कौटुंबिक हिंसा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे?

असं असत तर कौटुंबिक हिंसा थांबविण्यासाठी सरकारला कायदा करावा लागला नसता.

खरं तर अनेकदा स्वतःच्या कुटुंबातच स्त्रिया व मुलं यांच्यावर हिंसा होताना दिसते. बहुतेक वेळेस या हिंसेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पुरुष किंवा पुरुषप्रधान गोष्टी जबाबदार असतात. हिंसा सत्ता अबाधित ठेवण्यासाठीचे एक हत्यार आहे. पुरुष आपल्याकडची सत्ता शाबूत राखण्यासाठी, स्त्रिया व मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हिंसा करू शकतात. आपल्या समाजाकडे नीट डोळे उघडून पाहिलं तर अशा हिंसेला बळी पडणाऱ्या लाखो स्त्रिया आणि मुलांची आकडेवारी आपल्या समोर येते. मोठ्या प्रमाणात स्त्रिया आणि मुलांना या हिंसेचे गंभीर परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. अनेक गंभीर आजारांमुळे जेवढे घातक परिणाम होत नाहीत तेवढे या हिंसेमुळे बाया आणि मुलांच्या आरोग्यावर होतात. कुटुंब व्यवस्थेतील हे राजकारण समजून घेणं आणि सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी हिंसेला सार्वत्रिक विरोध करणं आपलं कर्तव्य आहे. हिंसामुक्त जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे.