मुलांसाठी – शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण/हिंसा ओळखण्यासाठीची प्रश्नावली

तुमच्या मुलांच्याबाबत किंवा तुम्ही जर स्वतः मूल (म्हणजे ० ते १८ वर्षापर्यतचे) असाल तर तुमच्याबाबत खालील पैकी एकजरी गोष्ट कोणी करत असेल तर तीही हिंसा आहे हे लक्षात ठेवा. ओळखीची/नात्यातील किंवा अनोळखी कोणीही व्यक्ती तुमच्यासोबत असे वागू शकते.

  1. तुम्हाला खाऊ किंवा भेटवस्तू (गिफ्ट) देऊन किंवा त्याचे आमिष दाखवून एकट्यालाच बोलवतात का, जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात का?
  2. तुम्हाला नको असताना किंवा तुम्ही एकटे आहात असे पाहून तुमच्या गालांची किंवा ओठांची कोणी चुंबनं/पापी घेतात का?/ मिठीत घेतात का?
  3. तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटरवर स्त्री-पुरुषांचे नग्न (उघडे) फोटो, व्हिडिओ दाखवतात का?
  4. तुम्हाला एकटंच बघून किंवा बोलवून तुमच्या खाजगी अवयवांना (म्हणजे तुमची छाती, शुची, शीची जागा इथे ) कोणी हात लावतं का/लावला आहे का?
  5. तुम्हाला स्वतःच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या खाजगी अवयवांना  ( म्हणजे छाती, शुची, शीची जागा इथे) हात लावायला सांगतात का?
  6. तुमच्या खाजगी अवयवाशी (म्हणजे तुमची छाती, शुची, शीची जागा इथे) जवळीक करून त्यांच्या शरीराच्या एखाद्या भागाचा किंवा वस्तूचा वापर करतात का?
  7. तुमच्या खाजगी अवयवांना हात लावून ‘हा आपला सिक्रेट खेळ आहे, कोणाला सांगायचं नाही’ असं म्हणतात का?
  8. तुमच्या खाजगी अवयवांना हात लावून नंतर तुम्हाला, ‘कोणाला सांगू नको, नाहीतर सगळ्यांना सांगेन.’ किंवा ‘तुलाच मारून टाकेन’ अशा धमक्या देतात का?

असं कोणी आपल्याशी वागत असेल, बोलत असेल तर लगेच आपल्या पालकांना किंवा विश्वासातील व्यक्तींना सांगा. घाबरू नका, स्वतःला काही त्रास करून घेऊ नका.

लेखन –  विद्या देशमुख