मुले खोटे बोलतात आणि लैंगिक शोषणाची कहाणी करतात.

मुलांना अशा विषयाबद्दल माहितीच नसते तर ते कहाणी कसे बनवतील?

मुलांच्या लैंगिक शोषणाचा विषय आला की खूप मोठ्या प्रमाणात या समजूतीबद्दल देखील बोललं जातं, मात्र याच्या मुळाशी असलेलं तथ्य किंवा सत्य वेगळंच असतं आणि ते बऱ्याच वेळेला दुर्लक्षित राहतं.

  1. लैंगिक शोषणाच्या खोट्या कहाण्यांची टक्केवारी ही 6 ते 10% आहे जी लैंगिक शोषण झालेलं असूनही ते नाकबूल करणाऱ्या केसेसच्या टक्केवारीपेक्षा खूप कमी  आहे.
  2. बऱ्याचदा अशी तक्रार आल्यावर संबंधित मुलाशी बोलणारी व्यक्ती कशी  चौकशी करते त्यावरही ही गोष्ट अवलंबून असते.
  3. संबंधित मुलाचा भवताल आणि त्याच्या व्यक्तिमत्वात असलेल्या काही गोष्टी उदा. मुलाच्या लहानपणाच्या काही दुःखद आठवणी, लैंगिक शोषणाबद्दलच अज्ञान, त्याचं वय, त्यामुळे योग्य तपशील योग्य भाषेत सांगता न येणं, काही वेळेला लक्षात न आलेल्या त्याच्या सायकॉलॉजीकल डिसऑर्डरस् यावरही ही गोष्ट अवलंबून आहे.
  4. बऱ्याचदा खोट्या कहाण्या पालक, आजूबाजूचे लोक, कुमारवयीन मुलं तयारही करतात पण त्याची कारणं असतात, सूड घेणे, ब्लकमेल करणे, मोठा स्वार्थ असणे तसंच   अत्यंत संघर्षमय घटस्फोटामध्ये मुलाची कस्टडी मिळवणे इ. इ.
  5. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा मुलांचे लैंगिक शोषण जवळच्या, विश्वासू किंवा  घरातल्याच सदस्यांकडून केलं जातं आणि जेव्हा मूल हे सांगायला जातं तेव्हा त्यावर विश्वास न बसून मूल खोट्या कहाण्या सांगतं असा शिक्का त्याच्यावर मारला जातो.

मात्र याबाबतची आकडेवारी पुष्कळ बोलकी आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या एका ताज्या आकडेवारीनुसार कामाच्या ठिकाणी मालक वा सहकाऱ्यांनी केलेल्या बलात्काराच्या केसेस 25% इतक्या आहेत तर पॉस्को अंतर्गत नोंदल्या गेलेल्या बलात्काराच्या केसेसमध्ये 94.8% बलात्कार ओळखीच्या माणसांकडून झालेले आहेत. त्यातही शेजाऱ्यांनी केलेले बलात्कार मोठ्या प्रमाणात म्हणजे 35.8% इतके आहेत तर स्वतःच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी केलेले बलात्कार 10% इतके आहेत.