या मनामनातून बांधू या एक वाट जाणारी…..

पल्या आसपासची, ओळखीची, जिवाभावाची किंवा अगदी अनोळखी, कधीही न पाहिलेली आठ लाख माणसं दर वर्षी या जगाला रामराम म्हणतायत. युद्धं, दंगली, दहशतवादी हल्ले या सगळ्यांमध्ये जेवढे लोक मरतात त्याहून अधिक जण आपल्या हाताने स्वतःच जीवन संपवतायत. आपल्या देशात गेल्या दशकात दर वर्षी एक लाखाहून अधिक व्यक्ती जीव देतायत. दर तासाला चार आयुष्यं अर्ध्यावर संपतायत. आयुष्याला, आयुष्यातला दु:खाला, त्रासाला, समस्यांना, मानहानीला, कर्जाला, हिंसेला, आजारपणाला कंटाळलेली हि माणसं जगणंच नको म्हणतायत. आणि जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणारे किमान दहा ते वीस जण आहेत हेही तितकंच चिंताजनक.

जगभरात होणाऱ्या अत्म्हत्यांपैकी सर्वात जास्त आत्महत्या १५ ते २९ या वयोगटात होतायत. उमेदीने आयुष्य सुरु करण्याच्या वयात आपलं जीवन संपणाऱ्या मुला-मुलींच्या मनावरती इतको खोल ओरखडे कशाने उठत असतील? या वयात मृत्युचं पाहिलं कारण आत्महत्या असावं असं कधी मनातही येणार नाही. पण हे वास्तव आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकं लवकर आपण त्याबाबत काही करू शकू.

कौटुंबिक समस्या, नातेसंबंधांमधील दुरावा, दुभंगलेली घरं ही आत्महत्यांचं हे पाहिलं कारण आहे हे भारताची २०१४ सालची आकडेवारी सांगते. त्या पाठोपाठ चिवट आणि दुर्धर आजारपणं हे आत्महत्यांचं महत्वाचं कारण आहे. दर वर्षी २०,००० हून अधिक व्यक्ती स्वतःच्या किंवा घरच्या कुणाच्या आजारपणाला कंटाळून एका व्यक्तीने आपल्या मुलाचा जीव घेऊन नंतर स्वतःच आयुष्यही संपवलं. इतकी हताशा आणि पराकोटीची असहाय्यता अनेकांना आत्महत्यांकडे ढकलतीये. खर्चाचा बोजा, वैद्यकीय उपचारांची परवड वेगळीच. मानसिक आणि दुर्धर आजारांमुळे होणाऱ्या आत्महत्या वाढत आहेत.

हताशा, असहाय्यपणाची भावना आणि आपण कवडीमोल आहोत, आपली कुणालाच किंमत नाही या भावना प्रबळ होत जातात तेव्हा आत्महत्येचा विचारही बळकट होत जातो आणि स्वतःचा जीव संपवण्याची कृती केली जाते. मात्र ती दर वेळी अचानक नसते. हे सर्व विचार , भावना, मनस्थिती आपल्याला कशाकशातून कळत असते. आपल्यापर्यत पोचत असते. मात्र त्या खुणा आजूबाजूच्यांना वाटता न आल्यामुळे होत्याचं नव्हतं होतं हे आता सिद्ध झालं आहे जवळजवळ ७०% आत्महत्यांमध्ये अशा काही न काही खुणा आढळून येतात. त्या वेळीच ओळखता आल्या तर संबंधित व्यक्तीचा जीव वाचवता येऊ शकतो.या खाणा-लक्षणं आपल्याला प्रत्येकालाच कधी न कधी जाणवलेली असतात. मात्र आपण त्या कडे फारसं लक्ष देत नाही. कधी कधी दुःखाच, समस्येचं सावट नाहीसं होतं आणि आपण त्यातून बाहेर येतो. मात्र दर वेळी, प्रत्येकाच्या बाबत असं होतचं असं नाही. जेव्हा आपला प्रश्न, समस्या, दु:ख संपणारच नाही, या वेदनेला अंत नाही असं मनात ठाम बसतं तेव्हा मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला जातो.

आत्महत्येची शक्यता खालील परिस्थिती जास्त वाढते.

  • मनासिक आजार – नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, सिझोफ्रेनिया, चिंता.
  • अंमली पदार्थाचं व्यसन
  • गंभीर, दुर्धर आजार, वेदना
  • आयुष्यातील तणावकारक घटना – नोकरी जाणं, आर्थिक कर्ज, जिवलगाचा मृत्यू, घटस्फोट.
  • छळ, नातेसंबंधातील तणाव, बेरोजगारी असे बराच काळ टिकणारे तणावपूर्व घटक
  • शास्त्र, अमली पदार्थाची उपलब्धता
  • दुसऱ्या कोणाची आत्महत्या पाहणं, आत्महत्येचं सखोल वर्णन, तपशील माहित असणं
  • पूर्वी केलेला आत्महत्येचा प्रयत्न

आत्महत्येचे विचार दर्शवणाऱ्या खुणा-लक्षणं

  • व्यक्तीच्या रोजच्या वागण्यात जाणवेल इतका फरक
  • आत्महत्येबद्दल, स्वतःचं आयुष्य संपविण्याबाबत बोलणं
  • जगण्यासारखं काही राहिलेलं नाही अशी भावना, भाषा
  • दुसऱ्यासाठी ओझं आहोत अशी भावना
  •  अडकून पडल्याची, सुटका करता येत नाही हि भावना प्रबळ
  •  मूडमध्ये, झोपण्याच्या, खाण्याच्या सवयीत बदल
  •  शाळा, अभ्यास, काम, आवडीच्या कसल्याच गोष्टीत रस नाही
  •  दारू किंवा अंमली पदार्थाचं सेवन, जीवावर बेतणाऱ्या कृती
  •  अपराधीपणा, शरम, चिंता, राग स्वतःची किंमत उरली नसल्याची भावना प्रबळ
  •  लोकांना भेटून किंवा फोनवर निरोपाची भाषा, निरवानिरव करणं
  •  स्वतःच्या आवडीच्या वस्तू इतरांना देऊन टाकणं
  • सतत दु:खी असणाऱ्या व्यक्तीच्या मूडमध्ये अचानक बदल आणि आनंदी
  • स्वतःला इजा किंवा जीव देण्याचे विचार किंवा कृती- प्रयत्न

लेखन – मेधा काळे