दत्तक कायदा

मूल दत्तक घेण्यासंबंधी ‘वैयक्तिक कायद्याप्रमाणे’ या कायद्यातही फरक आढळतो. कोणतेही मूल दत्तक घेताना कायदेशीर गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे आहे. कारण कायद्याने मूल दत्तक घेल्यानंतरच ते कायदेशीर वैध ठरते.
मुस्लिम व खिस्ती लोक मूल दत्तक घेऊ शकत नाहीत. ते फक्त मुलाचे पालक (जबाबदारी किंवा गार्डियनशिप) घेऊ शकतात. गार्डियनशिपसाठीचा वेगळा कायदा आहे.

महत्वाच्या तरतुदी

  • दत्तक घेण्याचे मूल व दत्तक घेणारे आई-बाबा दोघेही हिंदू असले पाहीजेत.
  • दत्तक मूल हे १५ वर्षांखालील आणि अविवाहित असणे गरजेचे आहे.
  • विधवा, घटस्फोटित किंवा अविवाहित महिलेला मूल दत्तक घेता येते.
  • महिला विवाहित असेल तर तिचा नवरा मूल दत्तक घेऊ शकतो. तिला दत्तक घेता येत नाही. मात्र पती मानसिक आजारी असेल, संन्यास घेतला असेल अगर हिंदू नसेल तर तिला मूल दत्तक घेता येते.
  • पुरूष मूल दत्तक घेवू शकतो. यासाठी तो २१ वर्षे पूर्ण, मानसिकदृष्ट्या सुदृढ म्हणजे मानसिक आजार नसावा, अविवाहित, विवाहित असेल तर पत्नीची संमती आवश्यक राहील. पतीने मूल दत्तक घेतल्यानंतर पत्नीला आपोआपच त्या दत्तक मुलाची आई म्हणून कायदा मान्यता देतो.
  • स्त्री आणि पुरुष दोघेही मुलगा किंवा मुलगी कोणालाही दत्तक घेवू शकतात. मात्र पुरुष मुलीला आणि स्त्री मुलाला दत्तक घेणार असेल तर त्यांच्या वयात वडील मुलगी आणि आई-मुलगा असे संबंध निर्माण होण्यासारखे अंतर असावे. हे अंतर किमान २१ वर्षे असणे गरजेचे आहे.
  • आई किंवा वडील किंवा दोघेही हयात नसतील किंवा त्यांनी सन्यास घेतला असेल, त्यांनी मूल बेवारस सोडून दिले असेल, न्यायालयाने ते पालक मानसिक दृष्ट्या सक्षम
    नाही असे जाहीर केले असेल तर अशा परिस्थितीमध्ये मूल ज्या गार्डीयन कडे असेल त्या गार्डीयनला न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने ते मूल दत्तक देण्याचा किंवा स्वतःकडे दत्तक घेण्याचा अधिकार प्राप्त होतो.
    आई किंवा वडील आपल्या मृत्यूपत्राद्वारे गार्डीयनची नियुक्ती करू शकतात किंवा न्यायालयही एखाद्या व्यक्ति किंवा संस्थेस मूलाचे गार्डीयन म्हणून नियुक्त करू शकते.
  • दत्तक मुलाची माता, पिता किंवा सांभाळणारे पालक (गार्डियन) यापैकी कुणीतरी एकजण हयात असणे आवश्यक आहे जेणेकरुन दत्तक देण्यासाठी संमती घेता येईल.
  • एक मूल एका वेळेस दोन किंवा अधिक व्यक्तींना दत्तक घेता येत नाही. म्हणजेच ज्यांनी मूल दत्तक घेतलेले मूल ते पालक दुस-यांना दत्तक देऊ शकत नाहीत.
  • मुलगा दत्तक घेत असताना त्या पालकांना स्वतःचा मुलगा, नातू किंवा पणतू असता कामा नये तसेच मुलगी दत्तक घेतली जात असताना पालकांना स्वतःची मुलगी, नात किंवा पणती असता कामा नये.
  • मूल दत्तक घेताना यापूर्वीच्या मुलांवर अन्याय होणार नाही हे पालकांनी पाहणे गरजेचेआहे. अन्यथा संबंधित पालकांना मूल दत्तक न देण्याचा निर्णय कोर्ट घेऊ शकते.
  • दत्तक दिल्या-घेतल्या तारखेपासून दत्तक मूल त्याच्या दत्तक कुटूंबाचे सदस्य बनते. ज्या पालकांनी त्याला जन्म दिला त्या पालकांशी व कुटूंबाशी त्याचा कायदेशीर संबंध संपतो. दत्तक मुलास दत्तक पालकांच्या सख्ख्या मुलाप्रमाणेच हक्क मिळतात.
  • दत्तक मुलाच्या विवाहावेळी सख्ख्या मुलाच्या विवाहाप्रमाणेच निषिद्ध नातेसंबंधांचे नियम लागू होतात. म्हणजेच जर सख्खा मुलगा कायद्याने आपल्या चुलत बहिणीशी विवाह करू शकत नसेल तर दत्तक मुलगाही दत्तक कुटूंबातील चुलत बहिणीशी विवाह करू शकत नाही.
  • दत्तक घेतले जाण्यापूर्वी जर मुलाला त्याच्या जन्म घेतलेल्या कुंटूंबातून काही संपत्ती मिळाली असेल व त्याबरोबरीने काही जबाबदा-या दिल्या असतील तर दत्तकत्वानंतर ती संपत्ती त्याच्याच मालकीची होते तसेच त्याबरोबरीने मिळालेल्या जबाबदा-याही त्याला निभावाव्या लागतात. उदा. जन्मदेत्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तिचा सांभाळ करणे इ.
  • दत्तक मूल घेतल्यानंतरही दत्तक पालकांचा त्यांच्या स्वतःच्या संपत्तीचा स्वतःच्या मर्जीनुसार उपभोग घेण्याचा किंवा तिची विल्हेवाट लावण्याचा हक्क कायम रहातो.
  • एखाद्या अविवाहीत, घटस्फोटीत किंवा विधूर पुरूषाने मूल दत्तक घेतल्यानंत पुर्विवाह केला तर त्याची पत्नी ही दत्तक मुलाची सावत्र आई मानली जाते.
  • एकदा केलेला दत्तककरार कोणत्याही परिस्थितीत रद्द करता येत नाही.

लक्षात ठेवा

  1. मूल दत्तक घेण्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीची आवश्यकता नाही. दत्तक मूल प्रत्यक्ष दत्तक पालकांच्या ताब्यात दिले जाणे मात्र अनिवार्य आहे.
  2. संस्थेच्या सहकार्याने मूल दत्तक घेताना त्यासंबंधीचे कागदपत्र ते पालक म्हणून बनवितात आणि त्यानंतर कोर्टामार्फत मूल दत्तक दिले जाते.