इंटरनेट, सामाजिक माध्यमे आणि स्त्रियांवरील हिंसा

“मुलीने नकार दिला अन ‘इगो हर्ट’ होऊन त्या मुलाने तिचा फोटो ती ‘कॉल गर्ल’ वाटेल असा क्रॉप करून तो फोटो आणि तिचा फोन नंबर व्हायरल केला.” 

“ब्रेक अप झाल्यानंतर बदला घायच्या उद्देशाने बॉयफ्रेंडने खाजगीमध्ये शूट केलेले फोटोज, व्हिडिओज व्हायरल केले.”

“एका घरकामगार महिलेच्या मोबाईलमध्ये तिच्या नवऱ्याला लैंगिक संबंधांची व्हिडिओ क्लीप मिळाली. त्यात संबंध ठेवणाऱ्या दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. पण ही तिचीच क्लीप आहे, असा नवऱ्याला संशय आला. त्यामुळे तो तिला मारहाण करतो आणि ती ज्या-ज्या  घरात घरकाम करते त्या घरातील आणि व्हिडिओ क्लीप मधील बॅकग्राउंड तपासून बघतो.”

“माझ्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध आहेत, असा मला संशय आला. मी इंटरनेटवर एका ठिकाणी वाचलं होतं, की मुलीची योनी/व्हजायना बघून तिचे लैंगिक संबंध आले आहेत की नाही, ते समजते. म्हणून मी तिला योनीचे फोटो व्हाट्सअप वर पाठवायला सांगितले.” कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा मुलगा.

“मी एकदा यूट्यूबवर एका अभिनेत्रीनं नावाजलेल्या ‘हिरो’वर लैंगिक छळाचे आरोप केल्यासंबंधी बातमी आणि त्या खालील कमेंट्स वाचत होते. कुणी तिला रांड म्हणत होतं. तर कुणी अमक्या तमक्या  हिरोसोबत नागडी होऊन नाचताना तुला लाज नाही वाटली आणि आमच्या ‘हिरो’वर असे आरोप करतेस, वगैरे- वगैरे… अतिशय अश्लील कमेंट्स केल्या होत्या त्या पोस्टवर.”

“आजकाल फेसबुकवर कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीवर कोणतेही वक्तव्य केलं, की लगेच ट्रोलिंग सुरु होतं. काहीजण तर कसल्याही घाणेरड्या कमेंट्स करतात.” एक पत्रकार मैत्रिण. 

वर दिलेल्या प्रसंगांशी अनेक मिळते-जुळते प्रसंग आपल्याला ऐकायला, अनुभवायला मिळत असतील. तंत्रज्ञान, इंटरनेट आणि फेसबुक, व्हॉटसअप, ट्वीटर, इंस्टाग्राम यांसारख्या सामाजिक माध्यमांमुळे माहितीचे जग सर्वांसाठी खुले झाले. फेसबुकच्या माध्यमातून जुन्या मित्र- मैत्रिणी, समान विचार आणि आवडी असणारे लोक भेटू लागले. लोकांना एकमेकांशी कनेक्टेड राहण्यासाठी एक मार्ग मिळाला. शिवाय प्रेम करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला. बदलती कुटुंबपद्धती आणि जीवनशैली यामुळे दिवसेंदिवस एकटे पडणाऱ्या माणसांसाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला. एकमेकांशी कनेक्टेड राहण्याची गरज पूर्ण झाली. स्वतःची ओळख उघड न करता किंवा गोपनीयता राखून व्यक्त होण्यासाठी या माध्यमांची मदत झाली. स्त्रियांना या माध्यमांचा वापर करून व्यक्त होण्यासाठी अवकाश उपलब्ध झाले. अनेक स्त्रिया आपल्या अडचणी, सुख- दु:ख या माध्यमांचा वापर करून व्यक्त होताना दिसतात.

