बलात्कार म्हणजे काय?

२०१३ मध्ये भारतात ‘बलात्कार’ याची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे, यानुसार दुसऱ्या स्त्रीच्या योनीमध्येच नाही तर तोंड, गुदद्वार, मूत्रमार्ग किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये कोणत्याही हद्दीपर्यंत शिश्न किंवा शरीराचा कोणताही भाग, कोणत्याही वस्तू आत घालणे किंवा महिलेला आपल्याबरोबर, दुस-या व्यक्तीबरोबर असं करण्याची जबरदस्ती करणे.

मुली/स्त्रिया यांच्या लैंगिक / खाजगी अवयवांना तोंड लावणे किंवा स्पर्श करणे याचाही समावेश लैंगिक हल्ले मध्ये केला आहे.
बालात्काराच्या या नवीन सुधारलेल्या क्रिमिनल लॉ (अमेंडमेंट) २०१३ कायद्यानुसार परवानगीची वयोमर्यादा (एज ऑफ कंन्सेट) १८ वर्षापर्यंत वाढविलेले आहे.

ज्याचा अर्थ असा आहे की, अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर/स्त्रीवर कोणत्याही लैंगिक क्रिया करण्यास तिची परवानगी असली तरी कायद्यानुसार तो बलात्कार आहे.

बलात्कार कोण आणि का करतात?

जे पुरुष मोठमोठ्या पदावर आहेत जसे राजकीय नेते, उच्च जातीतील पुरुष, सरकारी कमर्चारी, फिल्म इंडस्ट्री किंवा इतर इंडस्ट्री मधील उच्च पदावर असलेली व्यक्ती, गावातील श्रीमंत पुरुष आपल्या ताकदीचा उपयोग स्त्रियांना त्रास देण्यासाठी, त्याच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी करतात. तसेच व्यावसायिक आणि धार्मिक गुरु पण स्त्रियांचं याच पद्धतीने शोषण करतात. अलीकडेच आपण बघितलं फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक स्त्रिया त्यांच्यावर होणा-या लैंगिक हिंसेबद्दल सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘मी टू’ कॅम्पेन मधून बोलायला लागल्या.

काही ठिकाणी वर्दीतल्या व्यक्तीच त्यांच्या ताकदीचा वापर करून मुली आणि स्त्रियांचं लैंगिक शोषण करतात. खरं तर जाच्याकडेच महिला संरक्षणाची जबाबदारी आहे ते ‘रक्षकच भक्षक होतात.’ जसं की पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी, होस्टेल, जेल, रिमांड होम, बालगृह, सरकारी दवाखाने इथे काम करणाऱ्या व्यक्तीकडूनही महिलांवर, मुलांवर लैंगिक अत्याचार होत असतात.

सामूहिक बलात्कार –

सामूहिक बलात्कार ही महिलांवर होणारी एक अमानवीय हिंसा आहे. ज्याच्यामध्ये एका/अनेक महिलांवर अनेक पुरुष बलात्कार करतात.

पुरुष असं का करतात….

सामूहिक बलात्कार हा भारतात घडणारा सामान्य गुन्हा झाला आहे, जसे महिलांचे अपहरण करून अनेक पुरुष त्यांच्यावर बलात्कार करतात. हे पुरुष त्याच्यावर कितीतरी तास किंवा दिवस तिला सोडण्याअगोदर किंवा तिला मारून टाकण्यापर्यंत अस अमानुष कृत्य त्या महिलेसोबत करत राहतात आणि तिला यातना देतात. अशा घटना आता तर रोजच्या बातम्यांमधून ऐकत आहोत.

सामूहिक बलात्कार करण्यामागे असं करणारे बऱ्याचवेळा त्या स्त्रीला ओळखत असतात, तसचं स्त्रियांनी परंपराच्या विरोधात काही  (वेगळ वागलं) व्यवहार केला, म्हणून ही महिलांवर बलात्कार करून तिला शिक्षा दिली अशी कारणे दिली जातात. समाजाने केलेल्या नियमाच्या विरोधात स्त्री गेली की तिला शिक्षा म्हणून बलात्कार. जसं भवरीदेवी या स्त्री समाज कार्यकर्ती बरोबर बलात्कार केला कारण ती सरकारी कार्यक्रमा अंतर्गत बालविवाह थांबविण्याच काम करत होती.

