मीना आणि सुनीलची गोष्ट – नक्की काय चुकले?

मीना आणि सुनीलची गोष्ट – नक्की काय चुकले? (स्क्रिप्ट)

मीना आणि सुनीलला आपण भेटलो आहोतच. लग्न झाल्यावर त्यांचे पहिले काही दिवस सुखात गेले. आपल्याला अगदी योग्य जोडीदार मिळाला असे दोघांनाही वाटले. पण हळूहळू त्यांच्यामध्ये वाद, भांडणे, वाढू लागली. सुनीलला मीनाचे तिच्या शाळेतील मैत्रिणींना भेटणे आवडायचे नाही. एवढेच काय, तिच्या घरचे तिला भेटायला आलेले किंवा ती माहेरी गेलेली देखील आवडायचे नाही. “इतकं जाऊ वाटते त तिथंच राय!” त्याने तिला सुनावले. तिने साडीच नेसली पाहिजे, ती सात वाजायच्या आत घरी आली पाहिजे, कोणत्याही इतर पुरुषाशी – अगदी दुकानदार, भाजीवाला यांच्याशी देखील तिने अधिक बोललेले त्याला खपत नसे. सुनीलला मीना आवडतंच नव्हती असे नाही, तिच्याशी दोन चारशब्द प्रेमाचे बोलावे असे त्याला देखील वाटे. पण काहीकेल्या त्यांच्यात नीट, प्रेमाने संवादच होत नसे. सुरुवातीला सुनीलने बोलून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमेना म्हटल्यावर हळू हळू मग सुनील मीनाचा अपमान करायला लागला, शिवीगाळ करायला लागला आणि हल्ली तर हातही उगारायला लागला. कधी-कधी दारू पिऊन आल्यावर किंवा त्याच्या मनासारखे झाले नाही, तर सुनील मीनाला मारझोड करायचा. अनेकदा मीनाची इच्छा नसताना देखील तिच्यावर शरीरसंबंध लादायचा. एवढेच कशाला, मीना घरी विणकाम करून पैसे कमवायची, ते देखील सुनील तिच्याकडून काढून घ्यायचा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मीना देखील त्याला विरोध करत नव्हती, निमूटपणे ऐकून घेत होती, मार खात होती. एकदा मीनाने धीर करून तिच्या घरच्यांना सांगून पाहिले. घरच्यांनी मध्यस्ती केली. काही काळ बरा गेला. पुन्हा मारझोड सुरु झाली. ही भांडणे / मारझोड कशामुळे होत असतील?

सुनील मनाने वाईट होता का? नाही. मग नक्की काय चुकत होते? तो असा का वागायचा? हे समजून घेण्यासाठी, आपल्याला सुनीलच्या लहानपणापासून आतापर्यंतच्या आयुष्यात डोकावून पहावे लागेल. पहिली गोष्ट म्हणजे सुनीलवर त्याच्या वडिलांचा, काकांचा खूप प्रभाव होता. आपल्याला त्यांच्यासारखे व्हायचे आहे हे त्याने आधीच ठरवले होते. घरातील पुरुष सर्वात महत्त्वाचे असतात आणि ते सांगतील तसेच घडते हे त्याने लहानपणापासूनच पाहिले होते. वडील, काका किंवा त्याच्या आजूबाजूचे सगळे पुरुष त्यांच्या बायकांशी जसे वागायचे तेच योग्य वागणे आहे, नवरा म्हणून, पुरुष म्हणून आपण असेच वागले पाहिजे असे त्याला वाटे. बायको ने आपल्या मनासारखे केले नाही तर तिला त्याची शिक्षा दिली पाहिजे, तिच्या मनावर आणि शरीरावर नवऱ्या चा हक्क असतो असा त्याच्या समज झाला होता. म्हणूनच मीनाचे वागणे खटकले तर तिला मारण्यात, तिला शिवीगाळ करण्यात, तिचा अपमान करण्यात त्याला काहीच गैर वाटत नसे, चूक वाटत नसे.

सुनीलवर दुसरा प्रभाव होता तो त्याच्या मित्रांचा, मालिका, सिनेमा, ब्लू फिल्म्स या माध्यमांचा. त्यातून त्याच्या ‘खऱ्या पुरुषाच्या’ कल्पना आकाराला आल्या होत्या. खरे पुरुष हे बाईला काबूत ठेवणारे असतात, घरातील बाई जितकी आड पडद्यात राहील, तितकी घराण्याची अब्रू सुरक्षित राहील आणि तितकेच घरातले पुरुष जास्त भारी ठरतात असे त्याला वाटायचे. त्यामुळे मीनाला हर प्रकारे काबूत ठेवण्याचा तो प्रयत्न करे. याचाच परिणाम म्हणून मीनाने इतर कोणत्याच पुरुषाशी बोललेले त्याला चालायचे नाही. मीनाचे माहेरचे किंवा बचत गटातील बायका तिला काहीबाही शिकवतील म्हणून तिथे गेलेले आवडायचे नाही. मीना पैसे कमवायला लागली तर स्वतःच्या पायावर उभी राहील आणि मग सुनीलच्या काबूत राहणार नाही म्हणून त्याचा विणकामाला विरोध होता. तसेच तिच्या मर्जी विरुद्ध तिच्यावर शरीरसंबंध लादण्याने देखील आपण तिला काबूत ठेवले आहे असे त्याला वाटे.

