पोलिसांची मदत कशी घ्याल? पोलिस प्रथम खबर अहवाल म्हणजे काय?

  • प्रथम खबर अहवाल म्हणजेच F.I.R. हा अहवाल मणजे घडलेल्या गुन्हयाबद्दल पोलिसांना दिलेल्या तपशीलवार माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार असून याचा आधार घेऊन पोलीस तपासाला सुरुवात करतात. जी व्यक्ती गुन्ह्याची माहिती सर्व प्रथम पोलिसांना देते तिचे नाव व सहीने प्रथम खबर अहवाल दाखल होतो. त्याची प्रत त्या व्यक्तीला देणे बंधनकारक आहे.
  • प्रथम खबर अहवाल अत्याचाराला सामो-या गेलेल्या व्यक्तीने स्वतः नोंदवावा असे नाही. अत्याचाराला सामो-या गेलेल्या व्यक्तीच्या वतीने सदर व्यक्तीचे पालक, नातेवाईक व मित्र-मैत्रीण ही प्रथम खबर अहवाल साक्षीदार म्हणून नोंदवू शकतात.
  • फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १५४ नुसार पोलिसांना मौखिक किंवा लिखित स्वरूपात दिलेली दखलपात्र गुन्हयाशी संबंधित माहिती प्रथम खबर अहवालात रूपांतर केली जाऊ शकते.
  • पोलिसांना गुन्हयाची माहिती तोंडी किंवा लिखित स्वरूपात देता येते. जेव्हा माहिती तोंडी दिली जाते तेव्हा ती माहिती लिहून त्याचे तक्रारीत रूपांतरीत करणे ही पोलिसांची जबाबदारी असते. गुन्ह्याची माहिती देणा-या व्यक्तीचा जबाब तिच्याच शब्दात लिहिणे आवश्यक आहे. तकार व जबाब लिहून झाल्यावर माहिती देणा-या व्यक्तीस जी भाषा कळते त्या भाषेत समजावून सांगून त्यावर सही घेणे आवश्यक आहे. (फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५४ (१))
  • प्रथम खबर अहवालाची प्रत मिळणे हा गुन्हयाची माहिती देणा-या व्यक्तीचा अधिकार असतो. (फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५४ (२))
  • लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात प्रथम खबर अहवाल वरीष्ठ पोलिस निरिक्षक किंवा वरीष्ठ अधिकारी यांच्याकडून नोंदविला जावा.
  • अत्याचारपीडित व्यक्ती स्त्री असेल व जर तीच गुन्हयाची माहिती देत असेल तर प्रथम खबर अहवाल महिला पोलिस अधिकारी किंवा कुठल्याही महिला अधिकारी यांच्याकडून नोंदविला जावा. (फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५४) महिला पोलिस अधिकारी उपलब्ध नसल्यास पुरूष पोलिस अधिकारी यांनी महिला हवालदाराच्या उपस्थितीत प्रथम खबर अहवाल नों दवणे आवश्यक आहे.
  • पोलिसांनी प्रथम खबर अहवाल नोंदवण्यास नकार दिल्यास अत्याचार झालेल्या व्यक्तीला मॅजिस्ट्रेट कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. यानंतर कोर्टाकडून पोलिसांना प्रथम खबर अहवाल नोंदवण्याचा आदेश दिला जातो. (फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३))
  • प्रथम खबर अहवाल कुठल्याही पोलिस ठाण्यात नोंदवता येऊ शकतो. जेथे गुन्हा घडला तेथेच प्रथम खबर अहवाल नोंदवला जावा असे बंधनकारक नाही. ज्या पोलिस ठाण्यात प्रथम खबर अहवाल नोंदवला गेला असेल त्या पोलिस ठाण्याने जेथे गुन्हा घडला त्या संबंधित पोलिस ठाण्याकडे प्रथम खबर अहवाल पोहचवणे ही त्यांची जबाबदारी आहे, ह्याला झीरो एफ. आय. आर (Zero FIR) असे म्हणतात. (मुंबई पोलिस कायदे पुस्तक भाग ३ कायदा के.११९ अ)
  • एकदा पोलिसांना घडलेल्या बलात्काराच्या गुन्हयाची माहिती दिल्यावर पीडितव्यक्तीला योग्य वाटेल अशा ठिकाणी तिचा जबाब नोंदविणे पोलिसांची जबाबदारी आहे. सदर ठिकाण म्हणजे पीडितव्यक्तीचे घर, हॉस्पिटल किंवा इतर कुठलीही जागा असू शकते.
  • पिडित व्यक्ती जबाब देत असताना त्या व्यक्तीची इच्छा असल्यास सोबत कुणी उपस्थित राहू शकते. जसे पालक, मैत्रिण. पिडित व्यक्ती जवाब देत असताना एखादी व्यक्ती किंवा कुणीही नको असेल तर पीडितव्यक्ती तसेही सांगू शकते. (फौजदारी  प्रक्रिया संहिता कलम १५७ मधील दुरूस्तीनुसार)
  • प्रथम खबर अहवाल नोंदवल्यानंतर गुन्हयाशी संबंधित साक्षीपुराव्यासाठी लोकांचे जबाब घेतले जातात.
  • पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर ते कोर्टात आरोपपत्र / चार्जशीट दाखल करतात. प्रथम खबर अहवाल हा त्याचाच एक भाग असतो.

संदर्भ – लैंगिक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती : मार्गदर्शक सूचना सेहत, मुंबई