लैंगिक हिंसेबाबत आपल्याला माहित आहे का?

भारतात स्त्रियांविरोधात होणाऱ्या सामान्य गुन्ह्यांपैकी बलात्कार हा चौथा मोठा गुन्हा आहे. (सेफसिटी)

जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अंदाजानुसार जगभरात तीन पैकी एका महिलेला (३५%) तिच्या आयुष्यात कधी ना कधी स्वतःच्या जोडीदाराकडून अथवा इतरांकडून शारीरिक/लैंगिक हिंसेचा सामना करावा लागला आहे. (जागतिक आरोग्य संघटना नोव्हेंबर २०१७ अहवाल)

हिंसेमुळे स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि अनेकदा त्या एड्स सारख्या आजारांनाही बळी पडतात.

२०१९ मध्ये महाराष्ट्रात बाल लैंगिक अत्याचाराच्या ६५५८ केसेस दाखल झाल्या. बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ९४.६% प्रकरणांमध्ये बाललैंगिक अत्याचार परिचयाच्या व्यक्ति कडून तर ५३.७% प्रकरणांत कुटुंबातल्या अथवा नात्यातल्या व्यक्तिंकडून होताना दिसतो.

बलात्काराचा सामना करावा लागलेल्या भारतातील पाच मुलांपैकी एक मूल हे महाराष्ट्रातील आहे. आपल्याच घराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार होतो. त्यांच्याच ओळखीचे, विश्वासातील पुरुष उदा. काका, मोठे भाऊ, शिक्षक आणि अगदी वडील यांच्याकडून हा अपराध होताना दिसतो. मुलांचे शोषण करणारे मुलांच्या शाळा, मैदान आणि अगदी शाळेच्या बसमध्येही असू शकतात.

आणि ही गंभीर आकडेवारी आहे फक्त दाखल झालेल्या गुन्ह्यांची. असे हजारो गुन्हे आहेत जे दाखल होत नाहीत. मुलं दिवसागणिक आपल्यावरील अन्याय सहन करतात, गप्प राहतात कारण त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही किंवा अशा गोष्टी बोलणं निषिद्ध आहे म्हणून. (हिंदुस्तान टाईम्स)

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागानुसार २०१९ मध्ये महाराष्ट्रात मुलांवरील बलात्काराच्या ३११७ केसेस दाखल झाल्या. आकडेवारी सांगते की देशभरात मुलांवरील बलात्काराचे २६,१९२ गुन्हे नोंदवले गेले.

सरकारी आकडेवारी नुसार २०१६ ते २०१८ दरम्यान कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या केसेसमध्ये तब्बल ७९% वाढ झाली आहे. (२०१६– ५३९ केसेस, २०१७- ५७० केसेस, २०१९- ९६५ केसेस). २०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्याच्या २०१ तक्रारी आल्या.

२०१८ च्या पहिल्या सात महिन्यात देशभरात लैंगिक छळाचे २७,५३३ गुन्हे नोंदवले गेले. (इंडियास्स्पेंड)
२०१९ मध्ये देशभरात लैंगिक छळाचे १,२०,४०० गुन्हे नोंदवले गेले. (बलात्कार – ३२,०३३, विनयभंग – ८८,३६७). २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये स्त्रियां विरोधी गुन्ह्यांमध्ये ७.३% वाढ झालेली आहे.

बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये १८.९% वाढ २०१९ मध्ये आढळून आली आहे.

लैंगिक छळ / हिंसा म्हणजे..?

लैंगिक छळामध्ये स्त्रीच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केल्या जाणा-या कोणत्याही लैंगिक स्वरूपाच्या कृतीचा समावेश होतो. शारीरिक, तोंडी किंवा हावभाव किंवा इतर माध्यमांतून स्त्रिच्या इच्छेविरुध्द केलेली लैंगिक कृती आणि वर्तन याला लैंगिक छळ व्याख्येमध्ये धरलं जातं. स्त्रियांना दुय्यम मानून त्यांचा अपमान करणे हा देखील लैंगिक छळ आहे. महिलेच्या इच्छेविरुद्ध केलेली कोणतीही कृती लैंगिक छळामध्ये धरली जाते.

