मीना आणि सुनीलची गोष्ट : आनंदी नात्याची सुरुवात

मीना आणि सुनीलची गोष्ट : आनंदी नात्याची सुरुवात (स्क्रिप्ट)

मीना आणि सुनील त्यांच्या नात्यात सुखी, आनंदी नव्हते हे तर आपण जाणतोच. त्यांच्यात सारखे होणारे वाद, भांडणे, मारझोड यांमुळे दोघांनाही ताण जाणवायचा. आपले नाते अधिक आनंदी असते तर किती छान झाले असते असे दोघांनाही वाटे. पण ते कसे घडवून आणायचे याबद्दल दोघांनाही कल्पना नव्हती. खरंच.. काय लागते एखाद्या आनंदी नात्यासाठी?

कोणतेही आनंदी नाते ४ गोष्टींवर उभे असते –

१. एकमेकांची काळजीएकमेकांच्या आरोग्याची, आनंदाची, काय हवे नको त्याची काळजी घेणे

२. मनमोकळा संवादआपल्या मनातील इच्छा, आकांक्षा, स्वप्न एकमेकांना सांगणे, अडीअडचणी बद्दल, सुखाच्या प्रसंगांबद्दल एकमेकांशी मनमोकळा संवाद करणे

३. एकमेकांप्रती आदरएकमेकांशी समानतेने वागणे, घरातल्या निर्णयांमध्ये दोघांच्या मताला समान महत्त्व असणे 

४. जबाबदारीची समान विभागणी – घरातली आणि बाहेरची कामे करण्यात दोघांचा वाटा असणे

या चारही गोष्टी मीना आणि सुनीलच्या संसारात होत्या का? त्यांच्यामध्ये घडणारे संवाद थोडे तपासून पाहुयात

संवाद: 1 

सुनील, तू काल मीनाला मारलं का?

सुनील: मंग काय पूजा करू काय तिची? तिला बोललो होतो मी मैत्रिणीकडे जाऊन गप्पा करत बसायच्या नाहीत म्हनून. आता नवऱ्याचं ऐकलं नाई तर मारनारच की!

मीना: पन मले भेटावं वाटते ना मैत्रिणीले..

सुनील: मले आवडत नाई! संपला इशय

इथे आपल्याला काय दिसून येते?  मीनाला काय हवे आहे, तिला काय वाटते याविषयी सुनील जाणून घेतो आहे का? मीनाला मैत्रिणीला भेटल्यानंतर बरं वाटतं या भावनेचा सुनील आदर करतो आहे का? सुनील मीनाच्या मैत्रिणीला भेटण्याच्या इच्छेला मान्यता देत नाही, म्हणजेच मीना आणि सुनीलच्या नात्यात एकमेकांच्या इच्छांचा आदर नाही. मागील व्हिडीओ मध्ये पाहिल्या प्रमाणे स्रियांच्या / बायकोच्या इच्छा, आकांक्षा दुय्यम असतात ही समजूत (मूल्य) त्याच्या मनात खोलवर रुजून बसली आहे. हा प्रश्न सोडविणे थोडे कठीण आहे कारण मनात खोल रुतून बसलेल्या समजुती बदलायला वेळ लागतो पण ते अशक्य नाही.

या साठी दोघांमध्ये सतत संवाद होणे गरजेचे आहे. एकमेकांच्या इच्छा आणि गरजा जाणून घेतल्या, त्यांचा आदर राखला आणि त्या पूर्ण करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करता आले तर? तर दोघंही आनंदी होऊ शकतात. इथे मनाला हवं तसं, बेफिकीरीने वागणं, व्यसन करणं अपेक्षित नाही तर जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. अशाने सुसंवाद निर्माण होईल.

संवाद:

सुनील, तू मीनाच्या हातात खर्चायला पैसे देत नाहीस. तिला काही खर्च असू शकतात. असं कसं चालेल?

सुनील: या बायकांना पैसे दिले की डोक्यावर चढून बसत्यात. पन तिला काई हवं असलं तर म्या देतो ना आनून. मंग कशाला लागतेत पैसे?

