मीनाची गोष्ट – भाग २

मीनाची गोष्ट – भाग २ (स्क्रिप्ट)

मीनाच्या आयुष्यात आपण या आधी डोकावलो आहोतच. काही घटनांमुळे मीनाचे आयुष्य पार बदलूनच गेले. त्यातलीच एक घटना म्हणजे तिच्या पाठच्या, तिच्या लहान भावाचा जन्म. आता तुम्ही म्हणाल तिच्या लहान भावाच्या जन्माचा काय संबंध? तर तिच्या लहान भावाचा जन्म झाल्यापासून जणू तिचे घरातले स्थानच बदलले. सगळे घर आता तिच्या भावाभोवती फिरायला लागले. खरंतर, आई-वडिलांमध्ये झालेला एक संवाद त्यांच्या नकळत तिने चोरून ऐकला होता. तिची आई वडिलांना विनवणी करत होती, “आता थांबाया पायजे. दोन छोट्या मुली हायेत. अजून कशाला पायजे पोर?” पण बाबा काही केल्या ऐकून घ्यायला तयार नव्हते. डॉक्टरांनी पण बाबांना सांगितले होते की आईच्या जीवाला धोका असू शकतो. पण बाबा हट्टाला पेटले. त्यांना मुलगाच हवा होता. तिला आठवत होते, तिला भाऊ झाल्याचे कळल्यावर वडिलांनी सगळ्या गल्लीत पेढे वाटले होते. भावाचे पहिले काही वाढदिवस देखील मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले. स्वतःचा वाढदिवस कधी साजरा केला गेलेला तिला आठवत नव्हतं. जेवणात देखील भाजी एकतर बाबांच्या आवडीची किंवा भावाला आवडणारी. घरात गोडधोड केले तर भावाला दोनदोनदा वाढले जाई तर मीनाला मात्र कधीकधी पक्वान्न बघायलाही मिळत नसे. गावाच्या जत्रेत एकदा भावाने रिमोटवर चालणाऱ्या मोटारसायकलचा हट्ट धरला. पण मोटारसायकल केवढी महाग! मग काय, त्यावर्षी मीनाला, तिच्या बहिणीला जत्रेतून काही मिळालं नाही. घरी आली फक्त खेळण्यातली मोटारसायकल.

मीनाला खरंतर मनातून भावाबद्दल माया वाटे. पण कधी-कधी त्याचा रागही येई. आईला घरी, शेतात काम असायचे तेव्हा त्याला सांभाळायला म्हणून कधीकधी मीनाला शाळेला बुट्टी मारावी लागे. तेव्हा कुठून भाऊ जन्माला आला असे तिला वाटून जाई. भाऊ मोठा झाला तशी वडिलांनी सायकल घेतली. तिच्यावर पहिला हक्क भावाचा. एवढासा तिचा भाऊ, सायकल चालवताना त्याचे धड पायदेखील जमिनीला टेकत नसत. पण तो सायकलने शाळेत जाई. मीना आणि तिच्या बहिणी मात्र रोज तास-तासभर पायपीट करून शाळेत जात. आजी तर केवढे लाड करायची भावाचे. “वंशाचा दिवा’ का काहीसे म्हणे त्याला. ‘हा बारक्या वंशाचा दिवा! अन आमी काय पाप केलया?’ मीना स्वतःशीच पुटपुटे.

भावाचे लाड जरी जास्त होत असले, तरी काही बाबतीत मात्र भावाला अजिबात सूट नव्हती. एकदा गल्लीतल्या काही मुलांनी भावाला काही कारणावरून जरासे मारले. झालं. भाऊ रडतरडत घरी त्यांची तक्रार करायला लागला. साहजिक होते. इतर मुले एवढी मोठी, धिप्पाड. त्यांच्यापुढे त्या लहानश्या मुलाचे काय चालणार? पण बाबांनी अगदी अनपेक्षित प्रतिसाद दिला. ते भावालाच ओरडले ‘रडतोयस काय लेका मुलीसारखा! जा जाऊन त्यांना चांगली अद्दल घडवून ये.’ असेच एकदा रात्री मीनाला कुठेसे जायचे होते तेव्हा आईने तिला सोबत म्हणून लहान भावाला पाठवले. आधीच अंधार, त्यात सुनसान रस्ता. मीनाचा भाऊच तिच्यापेक्षा जास्त घाबरला. शेवटी मीनाच त्याचा हात धरून त्याला ओढत घेऊन गेली. रस्त्यात तो तिला म्हणाला, “घरी सांगू नको काय, मी घाबरलो ते.” मीनाला त्याची दया आली.

