बालविवाहा विरुद्ध राधाचा यशस्वी लढा

राधा, वय वर्ष १६, भारताचं भविष्य कसं आशावादी आहे हे सांगणारी एक आत्मविश्वासू मुलगी. या वयात आवश्यक असलेलं खेळणं-बागडणं, शाळेत शिक्षण सुद्धा जोमात सुरू होतं. त्याबरोबरंच इतर सामाजिक कामांचीसुद्धा ओढ लागली. त्यातूनच स्वतःच्या बुद्धी आणि परिश्रमांच्या जोरावर, तिने कैलाश सत्यर्थींच्या ‘बाल पंचायतीचे’ प्रमुख पदाला गवसणी घातली.

 पण अचानक तिला हादरून सोडणारी बातमी कळाली, की तिचं पुढच्याच महिन्यात लग्न ठरलं आहे ते. मनातील स्वप्नांच्या किरणांवर अचानक घनदाट ढगांनी गर्दी केली. तिने आईला सांगितलं की, “मला नाही करायचं लग्न आत्ताच”. पण आई म्हणाली, “काही होत नाही. माझं, तुझ्या बहिणीचं, सुद्धा झालंच की, सांभाळून घेशील तू.” मग तिने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, “बाबा, मला अजून शिकायचं आहे आणि या लग्नामुळे माझं नुकसानंच होऊ शकते.” वडिलांना सुद्धा तिच्या अपेक्षा आणि स्वप्नं कळाली नाहीत.

मग राधा थोडी असहाय्य झाली, पण लगेच तिच्यातली ‘बाल पंचायतीची प्रमुख’ जागी झाली. ‘इथे मी स्वतः बालविवाह, बालमजुरी आणि बालकांच्या इतर हक्कांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करत आहे, आणि जर मी माझा स्वत:चाच बालविवाह थांबवू नाही शकले, तर काय अर्थ उरला?’

राधा आता निश्चयाने उठली आणि थेट ‘मुलाच्या’ वडिलांकडे गेली. त्यांना ठामपणे सांगितलं, “मला हे लग्न करायचं नाही. बालविवाहामुळे कोणताच फायदा न होता मुलगी आणि मुलगा या दोघांच्या आयुष्याला धोकाच ठरतो. यात मुलीला शारिरीक तसेच मानसिक त्रासाला तोंड द्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला शिकायचं आहे आणि माझी स्वप्ने पूर्ण करायची आहेत. आणि बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. जर घरातील, समाजातील सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं माझ्या एकटीवरंच पडणार असेल तर कशी घालू मी माझ्या स्वप्नांना साद?”

राधाच्या या स्पष्टवक्तेपणामुळे म्हणा की कायद्याच्या धाकाने म्हणा मुलाच्या वडिलांनी एकदाचं लग्न मोडलं.

आज राधा, झारखंड मधील कोडर्मा जिल्ह्यातील बालविवाह विरोधी मोहिमेची ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून काम करत आहे. राधाच्या उदाहरणातून एक तात्पर्य निघते बालविवाहा सारख्या अघोरी प्रथेला थांबवता येते, पाहिजे ती फक्त इच्छा! मुलांच्या १६ व्या वर्षात धोका हा शिक्षणापासून नाही तर ‘बालविवाहाच्या’ अघोरी प्रथेपासून आहे हे राधाला जसे समजले तसे इतरांना देखील लवकरात लवकर समजावे!

(सदर सत्यकथा, Times of India च्या १५, सप्टेंबर २०२१ ला प्रकाशित झालेल्या बातमीपासून प्रेरित होऊन शब्दांकित केली आहे.)

अमोल गंगाधरराव काळे

एल एल. बी. – तिसरे वर्ष , आय् एल् एस् विधी महाविद्यालय,पुणे