बाल लैंगिक अत्याचाराची तक्रार केली तर त्याचा मुलांच्या भविष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

तक्रार नाही केली तर त्या घटनेचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात याचा विचार करा.

वास्तविक बाल लैंगिक अत्याचार कधीही, कुठेही झाला तर त्याची लगेच दखल घेऊन त्याची तक्रार करायला हवी. लैंगिक आत्याचारविरुद्ध मुलांचे संरक्षण करणारा ‘पॉकसो कायदा’ (द प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) हा अत्याचाऱ्याला जबरदस्त शासन करणारा कायदा आहे. या अंतर्गत पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांना 24तासाच्या आत याबाबत ‘बाल कल्याण समिती’ला कळवावे लागते. समितीकडे प्रकरण आल्यानंतर समिती एका संवेदनशील आणि जबाबदार माणसाची नेमणूक करते, जो मुलाची मानसिक अवस्था लक्षात घेऊन अतिशय हळुवारपणे मुलाकडून घडलेल्या प्रकाराची आवश्यक ती माहिती काढतो आणि समिती व पोलिसांना यातील सत्य सांगतो.
ही सर्व प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे आणि संबंधितांचे खाजगीपण जपून केली जाते. पीडितांबद्दलची कोणतीही माहिती समाजात उघड होत नाही त्यामुळे मुलांच्या भविष्यावर याचा नकारात्मक प्रभाव पडण्याचं खरं तर काही कारण नाही.
परंतु, आपल्या समाजात लैंगिक कृती व लैंगिकता या विषयाबद्दल उघडपणे न बोलण्याची मानसिकता, याबद्दल असलेल्या भ्रामक समजुती, अज्ञान, अशास्त्रीय धारणा, पवित्रता व शुचितेशी जोडल्या गेलेल्या कल्पना या सगळ्यामुळे आपल्या मुलांबाबत घडलेला प्रकार उघड झाला तर समाज आपल्याला वाळीत टाकेल, मुलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कलंकित असेल व पुढच्या आयुष्यात त्याला सर्वसामान्यपणे जगू दिले जाणार नाही हा भयगंड लोकांच्या मनात निर्माण झालेला असतो. यामुळेच याबाबतच्या तक्रारी होत नाहीत, अपराध्याला शासन होत नाही आणि अधिकाधिक मुले अशा अत्याचारांना बळी पडतात.
· एका ताज्या सरकारी आकडेवारीनुसार भारतात दर १५ मिनिटाला एका बालकाला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार बालकांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वरचे वर वाढ होतानाच दिसते आहे.

· भारताच्या गृह मंत्र्यांच्या हस्ते नुकताच दिल्लीत ‘२०१६ मधील भारतातील गुन्हे’ हा जो अहवाल प्रकाशित झाला त्यानुसार या वर्षी बालकांविरोधात तब्बल १०६,९५८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

· बीबीसी च्या दिल्ली कार्यालयातील गीता पांडे म्हणाल्या की लैंगिक छळ सहन कराव्या लागलेल्या मुलांची संख्या जगाच्या इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. खरंतर ही संख्या कितीतरी पटीने अधिक असू शकेल कारण या मुद्द्यावर बोलायला सहसा कोणीच तयार नसतं.
· बालकांच्या विरोधात घडलेल्या गुन्ह्यांची संख्या – एकूण नोंदलेली प्रकारणं २०१४ – ८९४२३, २०१५ – ९४१७५, २०१६ – १०६९५८.

· लैंगिक अत्याचारा विरोधात आवाज उठविणाऱ्या मंडळींच्या मते मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे बहुदा मुलांच्या परिचयातील व्यक्तीच उदा. पालक, नातलग किंवा शिक्षक असतात.

संदर्भ – बी बी सी न्यूज