अत्याचार झालेल्या मुलांमध्ये आढळणारी लक्षणं आणि दीर्घकालीन परिणाम

पालक, शिक्षक, कार्यकर्ते, बालगृहातील कर्मचारी आणि मुलांच्या संदर्भातील इतरही महत्वाच्या व्यक्तींना मुलांवरील शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक अत्याचाराची लक्षणं ओळखता येणं, समजणे हे फार गरजेचं आणि महत्त्वाचं आहे.

वर्तणूक आणि भावनिक लक्षणं

  • स्वतःत हरवणं, एकटं एकटं राहाणं.
  •  नखं कुरतडणं.
  •  उदासीनता, चिंताग्रस्त होणं.
  •  अचानक वागणुकीत बदल होणे.
  •  अत्याचार करणारी व्यक्ती जवळपास नसतानाही तिला पाहिल्याचा भास होणं.
  •  काहीतरी वाईट घडणार आहे असे वाटून सतत धास्तावल्यासारखं असणं.
  •  स्वतःविषयी घृणा वाटणं.
  • आत्मविश्वास कमी होणं.
  •  सहज मैत्री करू न शकणं.
  •  मोठ्या माणसांविषयी अविश्वास.
  •  अचानक एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा जागा टाळणं, किंवा तिची अवास्तव भीती वाटणं.
  •  अभ्यासात मन न लागणं, अभ्यासातील प्रगती घसरणं.
  •  मन एकाग्र करता न येणं.
  •  झोपेत दचकून उठणं, ओरडणं, अत्याचाराबद्दल ची घाबरवणारी स्वप्न पडणं
  •  आक्रमक होणं
  •  भूक जाणं किंवा अति खाणं
  •  अचानक लैंगिक शब्दांचा, भाषेचा वापर करणं.
  •  इतर मुलांसोबत लैगिक व्यवहाराचा प्रयत्न करणं.
  •  पळून जाणं.
  •  आत्महत्येचा प्रयत्न करणं.
  •  व्यसनाधीन होणं.
  •  भावनाहीन होणं.
  •  अकाली हस्तमैथुन, मुखमैथुन, समलिंगी संभोग, अशा सवयी लागणं

शारीरिक लक्षणं

  • वारंवार लघवी होणं किंवा झोपेत बिछाना ओला करणं.
  • मुलींच्या बाबतीत योनिपटल फाटणं.
  • गळा, तोंड, गुदा, जननेंद्रियं या अवयवात जळजळ होणं, फोड येणं, सूज येणं
  • लैंगिक आजार (गुप्तरोग) होणं, एच्आयव्ही, संसर्गाची शक्यता.
  •  मुलींच्या बाबतीत अनपेक्षित गरोदरपण

दीर्घकालीन परिणाम

मुलावर लैगिंक अत्याचार होत राहिला, त्याला वेळेवर मदत मिळाली नाही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वावरचे परिणाम प्रौढपणीही दिसतात.

  • कोवळ्या वयात विश्वासाला तडा गेल्यामुळे मित्रमैत्रिणी, सहकारी किंवा इतर निकोप नातेसंबंध जोडण्यात, टिकविण्यात अडचणी.
  • आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार कामाच्या ठिकाणी किंवा इतरही क्षेत्रात प्रगती करू न शकणं.
  • वैवाहिक संबंधात जीवनात अडचणी.
  •  स्वतःच्या मुलांची अवास्तव काळजी घेणं, त्यांना सर्वांगिण विकासासाठी जरुरती मोकळीक न देणं.
  • मानसिक आजार. उदा. नैराश्य,
  • लैंगिक शोषण अनुभवलेले मूल प्रौढपणी इतर मुलांबरोबर तसे वागण्याची शक्यता असते.

त्यासाठी वेळेवर काळजी घेतली जाणं महत्त्वाचं. अत्याचार झालेल्या मुलाला वेळीच योग्य ती मदत मिळाली, तर दीर्घकालीन परिणाम टळू शकतात.

(संदर्भ – ‘मुलांचे लैंगिक शोषण सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली’ – विद्या आपटे)