हा प्रश्न आधीच्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे. मीनाने पैसे खर्च करण्याबद्दल सुनीलला आक्षेप नाही. सुनीलला मनातून हे पटते देखील आहे की मीनाला काही खर्च असू शकतात. त्यासाठी तिला हवे ते तो आणून द्यायला देखील तयार आहे. पण ते पैसे सरळ तिच्या हातावर ठेवणे त्याला नको वाटते आहे.

हा प्रश्न सोडविणे आधीच्या प्रश्नापेक्षा तुलनेने सोपे आहे कारण इथे सुनीलला मीनाच्या गरजा मान्य आहेत, तो त्या पूर्णही करतो आहे परंतू तिच्या हातात पैसे देण्यासाठी त्याचे मन तयार होत नाही. अशावेळी त्या दोघांनी घरात येणारा पैसा आणि खर्च याविषयी मोकळेपणाने बोलले पाहिजे. आणि मीनाने आपण पैसे कुठे खर्च करणार आहोत याची आधी कल्पना देणे, त्याचा हिशोब ठेवणे अशा जबाबदाऱ्या घेतल्या तर हळू-हळू सुनील मोकळेपणाने मीनाच्या हाती पैसे देऊ लागेल.

संवाद ३:

मीना: म्या दिसभर शेतात काम करते, घरात पन सैंपाक, भांडी, कपडे, झाडू पोछा समद करते. एवढी कामं करून दमायला न्हाई होत का मले?

सुनील: मंग म्या कुठं न्हाई म्हंतो

मीना: अन मंग तरीबी तुम्ही मले पानी भराले सांगता.. मले घरात जरा बी मदत न्हाई करत तुम्ही, निस्ते मित्रांसंगत बाहेर फिरता

सुनील: आता बाप्यामानसं कदी घरकाम करतेत का? म्या पानी भराय गेलो तर घरचे, शेजारचे, माये मित्र, समदे हसतील ना मायावर!

मीना खूप काम करून दमली तरी सुनील घरकामात सहभाग घेत नाही. यात आपल्याला दोन गोष्टींचा अभाव (कमतरता) दिसून येतो.  मीना आणि सुनीलच्या नात्यात एकमेकांची काळजी घेण्याची भावना नाही आणि घरातील जबाबदारीची सामान विभागणी व्हावी अशी देखील भावना नाही.  हा प्रश्न सोडविणे आधीच्या उदाहरणांपेक्षा सोपे आहे कारण घरकामात आपला सहभाग असावा हे सुनीलला मान्य आहे आणि तशी इच्छा पण आहे पण लोकांनी, घरच्यांनी त्याची टिंगल केली तर त्याला कसे सामोरे जावे हे सुनीलला कळत नाही.

या प्रसंगात मीनाने सुनीलची अडचण समजून घेण्याची गरज आहे. सुनीलचे घरात काम करणे हा लोकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये परंतू छोट्या छोट्या कामांमधून सहभागाची सुरुवात कशी करता येईल याविषयी दोघांनीही एकमेकांशी आणि घरातल्या व्यक्तींशी संवाद साधावा.

संवाद

मीना: हे मले काय बी सांगत न्हाई.. कुटं चाललो, कधी येनार, ने मला इचारीत बी नाई का तू कशी हाय.. दोन शब्द बोलले तर जीवाला बरं वाटते.

सुनील: काय बोलायचं काई कळत नाई…. म्हनजे आता दिसते ना समोर चांगली धड-धाकट हाय.. आता त्यात काय इचारनार मानूस?

या प्रसंगात हे दिसते की दोघांचे नाते अधिक चांगले कसे करता येईल, मनाने अधिक कसं जोडता येईल याचे कौशल्य दोघांनीही शिकण्याची आवश्यकता आहे. इथे सुनील जसे मिनाला काही सांगत नाही, तसेच मीनाला देखील स्वतःची अपेक्षा व्यक्त करणे सवयीचे नाही. त्यामुळे दोघांनीही स्वतःच्या अपेक्षा व्यक्त करणं, समोरच्याच्या अपेक्षा ऐकणं, समजून घेण्याचा प्रयत्न करणं, त्याला योग्य प्रतिसाद देणं असे छोटे छोटे बदल स्वतःमध्ये केल्यास त्या दोघांनाही संवाद कौशल्य आत्मसात करता येईल.

