पुरुषप्रधान समाजव्यवस्था म्हणजे काय?

पुरुषप्रधान समाज व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यात घरात आणि घराबाहेर, सर्वत्र पुरुषांना महत्व असते व सगळीकडे पुरुषांचे वर्चस्व असते आणि स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी दर्जाच्या मानल्या जातात. याव्यवस्थेत स्त्रियां व लहान मुले संपूर्णपणे विविध पातळीवर (जसे कि आर्थिक, मानसिक, भावनिक….इ) पुरुषांवर अवलंबून रहातील व पुरुषांच्या नियंत्रणाखाली रहातील अशी यंत्रणा – विचार सरणी जाणिवपूर्वक पुरुष व स्त्रिया दोघांमधेही तयार केली जाते व त्यानुसार हि व्यवस्था चालेल अशी काळजी ही घेतली जाते. अर्थातच या पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचे मूळ सत्ताकारण हे आहे. ही एक सामाजिक व्यवस्था आहे ज्यात पुरुषांचे राजकीय नेतृत्व, नैतिक अधिकार, सामाजिक प्रतिष्ठा, संपत्ती यावर सत्ता व नियंत्रण आहे.कौटुंबिक क्षेत्रात वडिल किंवा कुटुंबातील इतर पुरुष, स्त्रिया आणि मुलांवर अधिकार दाखवतात. या व्यवस्थेमध्ये, स्त्रीयां व पुरुषांना समाजाने घालून दिलेल्या नियमांनुसारच चालावे / वागावे लागते. धर्म, समाज आणि रूढीवादी परंपरा पुरुषप्रधानतेला अधिक बळकट करतात. हीच पुरुषप्रधान समाज व्यवस्था शतकानुशतके स्त्रियांवर दडपशाही करत आली आहे.

पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात प्रामुख्याने पुरुषांची सत्ता असते. या सर्व व्यवस्थांमध्ये स्त्रियांना वाटा दयायचा किंवा नाही, दयायचा झाला तर किती दयायचा हे हि व्यवस्था ठरवते. स्त्रियांना कायमच दुय्यम स्थान असते. पुरुषांचे स्थान घराबाहेर व महिलांचे स्थान घरात आहे हे ठरलेले आहे अर्थातच यात घराबाहेरील जबाबदाऱ्या पुरुषाने घ्यायच्या आहेत त्यात प्रामुख्याने अर्थाजन व घराबाहेरील व्यवहारांची जबाबदारी आणि प्रजननाची, मुले व घर सांभाळायची जबाबदारी स्त्रीने घ्यायची आहे असा विचार दिसतो.

धर्म, जात, आर्थिक स्तर, विभाग, देश, इ.नुसार पुरुषप्रधानतेचे स्वरूप वेगळे, कमी – जास्त असू शकते पण प्राथमिक सत्ता मात्र पुरुषांच्याच हातात आहे. सर्वचसमाजात एक पुरुष व एक स्त्री आणि त्यांच्या विवाह संबंधातून झालेली मुले यांना ‘कुटुंब’ मानले जाते. त्यावर मालकी हक्क पुरुषाचा असतो. भारतात स्त्रियां व बालके त्यांच्या नावाच्या पुढे पुरुषाचे नाव लावतात. जसे की बालकाच्या जन्मानंतर त्याच्या नावानंतर वडिलांचे नाव – आडनाव लावले जाते. स्त्रीचे लग्न झाल्यानंतर ती स्वतः:च्या नावा नंतर नवऱ्याचे नाव लावते तर काही ठिकाणी लग्नानंतर तिचे पहिले नाव बदलण्याची प्रथा आहे. यात तिच्या संमतीचा विचार केला जात नाही.
पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत सर्वकाही पुरुषांचेच असते व त्यांवर त्यांचा मालकी हक्क व नियंत्रण गृहीत धरले गेले आहे. घर – जमीन – शेत – मुले आणि स्त्रिया….हे सारेच पुरुषांच्या नावावर असते व हा अधिकार त्यांना जन्माने मिळतो. त्यांच्या कर्मावर तो ठरत नाही. या साठी पितृसत्ताक समाजव्यवस्थाही कारणीभूत आहे. ‘पितृसत्ता’ म्हणजे ‘पित्याची सत्ता’ ज्यात संपत्ती पित्याकडून पुत्राकडे (एका पुरुषाकडून दुसर्यात पुरुषाकडे) वारसाहक्काने जाते.पितृसत्तेत पिता कोण हे महत्त्वाचे असते. माता ही किंवा दुसरी, अशी कोणीही असू शकते त्यामुळे जरी समाजात स्त्री – पुरुष संख्या गुणोत्तर सम – समान दिसत असले (जे सहसा कधी आढळत नाही) तरी हक्काचे, अधिकाराचे गुणोत्तर मात्र विषमच आहे. या व्यवस्थेत बाई ही पुरुषांप्रमाणे समान हक्क असलेली ‘माणूस’ मानली जात नाही.

लेखन – क्रांती अग्नीहोत्री – डबीर