अजूनही बलात्कार करण्याची कारण म्हणजे स्त्रीच्या कुटुंबाला किंवा एखाद्या समाजाला कमी दाखविण्यासाठी, हिंदू-मुस्लीम सांप्रदायिक दंगल मध्ये एक दुस-याला कमी दाखविण्यासाठी हिंसात्मक पद्धतीने बलात्कार केले जातात तशी उदाहरण आहेत. मणिपूर आणि कश्मीर च्या लोकांनी तिथल्या सैनिकांवर आरोप केलाय की स्थानिक लोकांना घाबरविण्यासाठी स्त्रियांवर बलात्कार करतात.

बलात्कारासारख्या अमानुष कृत्याविरोधात आपण नेहमीच आवाज उठवला पाहिजे. शांत बसू नका! तुमच्या सोबत जे काही झाल त्यात तुमची काहीच चूक नाही हे नेहमी लक्षात ठेवा.

तुमची इच्छा नसेल तर झालेल्या गुन्ह्याची तक्रार पोलिसांमध्ये नाही केली तरी चालेल पण तुम्हाला झालेल्या कृत्याबद्दल न्याय पाहिजे असेल, गुन्हेगाराला शिक्षा द्यायची असेल तर लगेच तक्रार पोलीस ठाण्यात करायला पाहिजे. आपल्याला न्याय मिळणे हा आपला अधिकार आहे.
पुरावा आपण जतन करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी जवळच्या दवाखान्यात लवकर जाणं गरजेच आहे.

(संदर्भ –Standupagainstviolence)

बलात्कार किंवा लैंगिक शोषण झाल्यावर ताबडतोब काय करायला पाहिजे?

  • पोलिसात तक्रार करण्यापूर्वी किंवा वैद्यकीय तपासणीपूर्वी अंगावरील कपडे बदलू अथवा धुवू नयेत.
  • त्याचप्रमाणे योनीचा भाग धुवू नये, आंघोळ करु नये.
  • डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि रिपोर्ट घ्यावा.
  • पोलिसांकडे लगेचच तक्रार करावी. जाताना सोबत विश्वासू व्यक्तीला घेऊन जावे.
  • पोलिसांकडे तक्रार करताना बलात्कार करणारी व्यक्ती अनोळखी असेल तर त्याचे सविस्तर वर्णन सांगावे. उदा. त्याने कोणते कपडे घातले होते, भाषा कोणती होती, त्याचे दिसणे इ.

बलात्कारानंतर गर्भ राहू शकतो. काय कराल? (इमर्जन्सी गर्भनिरोधन आणि दिवस गेले असल्यास सुरक्षित गर्भपात कायद्याची माहिती)

भारतात गर्भपाताला कायद्याने मान्यता आहे. कायद्यानुसार स्त्रीला सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताची सेवा मिळणं हा तिचा अधिकार आहे. स्त्रियांना सुरक्षित गर्भपाताची सेवा नाकारणं म्हणजे लिंगाधारित भेदभावात भर घालण्यासारखं आहे.

गर्भपात हा स्त्रियांचा अधिकार आहे हे कायम लक्षात असू द्या. जगभरातल्या स्त्री चळवळीने सुरक्षित गर्भपाताच्या अधिकारासाठी संघर्ष केला आहे. कारण जिथे शरीरसंबंध, किती मुलं हवीत, कधी हवीत, हवीत का नको या बाबतीत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांना नाही, तिथे सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याने निदान स्वतःच्या शरीरावर आणि मुलं किती आणि कधी हवीत या निर्णयावर स्त्रीचं नियंत्रण राहू शकतं.
कायदा नेमकं काय सांगतो हे थोडक्यात…

