कौटुंबिक हिंसेबाबत आपल्याला माहित आहे का?

आपल्या समाजात आणि स्वतःच्या कुटुंबातच स्त्रियांवर हिंसा होताना आपण बघतो, ऐकतो आणि अनुभवतोही. या हिंसेची सुरुवातच स्त्रीच्या जन्मापासूनच होतांना दिसते. यामध्ये बऱ्याच स्त्रिया जीवे मारल्या जातात. किंवा शारीरिक व मानसिकरित्या अपंग होतात. याबद्दलची आकडेवारी बघितल्यावरच आपल्या हिंसेची भयानकता लक्षात येईल.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये स्त्रियां विरोधी हिंसेचे प्रमाण १७.४% नी वाढले आहे. २०१९ मध्ये महाराष्टात स्त्रीयांविरोधी हिंसेच्या ३७,५६७ गुन्ह्यांची नोंद झाली ज्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, विनयभंग व बलात्कार इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे.

एनएफएचएस ५ (२०१९-२०) सर्वेक्षणातून असे दिसून येते की महाराष्ट्रात २५.२% विवाहित स्त्रिया जोडीदाराकडून हिंसा होत असल्याचे सांगतात त्याचे प्रमाण अधिक आहे आणि ३.३% स्त्रिया गर्भारपणात हिंसेला तोंड देतात.

  • महाराष्ट्रात ५४.६% स्त्रिया हिंसेचा अनुभव घेतात असे दिसून आले आहे. (एन.सी.आर.बी. २०१६)
  • एनएफएचएस ४ सर्वेक्षणातून २०१५-२०१६ असे दिसून येते की ३१% विवाहित स्त्रिया जोडीदाराकडून हिंसा होत असल्याचे सांगतात त्याचे प्रमाण अधिक आहे. त्यापैकी एक चतुथाश स्त्रियांना शारीरिक दुखापती झाल्याचे सांगतात. ७.९% स्त्रिया गर्भारपणात हिंसेला तोंड देतात.
  • भारतातील वेगवेगळ्या शहरात घेतलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की निम्म्या स्त्रियांना (४५.३%) हिंसेत झालेल्या दुखापतीमुळे उपचार घेण्याची गरज असते. (आयएनसीएलएनINCLEN, २०००)
  • ९४% स्त्रियांना माहितीतल्या अथवा जवळच्या नात्यातील व्यक्तीकडून हिंसा सहन करावी लागते. (एनसीआरबी)
  • २०१९ मध्ये गरोदर स्त्रियांवर बलात्कार झाल्याची ३५ प्रकरणं निदर्शनास आली.
  • भारतात दर ४ पैकी १ मुलगी बालविवाहाचा बळी ठरते. महाराष्ट्रात आजही बालविवाहाची आकडेवारी २१.९% इतकी आहे.
  • मागच्या एक ते दीड दशकात स्त्रियांवरील हिंसेच्या घटनांत तब्बल ८०% नी वाढ. परिणामी कोट्यावधी (अंदाजे २ करोड) स्त्रिया श्रमशक्तीमधून बाहेर पडताना दिसून आल्या.
  • जागतिक पातळीवरील अभ्यासातही प्रत्येकी तीन स्त्रियांपैकी एक स्त्री तिच्या जोडीदाराकडून शारीरिक, लैंगिक हिंसा अनुभवताना दिसून येतात. (जागतिक आरोग्य संघटना अहवाल)

कौटुंबिक हिंसा म्हणजे काय?

कौटुंबिक हिंसा म्हणजे पीडित व्यक्तीशी सबंधित – रक्ताच्या, कायदेशीर दत्तकत्व, विवाह यासारख्या नात्यामध्ये असलेल्या – पती, सासू-सासरे, आई-वडील, मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ इत्यादी कोणीही त्या स्त्रीवर केलेले हिंसक कृत्य. ही हिंसा शारीरिक, लैंगिक, भावनिक आणि आर्थिक अशा कोणत्याही प्रकारची असू शकते.
(प्रशिक्षण पुस्तक – प्रवास सक्षमतेकडे – स्त्री अभ्यास केंद्र आय.एल.एस. कॉलेज, पुणे)

कौटुंबिक हिंसा – कोणावर, का आणि कुठे होते?

  •  प्रामुख्याने स्त्रिया आणि मुलांना गंभीर स्वरूपाच्या कौटुंबिक हिंसेचा सामना करावा लागतो.
  • व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अधिकार गाजविण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो.
  • ही हिंसा गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, सर्व जाती-धर्म व सर्व वयोगटातील व्यक्तीच्या बाबतीत घडू शकते.
  • कौटुंबिक हिंसा घरातील चार भिंतीत किंवा घराबाहेर सुद्धा होते. ती शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक, सामाजिक इ. स्वरुपात होते.