मुलांवरील अत्याचाराची तक्रार नोंदविण्यासाठी – प्रथम माहिती अहवाल (FIR)

  1. गुन्हा घडल्याची माहिती / तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनवर त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांकडे करणे.
  2. ही तक्रार लिखित स्वरुपात असणं आवश्यक आहे परंतु तक्रारदार अशिक्षित असेल तर त्याची तोंडी तक्रार पोलीसांनी लिहून घेणं व त्याला ती वाचून दाखवून त्याची त्यावर सही घेणं आवश्यक आहे.
  3. पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये या तक्रारीच्या गोषवारा पोलिसांना लिहावा लागतो.
  4. तक्रारदाराला एफ आय आर ची एक प्रत कोणतीही फी न आकारता पोलीस देणे लागतात.
  5. ज्या व्यक्तीच्या बाबतीत गुन्हा घडला ती व्यक्ती, तिच्या वतीने दुसरे कोणी किंवा गुन्ह्याची प्रत्यक्षदर्शी कोणतीही व्यक्ती एफ आय आर दाखल करू शकते.
  6. तक्रारीमध्ये गुन्ह्याचा पूर्ण तपशील असेलच असे नाही. तक्रारदाराला गुन्हेगाराचं नाव किंवा त्यानं कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला हे माहीत असेलच असं नाही. हे सर्व तपशील मिळवणं हे पोलिसांचे काम आहे तक्रारदाराचं नाही.
  7. टेलिफोनवरून कोणी तक्रार केली तरी पोलीसांनी त्याबाबत तपास करणं गरजेचं आहे.
  8. १८ वर्षाखालील मुलाचं /मुलींचं स्टेटमेंट त्याच्या / तिच्या घरी जाऊन पोलिसांनी नोंदविला पाहिजे पोलिस स्टेशनवर बोलावून नाही.
  9. मुलाचं स्टेटमेन्ट त्याच्या परिचित जागी त्याला मोकळेपणा वाटेल अशा ठिकाणी नोंदवलं जावं. मुलांच्या विश्वासातल्या व्यक्तीला यावेळी सोबत हजर असण्याचा हक्क आहे.
  10. भाषा प्रौढांची नको. मुल जे सांगेल ते तसंच्या तसं, त्याच्याच भाषेत नोंदवलं गेलं पाहिजे नाही तर उलट तपसणीच्यावेळी अडचणी येऊ शकतात.
  11. मुलाचा जबाब नोंदविण्यापूर्वी सर्वप्रथम ज्या जागेत, वातावरणात त्याच्यावर अत्याचार झाला तिथून त्याला हलवलं पाहिजे. मग ते कुटुंब असो, संस्था असो कि कामाची जागा असो.
  12.  मुलाला प्रश्न विचारताना जरूर तेव्हा पोलिसांनी समुपदेशक किंवा मानसशास्त्र तज्ञाची मदत घेतल्यास मूल मोकळेपणानं बोलेल आणि नेमका माहिती पोलिसांना मिळू शकेल.
  13. समाजिक कलंकाची भीती तर कधी अत्याचार करणारी व्यक्ती परिचयातील किंवा जवळची असल्यामुळे मुलावरील लैंगिक अत्याचाराबद्दल तक्रार नोंदवणं तक्रार करणाऱ्याला अनेकदा कठीण जात. यासाठी मुलाला आणि तक्रारदारालाही पोलिसांनी संवेदनाक्षम पद्धतीनं वागवणं गरजेच असतं.
  14.  पोलिसांनी कायद्यातील अत्यंत योग्य आणि प्रभावी कलमं एफ आय आर मध्ये लावावीत. गुन्ह्याच्या गांभीर्यावर पोलीस किती गंभीरपणे तपास करतात हे अवलंबून असतं. उदा. संशयास्पद अवस्थेत घरकाम करणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला असेल आणि ती आत्महत्या आहे कि कसे तसेच लैंगिक शोषण झाले आहे का याची खातरजमा करून घेता येईल अशी कलंम लावायला हवीत.
  15. बळीत मूल व अत्याचार करणारी व्यक्ती एकाच ठिकाणी रहात असतील तर त्याची माहिती पोलीस ठाण्यातील व जिल्ह्यातील बाल संरक्षण अधिकाऱ्याला द्यावी.
  16. बाल लैंगिक अत्याचार झाल्यची माहिती असल्यास त्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळवणे कायद्याने बंधनकारक आहे. तसे न केल्यास 6 महिन्यांचा कारावास अथवा आर्थिक दंडाची तरतूद आहे.
  17. केसपेपरमध्ये सर्व महत्त्वाचा तपशील नोंदवलेला असावा. कारण अनेकदा केस सुनावणीला येईपर्यत बराच वेळ जातो. अशा वेळी गुन्हा नोंदवला त्या वेळचा पोलीस अधिकारी तिथे असेलच असं नाही.

संदर्भ – मुलांचे लैंगिक शोषण, सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली – विद्या आपटे