संवाद

मीना: माझे मम्मी पप्पा दोन दिस आले तर एवढं काय मोठं होऊ रायलं?

सुनील: तू का लहान बाळ हायस का तुले बागायले या लागते?

मीना: त्याईला काळजी हाय म्हाई

सुनील: अन म्या काय इथं खाऊन रायलो का तुले?.. उगी काईतरी भरोतीन तुह्या डोस्क्यात.. त्ये काई नगच आपल्याले

आता हाच वरील संवाद वेगळ्यापद्धतीने कसा होऊ शकेल ते पाहुयात.

सुनील: काय ग.. काय झालं? तुया चेहरा काऊन पडला हाय? बरं वाटत न्हाई का?

मीना: न्हाई.. हाय बरं

सुनील: अन मंग?

मीना: न्हाई.. म्हंजे मले ठाव हाय तुम्हाले मम्मी पप्पा आलेले आवडत न्हाई.. पन लै दिस झाले त्यांले भेटून

सुनील: हम्म.. फोन वर बोल की

मीना: तसं न्हाई.. भेटने अल्लग र्ह्याते

सुनील: ते हाय.. पन मले न्हाई पटत..

मीना: तुम्हाले काऊन न्हाई पटत सांगा तरी..

सुनील: त्या शेजारच्या सुमीचे मम्मी पप्पा न्हाई का आल्ते मागच्या येळी त्यांच्या घरी.. पोरीच्या डोस्क्यात काय टाकलं काय म्हाईत.. निघून गेली माहेरले.. गडी मानूस बसला डोकं धरून

मीना: आता बया.. मी का अशी निघून जाईन का तुम्हाले सोडून?

सुनील: काय सांगाव?

मीना: आहो न्हाई जानार.. तुम्हाला सोडून गेल्यावर मी अन मम्मी पापा का सुखात राहनार हाय?

सुनील: हम्म.. तुले लैच इच्छा हाय का भेटायची?

मीना: हाव

सुनील: ह्म्म.. बगू इचार करतो

इथे आपल्याला दिसते की मीना आणि सुनील एकमेकांच्या इच्छांचा आदर करून मार्ग शोधत आहेत. त्यांच्या मनातील भावना एकमेकांसमोर मोकळेपणाने बोलून दाखवत आहेत, एकमेकांचे मन राखायचा प्रयत्न करत आहेत. समोरच्या व्यक्तीला काय वाटते आहे, समोरील व्यक्ती दुखावली तर जात नाहीये ना याची काळजी घेत आहेत. समोरच्या व्यक्तीला कशाची चिंता वाटतीये हे समजून घेत आहेत.

मीना आणि सुनीलचे नाते बदलणे, अधिक चांगले होणे हे सोपे काम नक्कीच नाहीये. त्यासाठी आपण आधी पाहिल्याप्रमाणे दोन्ही बाजूने सारखे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांच्या मनातील खोलवर रुजलेल्या समजुतींचा त्यात अडथळा देखील निर्माण होऊ शकतो. बदल कदाचित खूप हळूहळू होतील, पण प्रयत्न केला तर बदल होतील एवढे निश्चित. काळजी, आदर, संवाद आणि जबाबदारीवर आधारलेले नाते निर्माण करायचा जर मीना आणि सुनील प्रयत्न करू शकले, तर ते नाते निरोगी, मैत्रीपूर्ण आणि दोघांसाठीही आनंददायी होऊ शकतं. अशा आनंददायी नात्याचे त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला काय फायदे होतील? तुम्हीच विचार करा.


वरील व्हिडीओ वर आधारीत काही प्रश्न खाली दिले आहेत. या व्हिडीओ मधील संदेश आपल्यापर्यंत पोहोचला आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या. प्रश्नावली साठी खाली क्लिक करा