वैद्यकीय गर्भपाताच्या १९७१ च्या कायद्यान्वये भारत सरकारने गर्भपात कायदेशीर केला आहे. गरोदर राहिल्यापासून २० आठवडयांच्या आत आणि २०२१ च्या सुधारित कायद्यानुसार विशेष परिस्थितीत (जसे की बलात्कारपीडित स्त्री- बलात्कारामुळे गर्भ राहिल्यास अथवा दिव्यांगस्त्री किंवा नाबालिक मुलगी)२४ आठवड्यांपर्यंत मान्यताप्राप्त आरोग्य केंद्रात प्रशिक्षित डॉक्टरांकडून वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी आहे.
गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांची पात्रता

अ.  एमबीबीएस पदवीप्राप्त नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, ६ महिने कालावधीचा प्रसूती व स्त्रीरोगशास्त्रातील हाउस सर्जन्सी किंवा प्रसूती व स्त्री रोग सुविधा असलेल्या रुगणालयातील १ वर्षाचा अनुभव किंवा नोंदणीकृत रुग्णालयात/प्रशिक्षण केंद्रात २५ गर्भपात केसेसला सहाय्य केलेल्या पैकी किमान ५ गर्भपात स्वतंत्रपणे केले असलेले नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक.
वरील अहर्ता प्राप्त डॉक्टरांना केवळ १२ अठवडयांपर्यंतचे गर्भपात करण्यास परवानगी आहे.

. (नवीन नियमावलीची प्रतीक्षा आहे)
गरोदरपणाच्या १२ व्या आठवडयापासून २० व्या आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी किमान 1 नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचे मत आवश्यक असते.
गरोदरपणाच्या २०व्या आठवडयापासून २४व्या आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी किमान २ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचे मत आवश्यक असते.
केवळ गर्भात लक्षणीय विकृती आढळल्यास २४ आठवड्यांच्या वर गर्भपात करता येऊ शकतो. परंतु अश्या गर्भपातासाठी वैद्यकीय बोर्डाकडून मान्यता मिळवणं आवश्यक असेल.

ब.  स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूती शास्त्र पदविका किंवा पदवी घेतलेले नोंदणीकृत वैदकीय व्यावसायिक.
वरील अहर्ताप्राप्त डॉक्टरांना केवळ २० अठवडयांपर्यंतचे वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी आहे.
गरोदरपणाच्या १२ व्या आठवडयापासून २० व्या आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी किमान दोन नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचे मत आवश्यक असते.

खालील परिस्थितीमध्ये स्त्रीला गर्भपात करण्यासाठी कायद्याने मान्यता आहे.

  1.  गरोदरपणामुळे मातेच्या आरोग्यावर विपरित आणि गंभीर परिणाम होत असेल तर
  2. जन्मणाऱ्या बाळामध्ये गंभीर स्वरूपाचे व्यंग किंवा विकृती असेल तर.
  3.  बलात्कारानंतर स्त्री गरोदर राहिली असेल तर
  4. गर्भनिरोधक साधने व पद्धती वापरूनही गरोदरपण आले असेल तर

गर्भपातासाठी आवश्यक परवानगी

  1. या कायद्याने गर्भपातासाठी स्त्रीची स्वतःची संमती पुरेशी आहे. (इतर कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही.) व त्याबद्दल पूर्णपणे गुप्तता पाळली जाते.
  2. १८ वर्षाखालील तसेच मानसिक रुग्ण असलेल्या मुलींच्या बाबतीत पालकांकडून परवानगी घेतली जाते.

लैंगिक हिंसा/ बलात्कारानंतर शासनाकडून मिळणाऱ्या योजना याची लिंक खाली दिली आहे.

https://womenchild.maharashtra.gov.in/upload/uploadfiles/files/manodheryashasanNirnay.pdf

खालील लिंकवर  क्लिक केल्यानंतर बलात्कार म्हणजे काय? याचे ऑडीओ स्वरूपातील माहिती ऐकू शकता.

http://letstalksexuality.com/sabk-season2-ep-5/