पण त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान आणि माध्यमांचा वापर करून स्त्रियांवरील हिंसेचे प्रमाण देखील वाढले. इंटरनेटच्या माध्यमातून महिलांना आणि तथाकथित ‘नॉर्मल’ या कॅटेगरीत न बसणाऱ्या लैंगिक अल्पसंख्यांना व्यक्त होण्यास प्लॅटफॉर्म मिळाला. मात्र याच माध्यमांतून कळत-नकळत स्त्रिया आणि अल्पसंख्यांकांचा आवाज दाबला जात असल्याचे, तसेच त्यांना असुरक्षित वाटावे अशाप्रकारे त्यांना वागणूक मिळत असल्याचे दिसून येते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्त्रियांवरील वाढता हिंसाचार पाहता इच्छा, संमती, स्वातंत्र्य, उल्लंघन, जबादारी याविषयीचे अनेक मुद्दे उपस्थित होताना दिसतात. म्हणूनच याविषयी अधिक जाणून घेणे, चर्चा घडवून आणणे अतिशय महत्वाचे आहे.

तंत्रज्ञान, इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांचा वापर करून स्त्रियांसोबत खालील प्रकारची हिंसा होताना दिसते.

अश्लील मेसेजेस पाठविणे

अश्लील मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओ पाठविणे. बलात्काराच्या व्हिडिओ मोबाईलवर पाठविणे. महिलांना जबरदस्तीने पोर्न बघायला लावणे आणि त्यात दाखविल्याप्रमाणेच लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडणे.

फोनवरील अश्लील संभाषण रेकॉर्ड आणि व्हायरल करणे असे प्रकार देखील होताना दिसतात.

आपण जवळचे मित्र-मैत्रिणी आहोत, त्यामुळे आपण ‘त्या’ विषयावर बोलू शकतो. अशी भावनिक जबरदस्ती केली जाते. मग एकमेकांच्या खाजगी अवयवांबद्दल बोलले जाते, अश्लील संभाषण केले जाते. फोनवर होणारे हे सर्व संभाषण रेकॉर्ड केले जाते आणि त्यानंतर हे लोक सुरु करतात त्यांचे असली रंग दाखवायला. हे संभाषण मित्रांना पाठवतात, जिच्यासोबत संभाषण झाले आहे ‘ती’ कॉल गर्ल असल्याचे भासवले जाते आणि सर्वजण मिळून तिचा छळ सुरु करतात. त्यामुळे अशी संभाषणे टाळा.

खाजगी माहितीचा वापर करून हिंसा 

एखाद्या स्त्रीचा छळ करण्यासाठी किंवा तिला अडचणीत आणण्यासाठी वैयक्तिक माहितीचा वापर केला जातो. यात संबंधित व्यक्तीची संमती न घेता तिचा इमेल किंवा सोशल मिडियाचा अकाउंट हॅक करून तिची खाजगी माहिती मिळविणे. सोशल मिडिया वरील अपडेट्सवर लक्ष ठेऊन तिच्या वागण्यावर लक्ष ठेवणे, नियंत्रण ठेवणे किंवा तिचा पाठलाग करणे. काहीवेळा ही खाजगी माहिती इतरांसोबत शेअर केली जाते आणि त्यांच्याकडून हिंसा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

यात जवळच्या नात्यामध्ये होणाऱ्या हिंसेचा देखील समावेश होतो. नात्यात असताना अनेकदा मुलं-मुली त्यांचे खाजगी क्षण शूट करतात आणि नंतर त्याचा गैरवापर करून जोडीदाराला त्रास दिला जातो. यामध्ये मग लैंगिक संबंधांची मागणी करणे, बदनामी करणे, पैशाची मागणी करणे याचा समावेश होतो.

 ऑनलाईन बदनामी 

समोरच्या व्यक्तीची संमती नसताना किंवा त्या व्यक्तीच्या नकळत एकांतातील खाजगी क्षणांचे शुटींग करणे आणि ते फेसबुक, व्हाट्स अॅप, यूट्यूबच्या माध्यमातून व्हायरल करणे. तिचे समाजातील स्थान कमी करण्याच्या दृष्टीने फेक प्रोफाईल तयार करणे.

