सुशिक्षित व सुसंस्कृत समजल्या जाणा-या घरांमध्ये हिंसा होत नाही.

मला विचारा, मी मोठ्याच घरात कामाला जाते.

(कशा रांगोळ्या काढता घरंदाज व्यथांनो! – नेमाडे यांची एक कविता)

हिंसेची कारणं अनेक आहेत. तसेच हिंसेचे प्रकार ही निरनिराळे. केवळ मारहाण, जखम म्हणजेच हिंसा नसते. हिंसा जशी शारीरिक तशीच मानसिक, लैंगिक आणि आर्थिकही असते. हिंसेची मुळे खोलवर पसरलेली आहेत. दुस-यावर अधिकार गाजवणे, दहशत निर्माण करणे, स्वतःचा स्वार्थ जपणे, सत्ता प्रस्थापित करणे, दुस-यास नामोहरम करून स्वतःचे हित जपणे अशा अनेक कारणांसाठी हिंसा केली जाते. सुशिक्षित आणि सुसंस्कृत या शब्दाचे अर्थही नीट लक्षात घ्यायला हवेत. शिक्षित असणे आणि आर्थिक संपन्नता असण्याला सहसा आपल्याकडे वरील संकल्पना वापरल्या जातात, जे तद्दन चुकीचे आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचे झाले तर सोनोग्राफी चा वापर करून मुलींना जन्मालाच येऊ न देण्याचे कारस्थान आपल्या राज्यात याच समूहांनी केल्याचे दिसते. लाखो मुली गायब केल्या. ही एवढी मोठी हिंसा याच स्वतःला सुसंकृत म्हणवणाऱ्या उच्च जातीतील आणि वर्गातील कुटुंबांनी अशाच डॉक्टरांच्या संगनमताने केली. अशा घरांमध्ये आजही महिलांना हिंसेचा सामना प्रचंड प्रमाणात करावा लागतो. इज्जत आणि इभ्रतीच्या खोट्या कल्पनांमुळे अनेकदा बाया आपल्यावर होणाऱ्या हिंसेला कुटुंबाच्या बदनामीच्या भीतीने व्यक्तही करू शकत नाहीत.

कोणत्याही घरात हिंसा झाली तरी त्याविरुद्ध बोलणं गरजेचे आहे.