हिंसा कशाला म्हणायची?

८ वर्षाच्या आसिफावर सामूहिक बलात्कार….. कॉलेजवरून येताना चौकामध्ये मुलं त्रास देतात म्हणून ११ वीत शिकणाऱ्या राधाने कॉलेज सोडले…. प्रेमाला नकार देणाऱ्या सुलभाच्या तोंडावर अॅसिड फेकले…. आमटीत मीठ कमी पडल्यामुळे बायकोला मारहाण…. सोफियाला पहिल्या दोन मुली झाल्यामुळे तिच्या सासरकडच्या लोकांनी तिच्याबरोबर बोलणे सोडले…. बायकोवरील संशयामुळे तिला घराबाहेर पडण्यास मनाई… अमृताने प्रेमाला नकार दिल्यामुळे भर चौकात चाकूने हल्ला करून तिचा खून केला… सुनीताचे एका मुलावर प्रेम आहे म्हणून तिला घरातील एका खोलीत बंद केले… कमाल त्याच्या बायकापोरांच्या रोजच्या जगण्यासाठी पैसेच देत नाही…

अशा अनेक घटना आपण ऐकतो, पाहतो, कधी कधी अनुभवतोही. स्त्रियांवरील हिंसेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वरील घटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हिंसा दिसून येते. समाजात मारामारी केली किवा रक्त पाहिलं तरच त्याला हिंसा म्हटले जाते. परंतु स्त्रियांवरील हिंसा ही फक्त मारहाणीपुरतीच मर्यादित नसून तिचे शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक, आणि इतरही प्रकार आहेत.