डेटिंग/मॅट्रिमोनियल साईट्स व आर्थिक हिंसा

डेटिंग, मॅट्रिमोनियल साईट्सच्या माध्यमातून खोटे प्रोफाईल बनवून मैत्री केली जाते, प्रेमाचे नाटक केले जाते किंवा लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्यानंतर स्त्रियांच्या नकळत काही खाजगी माहिती रेकॉर्ड, शूट केली जाते आणि त्या माहितीचा वापर करून पैशांची मागणी केली जाते. लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. शक्यतो पैसे तिऱ्हाईत व्यक्तीच्या बँक अकौंटवर घेतले जातात आणि नंतर फसविणाऱ्या व्यक्ती गायब होतात.

वेगवेगळ्या मॉलमध्ये ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली माहिती घेऊन त्याचा गैरवापर

वेगवेगळे मॉलमध्ये किंवा एखादा मोठ्या दुकानाच्या समोर ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली, वेगवेगळी बक्षिसे, सूट देण्याचे अमिष दाखवून लकी ड्रॉ ची कूपन्स भरून घेतली जातात. त्यात मोबाईल नंबर, इमेल, आधार कार्ड, पॅन नंबर, अकाउंट नंबर ही माहिती घेतली जाते. त्याचा वापर करून विशेषतः स्त्रियांना टार्गेट करून त्यांची फसवणूक केली जाते.

सोशल मिडियावर ट्रोलिंग     

एखाद्या व्यक्तीने सोशल मिडीयावर राजकीय किंवा सामाजिक स्थितीवर आपले मत व्यक्त केले तर त्याविरुद्ध मत असणारे लोक ट्रोलिंग करतात. यात अनेकदा स्त्रियांना टार्गेट केले जाते. त्यांना भावनिक आणि मानसिक त्रास होईल असे मेसेजेस पाठविले जातात. शिवाय लैंगिक छळ देखील केला जातो.

ऑनलाईन हिंसा टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?

१. खाजगी माहिती ही खाजागीच ठेवा

युजरनेम, पासवर्ड, इमेल, मोबाईल नंबर, अकौंट नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखी कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नका. अनोळखी व्यक्ती किंवा फोन यांना कोणतीही माहिती देऊ नका. जर कुणी ओळखीची व्यक्ती अशा प्रकारच्या माहितीची मागणी करत असेल तरीदेखील त्याची शहानिशा करा.

२. से नो टू शूट

आपल्या वैयक्तिक, नाजूक, खाजगी क्षणांचा गैरवापर होऊ नये, म्हणून असे शुटींग करणे शक्यतो टाळा. मग ते क्षण बॉयफ्रेंड सोबतचे असोत, नवऱ्यासोबतचे किंवा आणखी कोणसोबतचे. कारण जोडीदाराने त्या शुटींगचा गैरवापर केला नाही तर इतर कोणीही त्याचा गैरवापर करू शकतं. याविषयी ‘डोंट शूट’

http://letstalksexuality.com/?s=+%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F++%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%9Fएक अतिशय माहितीपूर्ण लेख दिला होता तो नक्की वाचा.

३. मोबाईल, इमेलवर खाजगी माहिती ठेवताना सावधानता बाळगा.

आजकाल आपण अनेक अॅप डाऊनलोड करताना, वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करताना न वाचता टर्म्स आणि कंडीशन्स स्वीकारतो आणि आपल्या कळत- नकळत बऱ्याचदा आपल्या अनेक खाजगी  गोष्टी, मोबाईल, फोटोज, फोन नंबर व इतर माहिती बघण्याची, वापरण्याची परवानगी देतो. त्यामुळे आपल्या मोबाईलमधील फोटो फोन नंबर त्यांच्याकडून आपल्या नकळत घेतले जातात. सोबतच इंटरनेट बँकिंगचे युजरनेम पासवर्ड, ए.टी.एम पिन अशा प्रकारची  माहिती ठेवताना सावधानता बाळगावी. अशी माहिती स्वतंत्र डायरीमध्ये जतन करून ठेवता येईल किंवा माहिती फक्त आपल्याला समजेल असे विशिष्ट कोड वापरून जतन करून ठेवता येईल.

४. सोशल मिडिया, डेटिंग आणि मॅट्रिमोनियल साईट्स वापरताना घ्यावयाची सावधानता.