भाऊ जसाजसा मोठा होत गेला, तसा तसा त्याच्यामध्ये होणारा फरक तिच्या लक्षात येऊ लागला. त्याचे मीनाशी पाहिल्यासारखे बोलणे, खेळणे बंद झाले. मीनाशीच नव्हे, इतर मुलींशी देखील. तो जास्त जास्त घराबाहेर, मित्रांमध्ये राहू लागला. आईशी, आजीशी देखील त्याचे वागणे बदलले. घरातल्या सगळ्या बायकांवर तो थोडीशी अरेरावीच करायला लागला. मीनाने, तिच्या बहिणीने काय करावे आणि काय करू नये याबद्दल तो त्याची मते व्यक्त करू लागला. मीनाला तर ते फार खटकायचे. ‘हा कोन आमाला सांगनारा?’ जणू तिचा भाऊ तिच्या वडिलांचीच जागा घेऊ पाहत होता. आश्चर्य म्हणजे तिच्या आईवडिलांना दोघांना हे मान्य होते. तिचे वडील देखील आता त्याला फारसे बोलत नसत.

एकदा मीनाच्या एका मैत्रिणीने तिच्या भावाला चिडवले. त्यावर तो इतका संतापला की त्याच्याकडून काहीतरी बरे वाईट घडेल असे तिला वाटले. पण सुदैवाने त्याने काही केले नाही. “मुलगी हाय म्हनून सोडून दिलं” असे म्हणून तो निघून गेला. त्याच्या मित्रांनी त्याला चिडवलेले चालायचे. मग मुलींनी चिडवले तर काय मोठे? असे मीनाला वाटून गेले. हळूहळू तिच्या लक्षात आले की हे फक्त तिच्याच भावाच्या बाबतीत नव्हे, तर तिच्या मैत्रिणींच्या भावांच्या बाबतीत देखील खरे होते.

एकदा मीनाची लग्न झालेली बहीण घरी आली तेव्हा भावाने तिला गुपचूप पैसे मागितले, बूट घेण्यासाठी. बाबांना समजले तेव्हा बाबा त्याला खूप ओरडले. खरंतर एवढं ओरडण्यासारखे काय होते ते मीनाला समजले नाही. पण ‘बहिनीच्या जीवावर बूट घेतोयस व्हय रं? लाज नाय वाटत?’ असं काहीसं बाबा बोलले होते. आणि एकेदिवशी बाबांचीच नोकरी गेली. त्यांच्यावर घरी बसायची पाळी आली. घर कसे चालवावे हा आई समोर मोठा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी मीनाचे नातेवाईक, शेजारपाजारचे, एवढेच कशाला, तिची आजी देखील पहिल्यांदा तिच्या आईच्या बाजूने बोलली. बाबांची नोकरी गेल्यानंतर, घरचा सगळा भार भावाने उचलला. त्याने शिक्षण अर्धवट सोडून दुसऱ्याच्या शेतात मजुरी सुरु केली. तेव्हापासून त्याने खऱ्या अर्थाने बाबांची जागा घेतली. बाबा आता जणू घरातल्यांसाठी दुय्य्म झाले.

याच दरम्यान मीनाच्या लग्नासाठी खटाटोप सुरु झाले. मुलगा पसंत करताना, तिच्या भावाचे मत आता महत्त्वाचे ठरू लागले. शेवटी वडिलांनी आणि भावाने एक स्थळ पसंत केले. पण सासरकडच्यांनी पंचवीस हजार (२५,०००) रुपये हुंडा मागितला. हो नाही करत करत वीस हजार (२०,०००) वर लग्न पक्के झाले. लग्नासाठी वडिलांना कर्ज घ्यावे लागले. लग्न पार पडले. सासरी जाताना मीनाच्या भावाने तिला प्रेमानेच पण जरा स्पष्ट शब्दांत ऐकवले. “मीने, नवऱ्याशी नीट वाग काय! तुझ्या लग्नापायी कर्ज घेतलंय म्या. आता तेच तुयं घर.” मीनाचे हे नवे घर, तिचा नवरा कसा असेल? मीनाचे तिच्या नवऱ्याशी पटेल का? पाहुयात पुढील व्हिडीओजमध्ये.


वरील व्हिडीओ वर आधारीत काही प्रश्न खाली दिले आहेत. या व्हिडीओ मधील संदेश आपल्यापर्यंत पोहोचला आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या. प्रश्नावली साठी खाली क्लिक करा