सुनीलची गोष्ट – भाग २

सुनीलची गोष्ट – भाग २ (स्क्रिप्ट)

सुनीलच्या आयुष्यात आपण काही अंशी डोकावलो आहोत. पण सुनीलची जडणघडण पूर्णपणे समजून घ्यायला, त्याच्या जीवनातील स्त्रियांकडे देखील थोडे नीट, जवळून पाहिले पाहिजे. सुनीलच्या आयुष्यातली पहिली स्त्री म्हणजे त्याची आई. त्याची आई सकाळी उठून कामाला लागायची. केरवारे, मुलांचे आवरून, सकाळची न्याहारी स्वयंपाक संपवून, आई देखील वडिलांसोबत शेतात काम करायला जाई. पण तिने केलेल्या कामाला फारसे कोणी काम मानत नसत. शेतातले काम करून घरी येऊन परत संध्याकाळी चहा, स्वयंपाक करून, सगळं नीट आवरून, भांडी घासून, मुलांना झोपवून मग आई पाठ टेकवे. या उलट वडील उशिरा उठत, सकाळी आई त्यांच्या हातात चहा, न्याहारी, जेवण देत असे. शेतातून परतल्यावर देखील वडील बाहेरच्या खोलीत येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारत बसत. संध्याकाळी फिरायला जात ते रात्री जेवणाच्या वेळी परत येत. कधी कधी सुनीलला आईची कीव यायची. तिला मदत म्हणून तो एकदोनदा तिला भांडे आवरायला मदत करायला लागला तर आजी त्यावर व्हास्कन ओरडली. ‘घरात काम कराया तू काय मुलगी हायस व्हय?’

सुनीलच्या मोठ्या काकांची बायको म्हणजे त्याची काकू खरंतर घरातली मोठी सून. पण आजीच्या लेखी काकूला त्याच्या आईपेक्षा मान कमी. कारण मोठ्या काकूला तिन्ही मुलीच होत्या. घरात पूजा असली तरी ती करायला त्याचे आईबाबाच बसत, काका काकू नव्हे. आजीच्या सारख्या टोमण्यांना कंटाळून काकू एकदा आजीला जरा बोलली, तर काकाने केवढे मारले होते तिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिची बाजू न घेता, “आता सासूचा मान नाय राखला तर नवरा मारनारंच की” असं आई शेजारच्या बाईला सांगत असताना सुनीलने ऐकले होते.

सुनीलच्या आधी त्याच्या आईला एकदा गर्भ राहिल्याचे देखील त्याने उडत-उडत ऐकले होते. त्याने एकदा आईला त्याबद्दल विचारले असता आईला एकदम रडूच कोसळले. “नवऱ्याच्या इच्छेसमोर आपले काय चालते?” ऐवढेच म्हणाली आई.

काकूच्या तिन्ही मुली म्हणजे त्याच्या तिन्ही चुलत बहिणी त्याला खूप माया करत. सुनील चे देखील त्यांच्यावर प्रेम होते. त्याच्या चुलत बहिणी शाळा सांभाळून घरात, शेतात मदत करत. पण सुनील ने पाहिले होते की त्यांना खूप जड सामान उचलणे, मोठ्या ट्रक्टर ला धक्का मारणे जमत नसे. एकदा त्याची बहीण एक जड पोतं उचलून आत आणत होती आणि सुनील झोपाळ्यावर बसला होता. तेव्हा त्याचे बाबा त्याला ओरडले. ‘ती मुलगी असून पोतं उचलायली अन तू बाप्या असून तुला जमना का?’ एकूणच मुलींच्या अंगात ताकत नसते असे त्याला वाटले. घरात सामान आणणे वगैरे सगळे बाबा आणि काकाच करत. आईला फक्त कामापुरते पैसे बाबा देत. ते देखील त्यांना वाटले तर. अगदी बारीकसारीक खर्चासाठी देखील आईला बाबांची परवानगी लागे आणि पैशांसाठी मागणी करावी लागे. एकदा बाबांना काम होते म्हणून त्यांनी आईला काहीसे सामान आणायला सांगितले. आईने सामान आणता-आणता स्वतः साठी बांगड्या देखील आणल्या. झाले. घरी आल्यावर बाबा भडकले. “पैसे खर्च करण्याची अक्कलच नाही तुम्हा बायकांना” असे काहीसे म्हणाले होते. सुनीलच्या बहिणींना बाहेरच्या कामांमध्ये, घराबाहेरच्या व्यवहारांमध्ये, मोटार गाडी, यंत्र कशी चालतात यामध्ये काही गती नव्हती असे सुनीलला दिसू लागले. अशी काही कामं आली की त्याच्या बहिणी त्याला सांगत. एकूण काय, तर बायकांना मुळातच ताकत आणि अक्कल कमी असते असे सुनीलला पण हळू-हळू वाटू लागले आणि म्हणून त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक योग्यच आहे असे त्याचे मत झाले.

