पावसाने झोडपले अन नव-याने मारले, तर तक्रार कोणाकडे करणार!

पावसापासून वाचण्यासाठी अनेक उपाय असतात तसेच मारणाऱ्या नवऱ्यालाही सरळ करता येतं..

पाऊस ही घटना नैसर्गिक आहे पण नव-याने केलेली मारहाण नक्कीच नैसर्गिक घटना नाही. पावसाने झोडपले तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण छत्रीचा वापर करतो. ती नसेल तर कुठेतरी आडोसा शोधतो. मारहाणीपासूनही स्वतःचे संरक्षण करता येईल. मारहाण होणे जितके चुकीचे तितकेच मारहाण सहन करावी लागणे, त्याबद्दल विरोध करता न येणेही बाईसाठी अन्यायकारक आहे. या अन्यायाला स्वाभाविक ठरवण्याच्या प्रयत्नातूनच अशा भ्रामक किंवा हतबल म्हणी तयार होतात. आज काळ बदलला आहे. हिंसा सहन करत माजघरात रडत बसण्याचे दिवस आता हळू हळू जात आहेत. मुली अधिक खंबीर आणि मोकळ्या होत आहेत. नवऱ्याने मारलं तर तक्रार करण्यासाठी नक्कीच जागा आहेत. कुणाला अद्दल घडवण्यासाठी नाही तर स्वतःचा सुरक्षित राहण्याचा अधिकार मिळवण्यासाठी या जागांचा उपयोग करता येईल. या जुनाट म्हणी आता आपण दुरुस्त करणंही तितकंच गरजेचं आहे.

हिंसा सहन करू नका, त्याच्याविरुद्ध बोला, तक्रार करा.