लैंगिक छळ म्हणजे नक्की काय?

  • मीना १६ वर्षाची आहे तिचे आई-बाबा दोघेही कामाला जातात. ते दोघेही कामाला गेल्यावर तिच्या आईचा भाऊ घरी येतो. मीनाला काही तरी आणायला सांगायच्या बहाण्यांनी तिच्या अंगाला सगळीकडे स्पर्श करतो, जबरदस्ती पप्पी घेतो आणि ‘हे केलेलं कोणाला सांगितलं तर तूच घाणेरडी आहे अस सगळ्यांना सांगेन असं सांगतो’.
  • हिना १२ वर्षाची आहे ती शाळेत एस.टी. ने जाते तेव्हा एस.टीत तिच्या ओळखीचे काका रोज तिला आपल्या मांडीवर जबरदस्ती बसवतात आणि तिच्या छातीला हात लावतात, तिचा हात जबरदस्ती त्यांच्या लिंगाला लावायला लावतात. ‘हे कोणाला सांगितलंस तर तुला मारून टाकेन’ अस म्हणतात.
  • शकुंतला ज्युनिअर कॉलेजला जाते. रस्त्यावरून जाताना काही मुलं तिला बघून गाणी म्हणतात, तिच्या दिसण्यावर, ड्रेसवर कॉमेंट्स करतात.
  • फंल्सिचं कॉलेजमध्ये एका मुलावर प्रेम आहे पण तो तिला म्हणतो, ‘तुझं माझ्यावर खरचं प्रेम असेल तर माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवशील, नाही ठेवलेस तर तुझं माझ्यावर प्रेम नाही’.
  • नसरीनचा मित्र तिला मोबाईलवरून तिच्या इच्छेविरुद्ध मुला-मुलींचे नग्न फोटो, व्हिडीओ पाठवितो.
  • कलिकाचा तिच्या फेसबुकवरील फोटो वापरून काही मुलं त्याचे अश्लील फोटो तयार करतात.
  • ज्यूलीला शाळेत जाताना काही मुलं जबरदस्तीने तिला घेऊन जातात आणि तिच्यावर बलात्कार करतात.
  • राधाताई गावात राहतात. तिचा नवरा बाहेर गावी गेला आहे, हे तिच्या दिराला समजल्यावर तो तिच्या घरी येतो आणि तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करतो.
  • लीना इंजीनियर आहे ती कंपनीत काम करते तिला घरी जायला उशीर होतो हे काही लोक रोज बघायचे आणि एक दिवशी कोणीही सोबत नाही हे बघून तिला जबरदस्तीने गाडीतून घेऊन गेले, तिच्यावर बलात्कार करून कोणी नसलेल्या ठिकाणी फेकून दिले.
  • रेखाबाई गावातील सावकाराच्या शेतात कामाला जातात. एक दिवस त्यांना काम करता करता उशीर झाला होता. हे सावकाराच्या लक्षात आल्यावर तिला घरी सोडायच्या निमित्ताने जबरदस्तीने शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करतो.

आपल्याबरोबर किंवा इतर कोणाबरोबर ही अशा घटना घडत असतील तर आपण गप्प न बसता बोलायला पाहिजे. हिंसा करणाऱ्यांची तक्रार पोलीस स्टेशनला केलीच पाहिजे. कारण आपण बोललो नाही तर हे गुन्हेगार आपल्यावर अन्याय करत राहतील आणि अशा प्रकारचे कृत्य करायला गुन्हेगारांचे धाडस वाढत जाईल. त्यामुळे गप्प बसू नका. आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल विश्वासाहॆ व्यक्तीशी बोला. आणि गुन्हेगाराची तक्रार पोलीसस्टेशनमध्ये जरूर करा.