सुनीलच्या घरी जिला सर्वात कमी किंमत होती, ती म्हणजे त्याची विधवा आत्या. आत्याचे लग्न झाल्यावर वर्षभरातच तिचा नवरा अपघातात गेला. सासरच्यांनी पांढऱ्या पायाची म्हणून तिला परत माहेरी आणून सोडले. तेव्हापासून ती इकडेच होती. पण आत्याशी कोणीच धड वागायचे नाही, कोणीच तिची बाजू घ्यायचे नाही. तिने कितीही काम केले तरी त्याबद्दल कोणी तिचे कौतुक नाही करायचे.

सुनील नववी मध्ये असताना त्यांच्या वर्गात प्रिया नावाची एक नवीन मुलगी शिकायला आली. तिच्या वडिलांची शहरातून बदली झाली होती. शहरातून आल्यामुळे प्रिया मुलामुलींशी अत्यंत मोकळेपणाने बोलायची. इतर मुलींसारखी ती खाली मान घालून चालत नसे, एकटी कुठेही फिरायला घाबरत नसे, अभ्यासात देखील हुशार होती. बऱ्याच मुलांनी तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रिया ने काही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. यात सुनीलचा देखील समावेश होता. प्रिया आपल्या कडे लक्ष देत नाही हे कळल्यावर सुनीलचा अहंकार जागा झाला. त्याने प्रियाबद्दल काहीबाही पसरवायला सुरुवात केली. शाळेत, भिंतीवर तिच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी त्याने आणि त्याच्या मित्रांनी लिहिल्या. प्रियाची गावभर बदनामी झाली. तिच्याशी शाळेत कोणीच बोलेना. शेवटी प्रियाच्या वडिलांनी आपली बदली परत शहरात करून घेतली. या प्रसंगानंतर सुनीलला स्वतः बद्दल खूप भारी वाटले. “मी प्रियाला तिची जागा दाखवुन दिली आणि अद्दल घडावली” असे तो सगळ्या मित्रांना म्हणाला. पुढे- पुढे गावातील चौकात उभं राहून मुलींना टोमणे मारणे वगैरे देखील त्याने सुरू केले. एका मुलीच्या वडिलांनी सुनीलच्या घरी तक्रार केली असता त्याच्या वडिलांनी त्यांना उडवून लावले. “आहो मुलंच ती.. तरूनपणी असं व्हतंच.. तुमची मुलगी नीट रायली तर कोन कशाला काई बोलल?”

अशा या सुनीलचे आता मीनाशी लग्न ठरले. सुनीलला लग्न ठरल्याबद्दल जसा आनंद होता, तशी भीती देखील होती. खरं सांगाचं तर सुनील ला एखाद्या मुलीशी नीट, मनमोकळ्या गप्पा मारणे, मैत्री करणे कधी जमलेच नाही. त्यामुळे आता मीनाशी लग्न केल्यावर पुढील संसार कसा असेल याबाबत त्याला काळजी होती. कसा होता सुनील आणि मीनाचा संसार? पाहुयात पुढील व्हिडिओ मध्ये.


वरील व्हिडीओ वर आधारीत काही प्रश्न खाली दिले आहेत. या व्हिडीओ मधील संदेश आपल्यापर्यंत पोहोचला आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या. प्रश्नावली साठी खाली क्लिक करा