मुलांना हे माहित असू द्या

  1. शरीर – आपले शरीर हे आपल्या मालकीचे आहे त्याला इजा करण्याचा अधिकार कुणालाही नाही.
  2. कोण स्पर्श करु शकतं – लहान असताना अंघोळीसाठी कुणा मोठ्या माणसानं मदत करणं, किंवा आजारपणात डॉक्टरांनी केलेला स्पर्श चालू शकतो. एरवी आपल्या कपड्यानं झाकल्या जाणा-या अंगाला कोणी स्पर्श करू पाहील तर ते बरोबर नाही.
  3. तक्रार करायची – एखाद्याच्या स्पर्शाचा राग आला किंवा विचित्र वाटलं, तर लगेचच आपुलकीच्या, विश्वासातल्या माणसाला जाऊन सांगायचं.
  4. गुपित – कुणीही स्पर्शाचे नियम तोडून म्हणेल, ‘हे आपलं-तुपलं गुपित आहे. कुणाला सांगायचं नाही’, तरी सुध्दा विश्वासातल्या माणसाला नक्की सांगायचं.
  5. उशीर झाला तरी सांगायचं – हवी ती मदत मिळेपर्यंत सांगत राहायचं.
  6. नाही/नको – आपल्याला आवडणार नाही, भीती वाटेल असा कुणी स्पर्श केला, तर जोरात ओरडायचं ‘नाही’ नको!
  7. भेटवस्तू – कधी खाऊ/भेटवस्तू देऊन त्याबदल्यात काही लोकं आपल्याला त्रास होईल असं वागतात, बोलतात, स्पर्श करतात. त्यांचं मुळीच ऐकायचं नाही, की भेटवस्तू घ्यायची नाही.
  8. चूक आपली नाहीच – आपण काळजी घेऊनही काही घडलचं, तर यात आपली चूक नाही. स्पर्शाचे नियम तोडून कुणी इजा केली तरीही, नाही /नको म्हणू शकलो नाही तरीही, तिथून निघून जाणं जमलं नाहीं तरीही. जे घडलं ते आपल्याला हवं होतं असा अर्थ मुळीच होत नाही. पण नाही, नको म्हणता यायला हवं. त्याचा सराव करायला हवा.
  9. लक्षात ठेवायचं – आपण महत्त्वाचे आहोतच आणि आपण सुरक्षित असणं आणखी महत्त्वाचं आहे.
  10. समान हक्क – काही कमतरता किंवा अपंगत्व असलेल्या मुलालाही आपल्यासारखेच आनंद, सुख घेणं, माहिती, मनोरंजन, करमणूक इत्यादी सर्व हक्क असतात – हेही लक्षात ठेवायला हवं.

(संदर्भ – ‘मुलांचे लैंगिक शोषण सुरक्षितता त्यांची -जबाबदारी आपली’ – विद्या आपटे)