जर मुलांवर लैंगिक अत्याचार झाला असेल, तर……..

1. मुलावर विश्वास ठेवा

लैंगिक अत्याचाराबाबत मुलं सहसा खोटं बोलत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत शहानिशा करण्यासाठी मुलाला अत्याचारी व्यक्तीसमोर नेऊ नका.

 2. शांत राहा

घाबरून, गोंधळून जाऊ नका. अत्याचार करणारी व्यक्ती तुमच्या विश्वासातील असेल तेव्हा धक्का, भीती, राग, लज्जास्पद वाटणं आणि अविश्वास ह्या लगेचच व्यक्त होणा-या प्रतिक्रिया दिसू देऊ नका. तुमचा राग किंवा इतर भावना त्या मुलासमोर दाखवू नका. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो आहे या भावनेनं मूल तुम्हाला झालेल्या अत्याचाराबद्दल मोकळेपणाने सांगणार नाही.

3.  जर अत्याचार होऊन बराच काळ गेला असेल, तर ‘तू मला आधी का नाही सांगितलस?’ असं विचारू नका. मुलांवर प्रश्नांचा भडिमार करू नका

गुन्हेगार हा परिस्थिती स्वतःला हवी तशी फिरविण्यात कुशल असतो. मुलांनी कोणालाही सांगू नये यासाठी घाबरण्यात आलेलं असू शकतं; किंवा लाज, संकोच, स्वतःला दोषी समजणं किंवा साधं कसं सांगावं हे न कळल्यानंही मुल गप्प राहू शकतं. अशा वेळी मुलाला समजून घेतलं जाण्याची, आधाराची गरज असते. त्याला पटवून द्यायला हवं की, त्याचं काही चुकलेलं नाही आणि तुम्ही त्याच्या सोबत ठाम आहात, त्याच्या सुरक्षिततेच्या काळजी घेणार आहात.

4. ओरडू नका किंवा शिक्षा करू नका

कितीही सावधगिरीच्या सूचना दिलेल्या असल्या आणि तरीही मुलाकडून जर चूक झाली असेल, तर त्याच्यावर ओरडण्याची किंवा त्याला शिक्षा करण्याची ही वेळ नव्हे हे लक्षात असू द्या. तुमची आज्ञा पाळली नाही म्हणून त्याच्यावर राग व्यक्त करू नका, किंवा शिक्षा करू नका. अत्याचारामुळे मुलावर आधीच मानसिक आघात झालेला असतो. त्यामुळे त्याला तुमच्या आधाराची गरज आहे याचे भान असू द्या.

 5.  मुलाला पुन्हा एकदा विश्वास द्या.

लहान मुलं अशा परिस्थितीत गोंधळतात किंवा स्वतःला दोषी ठरवतात. ‘हे तू मला सांगितलंस त्याबद्दल मला तुझा अभिमान आहे. हे सर्व सांगायला धैर्य लागतं. यात तुझा काहीही दोष नाही आणि आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत.’ अशा प्रकारे त्याला धीर द्या. त्याला तुमच्याबद्दल विश्वास वाटू द्या.

6. अवास्तव महत्त्व नको

जरूर ती काळजी घ्या, पण घटनेला अवास्तव मह्त्व देऊ नका. मुलाला एरवी इतर मुलांपेक्षा वेगळं वागवू नका.

7. या संदर्भातील माहिती

लैंगिक अत्याचार झालेली मुलं इतरांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांबाबत फार हळवी असतात. वेळोवेळी इतर मुलांसमोर त्या घटनेचा उल्लेखही मुलाला अपायकारक ठरू शकतो.

8. वैद्यकीय चाचणी

जरूर तेव्हा ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या आणि तात्काळ लैंगिक अत्याचार कागदोपत्री दाखल करा. वैद्यकीय तपासणीची, उपचाराची कागदपत्रे जपून ठेवा. गुन्हा दाखल झाला, तर गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी हे फार उपयोगाचं असतं.

9. मदत मागा

अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला तोंड देण्याची भावनिक क्षमता मुलांमध्ये नसते. जरूर तेव्हा समुपदेशक किंवा सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेण्यात गैर काहीच नाही.

 10. अतिशय महत्त्वाचं

मुलाबरोबरचा या बाबतीतील संवाद तुटू देऊ नका, तो मोकळाच ठेवा. मुलावर अत्याचार झालेला आहे, आणि अत्याचारी हा गुन्हेगार आहे हे कायम ध्यानात असू द्या.

(संदर्भ – ‘मुलांचे लैंगिक शोषण सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली’ – विद्या आपटे)