अरुणाची गोष्ट (3)

अरुणाचं मन खूपच प्रश्नांनी भरलेलं होतच त्यात तिची खास मैत्रीण सायली ने तिला असे तातडीने भेटायला बोलावले! तिचे ४-५ शब्द,” उद्या शाळेत एक तास लवकर ये महत्वाचा बोलायचं आहे!” एवढेच डोक्यात घोंघत होते. सायली आणि अरुणा लहानपणी पासून अगदी घट्ट मैत्रिणी होत्या. अरुणा कशी बशी त्या रात्रीच्या घटनेचे विचार घेऊन झोपली कारण तिला सकाळी लवकर उठायचे होते. सकाळी सकाळी अरुणा निघाली सायली ला भेटायला; त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी. त्यांच्या शाळेच्या आवारात एक मोठे गुलमोहराचे झाड होते. अरुणा आणि सायली नेहमी त्या झाडाखाली बसून डब्बा खात, अभ्यास करत, गप्पा मारत असे. ही जागा त्यांना फारच प्रिय होती.

अरुणा जोपर्यंत पोहोचली तोपर्यंत तर तिने बघितलं कि सायली आज जरा नेहमीपेक्षा शांत दिसत होती. अरुणाला लगेच वाटले की काहीतरी निकालाचीच गडबड असावे कारण सायलीचा स्वभाव शांत कधीच नसतो. अरुणाने लगेच विचारले, “काय ग सायु काय झालं तुला? निकाल लागला ना तुझा? चांगले मार्क नाही पडले का? चालतय ग सायु! मला माहितीये ना तू खूप कष्ट घेतले होते ते पण कधीतरी आपल्याला जसे हवे असते तसे होत नाही. अगं देवाने तुझासाठी काहीतरी वेगळा आणि जास्त चांगला ठरवलं असेल!” त्यावर सायली म्हणते, “अग अरुणा आता बोलू का मी!” तुझी परवानगी असेल तर? निकाल लागला आणि मला परीक्षेत प्रथम क्रमांक आला आहे! एवढच नाही तर मला नवोदयमध्ये प्रवेशाची संधीही मिळाली आहे! अरुणा लगेच तिला मिठी मारत म्हणते, आग सायु हि तर फारच आनंदाची गोष्ट आहे! अभिनंदन अभिनंदन! तू का ग एवढी दुखी आहेस मग? मला वाटलं नापास झाली कि काय! त्यावर सायली म्हणते, “कसला आनंद? क्षणभरासाठी मी सुद्धा आनंदी होते पण जेव्हा मी बाबांना याबद्दल सांगितले त्यांनी त्वरित नकार दिला आणि बोलले की त्यांना वाटतं मी एकटी मुलगी शहरात नाही राहू शकणार. त्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल अभिनंदन केले पण ते मला एकटी कुठेही पाठवणार नाही हेही बोलता-बोलता स्पष्ट केले. बाबा तर म्हणाले की, ” सायली तू तसाही लग्न झाल्यावर आम्हाला सोडून जाणारेस आता तरी आमच्या बरोबर रहावं, काय खराबी आहे इथल्या शाळेच्या शिक्षणामध्ये? इकडूनच तर शिकून तू चांगले गुण मिळवलेस. तसाही मुलींना जास्त उच्च शिक्षण मिळवून काही उपयोग नाही होणारे. त्यापेक्षा तू आता हळू हळू आई बरोबर स्वयंपाक शिकायला लाग. ते फार मदतीचा ठरेल. “

हे सर्व ऐकून अरुणाला मिनुताईचं रात्रीचं बोलणं आठवलं! आणि तीला हळू हळू समजायला लागले कि मिनूदीदीची परिस्थिती काय होती. या दोन्ही परिस्थिती वेगळ्या वाटत असल्यातरी विचार केल्यास दोन्ही एकाच गोष्टीकडे घेऊन जातात. असे वाटायला लागले होते कि फक्त मुलींबरोबरच असे का होते? उद्या माझाबरोबर जर असेच काही झाले तर? हि गोष्ट बदलायला हवी. पण तिला कळून चुकले होते की आपण यात काहीही करू शकत नाही. पण हे सर्व होण्याचे कारण एकच की आपण तिघीपण मुलीच आहोत!.” अरुणा सायलीशी काहीच न बोलता गपचूप आपल्या वर्गात निघून गेली.