  • स्त्रीचा दर्जा तिला नवरा, मुलेबाळे, मुलगा आहे की नाही यावर अवलंबून नसून तिचे कर्तुत्व व गुण यावर अवलंबून आहे.
  • स्वत:ची प्रकृती प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी आहार, औषधोपचार, व्यायाम याकडे स्त्रीने लक्ष द्यायला हवे. आयुष्य गुणवत्तापूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक सवड काढायला हवी.
  • स्त्री सुशिक्षित झाल्याने कुटुंबाच्या गुणात्मकतेत लक्षणीय फरक पडतो. शिवाय, क्षमतेप्रमाणे शिक्षण मिळणे हा तिचा हक्क आहे.
  • घरकाम हे ‘काम’ म्हणून गणले गेले पाहिजे. त्यात होणा-या बचतीमुळे, घरच्या व्यवसायातील मदतीमुळे स्त्री एकप्रकारे अर्थोत्पादनच करत असते. त्या प्रमाणात तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवे.
  • घर व मुले पतीपत्नीची म्हणून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी टोघांनीही उचलली पाहिजे. बालके ही राष्ट्राची संपत्ती असल्याने त्याच्या निगराणीसाठी स्त्रीला सोईसुविधा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.
  • एकंदर लोकसंख्येच्या जवळ जवळ निम्म्याने स्त्रिया आहेत. म्हणून त्यांच्या विकासाशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे. हे लक्षात घेऊन शासन, स्त्रियांसाठी अनेक सोयी-सवलती देते,  योजना आखते,  कायदे करते. पण त्याचा उपयोग होण्यासाठी शासन संस्था, राजकीय संस्था, न्याय व कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था इत्यादी ठिकाणी बहुसंख्येने असलेल्या पुरूषांनी स्त्रियांबद्दल योग्य तो दृष्टीकोन ठेवून स्त्रियांना न्याय देणारी भूमिका प्रामाणिकपणे बजावली पाहिजे व स्त्रियांनी हे होईल हे पहायला हवे.
  • ह्या तथ्यांच्या बाबतीत चुकीचा असा आचार व विचार जेथे जेथे आढळेल, तेथे तेथे ही तथ्ये पटलेल्या स्त्रीपुरूषांनी, परिस्थितीनुरूप, योग्य तो विचार निदान मांडला तरी समाज परिवर्तनाच्या दिशेने जायला थोडी मदत होईल.

संदर्भ – नारी समता मंच, पुस्तक – कोंडी निर्मला गोखले