सुनीलवर प्रभाव टाकणारी तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आईचे, आजीचे, काकूचे, आत्याचे, बहिणींचे वर्तन आणि त्यांचे घरातील स्थान. त्यावरून कोणत्याही बायका या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेत पुरुषांपेक्षा कमी असतात असे त्याचे ठाम मत झाले होते. म्हणजे एका अर्थी बाई ही व्यक्ती म्हणूनच पुरुषापेक्षा कमी असते असे त्याला वाटायचे आणि म्हणून कुठल्याही बाईला स्वतःच्या काही इच्छा, आकांक्षा, विचार असू शकतात असे त्याच्या मनात ही येत नसे. दारू पिण्याने आक्रमकता, संशयीवृत्ती वाढीस लागत असल्याने, त्याच्या दारू पिण्याने प्रश्न अधिकच गंभीर होत होता.

आता प्रश्न येतो की मीना हे सगळं सहन का करत होती? सुनीलवर जसा त्याच्या घरच्या वातावरणाचा परिणाम होता, तसाच मीनावर देखील तिच्या घरच्या वातावरणाचा प्रभाव होता. बायका या शक्तिहीन असतात, त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत, त्यांनी निमूटपणे सगळे सहन केलेच पाहिजे, त्यांच्या आयुष्यात भाऊ, वडील, नवरा किंवा मुलगा अशा कोणत्यातरी पुरुषाचा आधार लागतो. असा पुरुषाचा आधार नसलेल्या स्त्रीला समाजात काही किंमत नाही म्हणून पुरुषांची मर्जी सांभाळलीच पाहिजे हे तिच्या मनात खोलवर रुजले होते. सुरुवातीला तिने देखील सुनीलला तिची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या भावना, विचार तिला त्याच्यापर्यंत नीटसे पोहोचवता आले नाहीत. पुढे-पुढे मग सुनील कसाही वागला तरी मीना ते सहन करू लागली.

या नात्यातून मीना आणि सुनील दोघांनाही आनंद मिळणार आहे का? नक्कीच नाही. त्यांना आनंदी व्हायचे असेल, त्यांचे नाते सुधारायचे असेल तर दोघांमध्येही तीन प्रकारचे बदल घडणे आवश्यक आहे. ते कोणते ते पाहुया:

  • पहिल्या प्रकारचा बदल हा सर्वांत सोपा आहे. सुनीलने मीनाशी दोन शब्द प्रेमाने बोलणे, तिची विचारपूस करणे हा बदल करता येईल. सुनीलला खरं तर मीना आवडतच नाही असे नाही. तिच्याशी जमेल तेव्हा दोन चार शब्द प्रेमाचे बोलावेत असे त्याला मनापासून वाटते, पण कुठल्याच मुलीशी कसे वागावे हे न समजल्यामुळे, सुनीलला प्रयत्न करूनही ते जमत नाही. म्हणजे या बाबतीत कृती करणे मनातून पटते आहे, कृती करायची इच्छा आहे पण ती कृती करणे जमत नाही. हा प्रश्न सुनीलच्या कौशल्याचा आहे. त्याला मुलींशी, बायकांशी नीट वागायचे बोलायचे कौशल्य विकसित करायला हवे. म्हणून इथे आपण बदल घडविण्यासाठी कौशल्यात वाढ करायची गरज आहे असे म्हणू.
  • दुसरा बदल हा तुलनेने पहिल्यापेक्षा जास्त कठीण आहे. तो म्हणजे मुळातच एखादी कृती करावीशी वाटणे, तशी इच्छा असणे. मीना आजारी असताना तिला काम करायला त्रास होतो हे सुनीलला समजते आहे. तिला मदतीची गरज आहे, तिला मदत केली पाहिजे हे देखील समजते आहे. पण तो स्वतः घरकामात सहभागी झाला तर लोक त्याच्यावर हसतील अशी त्याला भीती वाटते. म्हणजे इथे कृती केली पाहिजे हे समजते, त्यासाठीची कौशल्ये देखील आहेत पण ती कृती स्वतः करण्याची त्याची इच्छा होत नाही. इथे इच्छा निर्माण करण्यावर काम करायची गरज आहे.
  • तिसरा बदल हा सर्वात कठीण आहे. मीनाला बरोबरीच्या नात्याने वागवणे – म्हणजे एखादा निर्णय घेताना सुनीलच्या मता इतकेच मीनाचे मत, तिच्या इच्छा, तिची सोय यांना महत्त्व असणे, दोघांनी घरातील कामांची जबाबदारी समसमान उचलणे, दोघांना पैसे खर्च करण्याचे समान स्वातंत्र्य असणे इत्यादी – हे मुळातंच सुनीलला पटत नाही. त्याचे कारण स्त्री आणि पुरुष समान नसतात हा समज त्याच्या मनात खोलवर रुजला आहे. जे समज एखाद्याच्या मनात खोलवर रुजलेले असतात, ज्या गोष्टींवर एखाद्याचा पक्का विश्वास असतो, त्यांना आपण त्या व्यक्तीची मूल्य किंवा तत्त्व असे म्हणू शकतो. स्त्री पुरुष समान नसतात, स्त्री कमकुवत असते हे सूनीलचे आणि काही प्रमाणात मीनाचे देखील मूल्य झाले आहे. त्यामुळे नात्यात समानता आणण्यासाठी इथे सुनील आणि मीनाच्या मूल्यांमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे आहे असे आपण म्हणू. खोलवर रुजलेल्या समजामध्ये (मूल्यांमध्ये) बदल घडवून आणणे सर्वात कठीण असते.

आता हे बदल कसे घडवून आणता येतील? नवरा बायको मधील आनंदी नाते निर्माण करण्याचे रहस्य काय? पाहुयात पुढील व्हिडिओंमध्ये.


वरील व्हिडीओ वर आधारीत काही प्रश्न खाली दिले आहेत. या व्हिडीओ मधील संदेश आपल्यापर्यंत पोहोचला आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या. प्रश्नावली साठी खाली क्लिक करा