या माध्यमांचा वापर करून अनोळखी व्यक्तींशी नाते जोडत असाल, तर त्या व्यक्तीला भेटून आणि इतर मार्गांनी शहानिशा करावी. ताबडतोब विश्वास ठेवून आपली खाजगी माहिती देऊ नये. अशा साईट्सवर अकौंट काढताना शक्यतो स्वतंत्र इमेल वापरावा. जेणेकरून आपल्या इमेल अकौंट हॅक करून त्यावरील आपल्या खाजगी माहितीचा गैरवापर केला जाणार नाही. या साईटवर असणाऱ्या प्रायवसी सेटिंग या पर्यायाचा वापर करावा. डेटिंग साईटच्या माध्यमातून व्यक्तींना भेटताना सुरक्षित ठिकाणी भेटा. निर्जनस्थळी, हॉटेल्समध्ये भेटत असाल तर सावध असा.

आपले वैयक्तिक ‘अपडेट्स किंवा स्टेट्स’ शेअर करताना सावधानता बाळगा. उदा. आय अॅम अलोन अॅट होम किंवा यांसारखी माहिती जर दिली, तर त्याचा वापर करून पाठलाग करणे, अडचणी निर्माण करणे अशा गोष्टी घडू शकता. त्यामुळे उत्साहाच्या भरात आपल्या विषयी अपडेट्स किंवा स्टेट्स टाकण्याचा मोह टाळावा. स्त्री- पुरुष दोघांनीही आपले किंवा आपल्या मित्र-मैत्रिणीचे खाजगी फोटो सोशल मिडीयावर टाकताना सावधता बाळगा. शक्यतो खाजगी माहिती, नाजूक क्षण सोशल मिडीयावर टाकणे टाळावे.

५. इंटरनेटवरील माहितीची खातरजमा करा

इंटरनेट हे महितीचे जाळे आहे पण त्यावरील सर्वच माहिती खरी असेलच असे नाही

त्यामुळे त्या माहितीचा वैयक्तिक आयुष्यात वापर करत असताना त्या माहितीची सत्यता पडताळा.

६. मदत मागा, तक्रार करा

तुमच्यासोबत अशाप्रकारे हिंसा होत असेल, झाली असेल तर स्वतःलाच दोष देत न बसता, मदत मागा, विश्वासू व्यक्तीशी बोला, पोलीस आणि कायदे यंत्रणेची मदत घ्या.

. जनजागृती करा

तुमचा मित्र किंवा मैत्रीण अशा परिस्थितीत अडकत आहे असे वाटल्यास, त्या व्यक्तीची मदत करा, त्या व्यक्तीला सावध करा. याविषयी अधिक अधिक लोकांशी संवाद साधा, चर्चा करा. यांवर होणारी हिंसा मग ती ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन त्यामागे स्त्रीला दुय्यम लेखण्याची मानसिकता कारणीभूत आहे त्यामुळे ही मानसिकता कमी व्हावी यासाठी प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे.

आपल्या समाजात स्त्रियांवरील हिंसा या प्रश्नाकडे बघताना अनेकदा गुन्हेगार बाजूला राहतात आणि हिंसाग्रस्त स्त्रीलाच जबाबदार धरले जाते. शिवाय स्त्रीवरच तिच्या संरक्षणाची जबाबदारी टाकली जाते. खरंतर स्त्रीवादी भूमिकेतून पाहायला गेलं, तर स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर टाकणे, यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली गेली आहे. म्हणूनच स्त्रियांवरील हिंसा कमी व्हावी यासाठी फक्त स्त्रियांनी काळजी न घेता, समाज, शासन, पोलीस आणि कायदेशीर यंत्रणा या सगळ्यांनीच जबाबदारी घेणे गरजेचे आहे. तरीदेखील सध्याची सायबर गुन्हे, ऑनलाईन हिंसा यांसंबधी कायदे, त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती तसेच यंत्रणांमधील संवेदनशीलता लक्षात घेता स्त्रियांनी ऑनलाईन हिंसा होऊ नये म्हणून सावधानता बाळगायला हवी.

लेखन – गौरी सुनंदा